Pages

Tuesday, June 22, 2010

Rape me !

काहीपण "बादरायण" संबंध काढायची सवय जात नाही...
बादरायण संबंध --- घटनांचे एकमेकींशी असणारा, लोकांचा एकमेकांशी असणारा आणि स्वतःचा दुसऱ्यांबरोबर असणारा....

एकदा एका Academy winner actor चा हा video मित्राने पाठवला होता (seek to 4:44 min)....त्यात तुकारामांचा एक अभंग आहे.....
बरे झाले देवा निघाले दिवाळे ! बरी या दुष्काळे पीडा केली !!
भारी वाटलेला हा video तेव्हा.. भरपूर comments मारले होते सगळ्यांनी.............


पण .............पण आज काल काही सुचतच नाहीये लिहिण्यासारखं, मांडण्याजोगं.
सगळं diabetic , goody-goody सुचतंय पण तेही मांडण्यासारखं नाहीचे..
...काही सल नाहीयेत सध्या .....किंवा आहेत पण ते जरा झाकले गेलेत...
..चिडचिड पण नाही होत......निराशा आलेली राहत नाही जास्ती वेळ...blue-blue-black-black पण नाही वाटत आजकाल ....
Goodbye Blue Sky झालंय !
आतून काही भरूनही येत नाहीये....पण त्यामुळे सुचत नाहीये काहीच ... खुश आहे मी...


"The Kite Runner" मध्ये खालिद हुसैनी एक गोष्ट सांगतो ...
एकदा एका माणसाला एक जादूचा पेला सापडतो. त्या पेल्यात ढाळलेल्या अश्रुंचे मोती बनत. तो माणूस जरी गरीब असला तरी तो सुखी होता त्यामुळे क्वचितच अश्रू ढाळत असे.
पण मग त्याने स्वतःला दुःखी करण्याचे मार्ग शोधायला सुरुवात केली जेणेकरून अधिकाधिक अश्रू मिळतील आणि तो अधिकाधिक श्रीमंत होईल.
जशी जशी मोत्यांची रास वाढत गेली तशी तशी हाव ही..
गोष्टीच्या अखेरीस मोत्यांच्या ढिगारयावर बसून तो माणूस अगतिकपणे त्या जादूच्या पेल्यात आसवे ढाळत बसलेला असतो.
त्याच्या हातात रक्ताने भरलेला एक सुरा आणि कुशीत त्याच्या बायकोचं गळा चिरलेलं कलेवर असतं .....


..........तेव्हा भरून असायचो, अगदी काठोकाठ - सांडायच्या बेतात.... मग पेला ही शब्दांने भरून वाहायचा, माझ्याबरोबर.
मग
कधी कधी
त्यातले काही शब्दं मोती पण व्हायचे ....
मग ती रास वाढायची आणि हाव ही.
पण आज ?..............आज खूप दाटून आणलं तरी सुचेना. आवंढे गिळले , डोळे बंद केले, काय काय आठवायचा प्रयत्न केला. पण नाहीच ....
स्वतःलाच जखमी करून बघितलं, खपल्या काढल्या, ओरबाडलं स्वतःला. पण तरीही नाहीच सुचलं काही .
'त्याच्या'बद्दलची चीड हीच कितेक दिवस उभं रहायची ताकद होती. 'त्याच्या'कडे नजर भिडवून पाहायचो. बेरकी- न भिता.
कितीही झोडपलं तरी परत उभं राहायचो. स्प्रिंग म्हणायचो स्वतःला ... जितकी जास्ती तो दाबेल त्याहून जास्ती बळाने bounce back होणारी स्प्रिंग.......
... आणि आता ?
आता रमलोय मी इथे. वर बघून नजरेला नजर देण्यापेक्षा आजूबाजूला बघतो मी. 'आव्हान' तर विसरूनच गेलोय कुठे ठेवलंय ते.
रमतोय मी त्यांच्यात. छान बसून गप्पा मारतो त्यांच्याशी. उभं राहायलाच विसरलोय. इथेच मांडी घालून बसलोय 'आव्हानावर'... ....
माहितीये लिमिट आहे ही माझी. ती चिडचिड, तो राग, तो निषेध, नियतीला केलेलं आव्हान, त्यामुळे आलेलं अपयश-दुःख हेच कारण होतं या लिखाणाला.....
आता ते कारण झाकोळल गेलंय....
मग आता किती जखमा करू आणि कसा भरू हा पेला ?....


तुकारामांनी यासाठीच दुःख, कष्ट, पीडा मागितल्या होत्या का देवाकडे ?
आणि Kurt Cobain ही याच कारणासाठीच म्हणाला होता का -----------
Rape me,
Rape me, my friend !!!!

Thursday, May 20, 2010

कंसामधलं ......


इतकं अति झालंय हे आयटी-बीटीचं खूळ कि वळीव सुद्धा आजकाल Smells Like Software Engineer. आठवडाभर राबराब राबून सगळी भडास weekend ला किंवा friday संपत आला कि काढतो आम्ही. तसंच होतंय हल्ली. आठवडाभर खूप उकडतं आणि मग friday eve ला वगैरे हा वळीव/पाउस फॉर्मात येतो. गेले ४ आठवडे असंच चाललंय. अगदी mainstream पावसासारखा आणि आयटीवाल्यासारखा वागतोय हा. तसा कलंदरच होता तो... 
---
३ friday असेच गेले. late 20's मधल्या कामाच्या जबाबदाऱ्या आणि 'वयोमानपरत्वे लग्न' जमल्यामुळे लग्नातले ओसरलेले अप्रूप यामुळे courtship मध्ये असूनही पाऊस (आणि तो पण भन्नाट, वळीवाचा) एकत्र बघावा असे दोघांनाही वाटले नाही कधी. 
पण मग चौथ्या शुक्रवारी वातावरण मस्त झालं होतं. gallery मध्ये आला तो आणि कामानिमित्त तिला फोन केला. तितक्या जोरात वारा सुरु झाला. जास्ती काही ऐकू येईना.
त्याच्या तोंडून वेळ मारायची म्हणून सहज निघून गेलं "तुमच्याकडे आहे पाऊस ?......जर तुला काही urgent काम नसेल तर भेटायचं का आज ?" ...
तिला पण ऐनवेळी काही कारण सुचेना सो ती पण "हो" म्हणून गेली
arrange marriage  मध्ये असे अवघडलेले क्षणच जास्ती !! 
एकाच बेंच वर बसलेले दोघं, पण दोघांचा पाऊस वेगळा होता. आणि वेगळेवेगळे भिजत होते दोघं त्यात.

पाऊस गडगडाट करेल, विजा चमकावेल, घाबरून सोडेल. पण शेवटी दुसऱ्याच्या कुशीत/मिठीत शिरण्याचा निर्णय हा आपलाच असतो. सांडायचंच नाही ठरवलं तर असंच  ओथंबून राहता येतं. 

किती वेळ नुसता पाउस ऐकणार म्हणून त्याने नेहमीचा typical प्रश्न टाकला. "तुला मातीचा वास आवडतो ?" ..तो  
"हो...असाच ...आणि या वळवाचं हेच आवडतं मला..नेहमीच्या पावसाला नाही येत हा वास." .....ती 
"तुला काय वाटतं मातीचा हा वास मातीसाठी काय असेल ? ..scent , perfume or deodorant ?" ....तो..आणि उत्तराची वाट न पाहता सांगायला लागला...

"पाउस मला merchant navy मधला नवरा वाटतो जमिनीचा. पूर्ण वर्षात ४च महिने बरोबर राहून वर्षभर पुरेल इतकं देणारा. किंवा वळीव म्हणजे parole वर सुटून आलेला, भेटायला आसुसलेला, शिक्षा भोगणारा नवरा... आणि मग जेव्हा तो भेटायला येतो तेव्हा हि माती, हि जमीन आपला अगदी ठेवणीतला scent लावते. किंवा 'जब्भी खयालों में तू आये मेरे बदन से खशबू आये' म्हणणारी रेखाच वाटते. मातीचा हा गंध म्हणजे ठेवणीतला, उंची Scent च !!!!"  ..........तो 
कंसामध्ये तो --( त्याला खूप आठवण आली मेघनाची.. मोरापेक्षाही जास्ती पाउसवेडी पोर ती आणि मोरपिसाहून हळवी. तिला सगळा पाऊस आवडायचा -- पहिला पाऊस , दुसरा पाऊस , तिसरा,... सातवा, त्रेपन्नावा...... अगदी शेवटचा पाऊसहि भरभरून जगला  तिने. खूप दिवसांनी एकत्र पाऊस झेलत होतो त्यावेळीची हि तिचीच वाक्यं ! हळव्या पोरीच्या या हळव्या कल्पना आणि उपमा पण. "चुकलो मी, नाही सोडून जाणार परत " असा म्हणत त्याने तिला घट्ट मिठीत घेतलेला. पाण्याने भिजलेल्या तिच्या दाट पापण्या काजळासारख्या भासत होत्या, त्याने हळूच भिजल्या पापणीवरल्या पागोळ्या ओठांनी टिपून घेतल्या..'i luv u like this rain, meghana' ...'...like rain का ?'  ... 'असंच..निघून गेलं तोंडातून'  )

ती... "hmmm...." तिने दीर्घ श्वास घेतला आणि एकदा परत मातीचा तो गंध भात्यात भरून घेतला...

ती..."पण मला काय वाटतं सांगू ? deodorant आहे तो मातीचा. उन्हाने त्रासलेली असते ती तीनेक महिने. घामेघूम, तापलेली. ना काही सावली ना गार झुळूक एखादी. सुस्त पडून असते. आणि हा पाऊस असा अचानक येतो. जोरात, काही नं सांगता, बेधडक...तिची प्रचंड तारांबळ उडते..काहीच आवरलेलं नसतं तिने. surprise visit याची. ऐनवेळी कपाटातला जो   perfume हाताला येईल तो वापरते ती. deodorant च आहे हा तिचा. अशी विस्कटलेली ती माती कसाबसा deodorant मारून भेटायला पळते पावसाला. मातीचा हा गंध म्हंजे तिचा deodorant च "
कंसामध्ये ती --( तिला अचानक cigarette, घामाचा आणि घामाला लपवायला जरा जास्तीच मारलेल्या deodorant चा mixing होऊन जो पुरुषी वास येतो तो आला. यतीन आठवला तिला अचानक. आपल्या कोवळ्या भावनांना त्याच्या करड्या मिठीत कुस्कारणारा. पण तिला तेच आवडायचं..त्याचा पुरुषी अहंभाव, तो बेरकीपणा, तो मस्तवालपणा. मातीच्या वासाची deodorant शी केलेली तुलना त्याचीच. त्याचीच वाक्यं तिने टाकली. त्याच्या जाड्याभरड्या खरबरीत हातांचा स्पर्श आणि असल्या निबर भावना यांचंच तिला भारी वेड. भर पावसात हे वाक्यं बोलून त्याने तिला घट्ट मिठीत घेतलेले. हि आपली त्याच्या अंगाच्या तीव्र दर्पात मातीचा वास आणि स्वतःला विसरलेली. कोंडलेल्या श्वासामुळे तिला तिच्या मनातलं सांगता हि येईना. त्याची "luv u" म्हणायची हि पद्धत अशीच रानटी, पुरुषी ... )

तो ..."हे...हे.. good भारीये हि deo ची उपमा :D :D . तुम्ही मुली नाहीतरी जास्तीच practical असतात..."  ooops आपण काहीतरी चुकीचं बोललो हे त्याला समजलं. सावरून घेण्यासाठी ...
"but we really complement each other !!! "  

पाऊस चालूच होता. परत केवळ पावसाचाच आवाज येत होता...बराच वेळ...
तो ...."या क्षणी 'complement' च्या ऐवेजी मी तुला "love u" म्हणायला हवं होतं ना ?"
ती ..." जवळ येऊ जरा मी तुझ्या ??"  
तरीही पाउस चालूच होता..फक्त आता दोघे एकाच पावसात भिजत होते इतकंच ........ दोघांचा पाउस आता एकच झाला होता.

----
कंसातलं कंसातच राहायला हवं का ? त्यानंतरचा प्रत्येक पाउस त्यांचा कंसामधला भूतकाळ पुसत गेला. नाहीतरी पाउस असतो कशासाठी ??
And they still lived happily ever after...............     

Thursday, May 13, 2010

Somehow on Cloud # 9

विजयाची 'किक' सगळ्यात जबरी ! यशाची नशा, ती धुंदी, तो कैफ काही औरच !! Grass, Acid आणि Mushroom पेक्षा हि तेहतीस कोटी पट जास्त नशा !!!    

शिखरावरच्या सर्वोच्च खडकाच्या छाताडावर पाय रोवून उगवत्या सूर्याला नजर देण्यात जी कैफ आहे ती इतर कशातच नाही !

मग खूप खाली वाऱ्याच्या, धुराच्या मेहरबानीवर तरंगायची केविलवाणी धडपड करणाऱ्या शुष्क पानांकडे बघून कीव येते. नजर कुठेतरी गाडून, तरंगायचं केवळ hallucination अनुभवायचं हीच गत. 

शेवटी विजय अप्राप्य झाला कि अशा सहज 'हवेत' नेणाऱ्या गोष्टींच्या आहारी जाणे हे एकच उरते.   
पराजयापेक्षा या बेरकीपणाचं दुःख जास्ती !   

Monday, May 3, 2010

'cliché' च्या ऐवजी दुसरा शब्द पाहिजे होता !

सालं ...हे परत सुरु झालंय...चहा घ्यायला पण ए.सी. च्या बाहेर येउशी वाटत नाहीये. चिकचिकाट साला आणि वरून खूप गरम होणार. तेव्हड्यात मग ढग येणार..संध्याकाळी भरपूर रंग सांडलेले आभाळात. मोकाट वारा सुटणार.खूप धूळ, पाला-पाचोळा, प्लास्टिक ब्यागा, पुठ्ठ्याचे डब्बे रस्ताभर भिंगरी घालणार.... बापाचा माल असल्यासारखा हा मुजोर वारा धिंगाणा घालत राहणार. मग गरीब झोपड्यांवर तो रेप करणार-त्यांचे पत्रे उचकटवणार, आत घुसून कपडे उडवणार. मोठ्या इमारतींशी लगट करणार हा - त्यांची दारं, खिडक्या , तावदानं जोरजोरात ठोठावणार. झाडांच्या झिंज्या ओढून वाकवणार त्यांना. कपडे उडवणाऱ्या वाऱ्याला कसबसं आवरत लोकं आडोश्याला जाणार. घरातली Safe मानसं मग त्यांची धांदल बघत coffee चे झुरके मारणार. काही आंबटशौकीन लोकं सिनेमातल्या रेपसीन सारख्या आवडीने हा वाऱ्याचा मस्तवालपणा खिडकीअडून पाहणार. काही लोकं फोनवरून हा वारा दुसर्यांना ऐकवणार...
आणि मग हा पाऊस पडणार... जणू वारा उपगुंड आणि हा पाऊस त्यांचा म्होरक्या. हा पण वेड्यासारखा बसरणार-फुटणार . काही आचपेच न ठेवता..मिळेल त्याला झोम्बणार, मध्ये येईल त्याला झोडपणार, निस्ता धिंगाणा त्याचा. आई-बहिण-भाऊ न जुमानता मिळेल त्याची मारणार. मग साले ते टपोरे थेंब मातीत घुसणार. एकामागे एक रानटीपणे घुसत राहणार मातीत.. पण पेताड नवऱ्याच्या बिचाऱ्या बायको सारखी माती हे सगळं सहन करणार. आधी कावरीबावरी होणार मग विस्कटणार, आणि मग स्वतःच्या केसांच्या झिंज्या पिंजारून रांडेसारखी अजूनच लगडणार त्या पुरुषी थेंबांना. थकून-भागून सुस्तावणार ती आणि तिचा घामट वास जाणार दूरदूरवर.. सगळ्यांना समजणार मातीचा आणि पावसाचा अंगसंग चालूये ते.... साला 'पाऊस' पण cliché झालाय खूप आजकाल...

सालं....रात्री झोप येत नसणार. काहीतरी खुसपट sites चालू असणार. आणि अचनक lights जाणार. बाहेर वाऱ्याने दोनेक DP जाळल्या असणार किंवा शे-दोनशे तारांना तोडलं असणार त्याने. त्याच्यामुळे सगळीकडे अंधारलेलं. मोजक्या श्रीमंत घरात Inverter च्या जोरावर काही दिवे माज करत लुकलुकणार. परत हप्ता-वसुलीचा खेळ सुरूच राहणार. वाऱ्याचा नेहमीचा आकांड-तांडव. तेच हट्टी पोरासारखं खिडक्या-दारं वाजवणं सुरु झालेलं. आक्रस्ताळीपणा सुरूच. विजा चमकवणार, आख्खे-च्या आख्खे ढग फोडणार हा.... भूकंप झाल्यासारखं गडगडणार वर आभाळात. कोथरूड ते कोरेगाव पार्क पर्यंत एक भीतीची, विजेची, गडगडती रेषा सापासारखी चमकून जाणार. कितीही सांभाळले स्वतःला तरी खूप भीती वाटणार. कुणाचा तरी हात हातात घट्ट असावा असे वाटणार. कुणाच्या तरी कुशीत, मिठीत लपून रहावेसे वाटणार. मग मी दार धाडकन बंद करणार. बेडवर झोकून देणार स्वतःला. उशी उराशी घट्ट धरून लोळत पडणार. बाहेरच्या वाऱ्याने पंखा हलणार, पडदे फडफड करत राहणार, उर धपापत राहणार. संदीपच्या पंधरा कविता आठवणार,.सौमित्रच्या ५-१० आणि मग इकडच्या तिकडच्या,.लुंग्या-सुन्ग्या किंवा मान्यवरांनी लिहिलेल्या अजून १५-२० आठवणार. पाउस-वारा ऐकू पण येऊ नये म्हणून उशी डोक्याशी घट्ट धरलेली असणार. मग Mobile कडे लक्ष जाणार. Unlock केला कि वखवखणारा उजेड येणार त्याचा डोळ्यावर. ना कोणाचा Missed-Call असणार ना कोणाचा SMS. मग पाठ असलेला number dial करणार अन लगेच Cancel पण. मग जुने SMS वाचणार ...कंटाळून परत Mobile परत Switch-Off करणार. परत आढ्याकडे तोंड. मधेच चारदा सु ला जाऊन येणार. होत नसताना उगाच अपेक्षेने उभेच राहणार. पाणी पिणार,.थोडं कराकरा खाजवून घेणार. परत येऊन बेडवर झोकून देणार. रडू येत नसणार पण टरारा दाटून आलेलं. त्यात बाहेर साला हा मनसोक्त बरसतोय, मोकळा होतोय....खाडकन त्याला mobile फेकून मारावासा वाटणार. मग परत आठवण येणार. आशेने Mobile परत Switch On करणार. ना कोणाचा Missed-Call असणार ना कोणाचा SMS..........साला.....'एकटेपणा' पण कसला cliché झालाय....

आणि मग इतकं होऊनही स्वतःच स्वतःला समजवावं लागणार. परत Gonna Rise Up. दार उघडून जड पायांनी बाहेर जाणार. थोडं भिजून येणार. काहीतरी गोष्टी सांगून स्वतः ला लोरी म्हणणार. भिजल्यामुळे झोप पण लगेच लागणार. सकाळी लवकर उठवणार नाही. घाईघाईत आवरणार. रात्रीचा पावसाचा कल्ला बाहेर दिसणार. मग चिकट चिकट रस्त्यावरून office ला जाणार. गेल्या गेल्या गोड हसावं लागणार. मग खूप busy आहे असा भासवून कामं लांबवत राहणार. मधेच भुरट्या गप्पा -गोष्टी-जोकस मारणार. २-४ वेळा Bank Balance चेक करणार. भरमसाठ saving चे आकडे पाहणार, सुखावणार. खूपच भूक लागली रात्री कि नाईलाजाने घरी जाणार.. हा साला बाहेर रिपरिपतोच आहे. कसबसं जेवण करून परत computer वर थोडं मोकळं होणार आणि परत blog शी लगट सुरु करणार, काहीतरी खरडणार...श्या ..साला 'life' पण किती cliché झालंय ..

सालं रोजचय हे.. दररोज 23 ठार आणि 48 जखमी होणार, १५ जणीवर रेप झालेला असणार- त्यातल्या 7 जणींना मारून टाकलेलं असणार. कंटाळून ७-८ लोकं रोज आत्महत्या करणार, 17 ठिकाणी दरोडे होऊन खून झालेले असणार. 11 लोकांच्या अनैतिक संबंधातून हत्या झालेल्या असणार. काही लोकं गाडीखाली येणार, काही आकस्मिक तर काही अपघाती मृत्यू च्या नावाखाली पोलीस स्टेशनच्या फळ्यावर जमा होणार. ५ मित्र diabetics ने आजारी असणार, ७ जणांना hypertension,.चौघे angioplasty करत बसलेले. 9 जणांना कमरेचे-पाठीचे दुखणे, .. 19 जणांना already attack आलेला. त्यातले काही paralyzed. रोज कुणी ना कुणी, कोणत्या ना कोणत्या कारणाने मरतंय. चायला ... साला..'मृत्यू' पण किती cliché झालाय...

Tuesday, April 20, 2010

For Those Beautiful Moments of Guilt !


थांब अशीच ...
अजून दोनेक श्वास ...

नको पांघरूस विस्कटलेली ती तलम रेशमी सोज्वळता परत,
नको उतरवूस तुझ्या-माझ्या श्वासांनी विणलेलं हे सोवळं ....

थांब ...
...जोवर तुझ्या हृदयाच्या टपोऱ्या ठोक्यांचा बहर ओसरत नाही तोवर,
...जोवर तुझ्या या उष्ण श्वासांचे शरीरभर पसरलेले शहारे, धुमारे निवत नाहीत तोवर....

तोवर असंच असू दे माझ्या देहानं तुझं संगमरवरी चांदणं पांघरलेलं...
आणि माझा अंधार पसरलेला तुझ्या देहावर.

तुझ्या नखांनी छेडलेल्या तारांचे झंकार घुमत राहूदे माझ्या व्रणांच्या डोहात..
अन राहू देत निसटलेले माझे स्वर रेंगाळत
तुझ्या ओठांवरल्या अस्पष्टश्या तिळाजवळ.

..समेनंतरही अजून काही क्षण तरंगत राहू असेच सोबत ...
गंधाहून हल्के अन
असेच रिते
...
राहूदे देहांना असेच आदिम ..
असेच
तप्त .....असेच तृप्त....

थांब अजून ....
निदान श्वास तुटेपर्यंत तरी ??

Tuesday, April 6, 2010

Once upon a time on 5th April (Part 2)!

"२७ ? नाहीरे २५ किंवा २६ असेल !! २७ खूपच होतात ..म्हंजे almost half a way आलो पण ?? परत मोज... तू zero-based indexing केली असशील ...१ minute... मीच मोजतो... ८४ ते २०११... नाही.. नाही २०१० ...
त्या मानाने काहीच येत नाही कि रे मला जगण्यातलं? "

नाहीतरी आपण जगतो म्हणजे नेमकं काय करतो ? न दमता श्वास घेतो, पथ्थ्य न पाळता जेवतो, वेळच्यावेळी शरीरधर्म करतो, औषधांचे डोस मोजत नाही आपण... किंवा हे अगदी शारीरिक वाटत असेल तर मग ...... आपण कमावतो पाच-पन्नास रुपये, उडवतो शे-दोनशे, २-५ डझन लोकांशी चांगलं वागतो, एखाद्या डझन लोकांशी एकदम वाईट हि वागतो. काही नियम पाळतो काही तोडतो. थोडं लढतो थोडं हरतो...आणि असंच अबर-चबर बरचसं करतो ...
अरेहो भरपूर चिंता करतो, थोडी स्वप्नं पण बघतो... झेपेलशी !!! मग यात कसलं आलंय जगण्याच कौतुक आणि वाढदिवसाचं celebration, etc !


त्यांच्यापैकी कदाचित कोणीही सव्वीशी गाठणार नाही. २० वयापर्यंत जगले तरी खूप झालं असा आजार जन्मापासून ! खरतर त्यांना माझ्या वाढदिवसाचं जेवण किंवा पार्टी देणे हे खूपच क्रूर वाटलं मला. असं वाटलं कि मी त्यांना हिनावतोय "बघा मी तरी २६ वर्षाचा... तुम्ही कधीच माझी बरोबरी करू शकणार नाही". औषधाच्या एकेका डोस बरोबर त्यांना एक-एक आठवडा वाढून मिळतो जगायला... जोवर ते डोस चालुयेत किंवा त्यांचा असर होतोय तोवरच... EMI (Equated Monthly Installments) वर जगणं त्यांचं आणि मला हे श्रीमंत बापाच्या माजलेल्या पोरासारखं जन्मजात मिळालेलं आयुष्य.. त्यामुळे त्यांना एक दिवस birthday साठी lunch/diner देणे पण मला प्रशस्त वाटत नव्हते... तरीही गेलो..आधी एक दोन वेळा गेलेलो तेव्हा सुन्न होऊन आलो होतो. पण तरीही गेलो ...
तिकडे गेल्यावर कळलं कि अजून १ scheme आहे. आपण "medical sponsorship" घेऊ शकतो. खूप चांगला वाटलं option हा.
एका पोराचा ३ महिन्यांचा औषधाचा खर्च !! लगेच पावती फाडली , त्यांना कारणही नाही सांगितले.
आपल्या आयुष्यात काही बदल घडवू शकत नाही तर atleast दुसऱ्या कोणाच्यातरी ... माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने कदाचित कोणा पोराचे आयुष्य एखाद महिन्याने वाढेलही.


एखाद  महिना जास्ती म्हणजे अजून काही सूर्योदय सूर्यास्त ..अजून थोडे चिवचिवाट, अजून थोड्या एकट्या संध्याकाळी... 
पावसाळा असेल तर अजून १५-२० पाऊस जास्ती पाहिलं तो, कदाचित एखाद इंद्र-धनुष्य पण. अजून थोडे दिवस कानटोपीची (एकमेव) उब त्याला मिळत राहील ...
एखाद  महिना जास्ती म्हणजे कदाचित द्वितीयेच्या चंद्राच्या अजून २ नाजूक कोर पाहू शकेल तो किंवा अजून थोडं आभाळ भर चांदणंपण .
एखाद  महिना जास्ती म्हणजे कदाचित वयात हि येईल तो किंवा आला असेल तर मतदान पण करू शकेल तो.... 
एखाद  महिना जास्ती म्हणजे pokemon चे ३० भाग जास्ती. किंवा अजून २-३ पुस्तक वाचून होतील तोवर त्याचे, अजून ४-५ चित्रं पण काढेल कदाचित... 
एखाद  महिना जास्ती म्हणजे तीसेक प्रार्थना जास्ती, १५-२० भांडणं -मारामाऱ्या जास्ती, गळ्यात गळे घालून अजून थोडे दिवस हिंडता येईल त्याला त्याच्या मित्रांबरोबर....
एखाद  महिना जास्ती म्हणजे कॅलेंडरचे अजून एक नवीन कोरं पान तो पाहू शकेल, अजून एकदा 'पाच' तारीख हि पाहू शकेल तो कदाचित ...

"मानव्य" नावाची चांगली संस्था आहे. कधीच मोठे होऊ न शकणार्या लहान-लहान मुलांचं गोकुळ आहे ते !!
http://www.manavya.org/get-involved.html                          

Monday, March 29, 2010

Anniversaries, Celebrations and a pinch of Bullshit !

1 :
.. अशा लहान-सहान दिवसांच्या/क्षणांच्या Anniversaries तरी कितीशा उरल्यात ?
हो ना, वर्षातून इन-मिन ५-६ Anniversaries येतात - २ वाढदिवसाच्या, एखादी engagement ची, लग्नाची, १ first date ची आणि अजून २-३ किरकोळ Anniversaries....
खरंच इतक्याच Anniversaries असतात वर्षात ?
कि ..........

पहिल्यांदा नजरेने खुणावलेल्याची Anniversary, पहिल्यांदा ओठभर हसल्याची Anniversary, पहिल्यांदा डोळे भरून आलेल्याची Anniversary.....
रस्ता क्रॉस करताना चुकून झालेल्या पहिल्या स्पर्शाची Anniversary, माझ्या कानात कुजबुजताना -पहिल्यांदा श्वासाच्या अंतराइतकी तू जवळ आल्यावर- आलेल्या शहाऱ्याची Anniversary आणि मग दोघांनी एकाच लयीत श्वास घेण्याच्या वेड्या प्रयत्नाची Anniversary.
पहिल्या McD च्या बर्गरची Anniversary, आणि नंतर एकदा बर्गर खाताना बाजूने mayonnaise निसटलेले असताना आणि ओठांजवळ राहून गेलेले असताना, ते पुसताना माझ्या बोटांना झालेल्या तुझ्या ओठांच्या पहिल्या निसटत्या स्पर्शाची Anniversary.
पहिल्यांदा बाईकच्या मागच्या धूळवट सीटवर एकाच बाजूला दोन्ही पाय ठेऊन, (सुरक्षित) अंतर ठेऊन बसल्याची Anniversary आणि नंतर पहिल्यांदा दोन्ही साईडला पाय टाकून (जरा) जवळ बसलेली असताना, अचानक खड्डा आलेला असताना, अनपेक्षित- करकचून दाबलेला असताना पहिला "Current" बसल्याची Anniversary किंवा मग बाईकवर मला गच्च चिकटून, थकून मागच्या मागेच झोपी गेल्याची Anniversary.
फोनवर पहिल्यांदा भांडलेल्याची Anniversary, केवळ miss call देऊन-देऊन मनावलेल्याची Anniversary. जगातला सर्वात मोठा SMS केल्याची Anniversary आणि फक्त blank sms करून तुला खूप काही सांगितल्याची Anniversary.
३९ वेळा "Bye-Bye-c u-GN" म्हणूनही chat चालूच ठेवल्याची Anniversary आणि पहिल्यांदा दूर जाताना डोळ्यात भरलेलं आभाळ लपवलेल्याची Anniversary.
पहिल्यांदा एकत्र बर्फाचा गोळा खाल्ल्याची Anniversary आणि मग बर्फामुळे बधीर झालेले तुझे ओठ माझ्या गालावर टेकल्याची Anniversary.
एकत्र बघितलेल्या पहिल्या सूर्यास्ताची Anniversary आणि चांदणं झेलत पहाटेपर्यंत जागून सूर्योदय पाहत झोपी गेल्याची Anniversary.
दिलेल्या पहिल्या रानफुलाची Anniversary, पहिल्या माळलेल्या वेणीची Anniversary आणि तुझ्या केसांच्या आणि गजरयाच्या मंद-Mix-मादक गंधाने भारल्याची Anniversary.
Shining मारण्यासाठी JM Road वरच्या पोराकडून बळेच घेतेलेल्या १३ फुग्यांची Anniversary, contest मध्ये पायाने फुगे फोडल्याची Anniversary, पहिल्यांदा फुगे वापरल्याची आणि मधेच फाटलेल्याची Anniversary.
सातव्या पावसात उगीचच चिंब भिजलेल्याची Anniversary, तुला पहिल्यांदा ओलेती पाहिलेल्याची Anniversary, घामानी डबडबलेल्या शरीरांनी थकून, संगीत ऐकत पडलेल्याची
Anniversary.

तरीही मोजून १३५२ च होतात Anniversaries वर्षातून.....
किती क्षण असतात एका वर्षात ? शाळेत शिकवलंच नाही कधी क्षणाचं गणित. त्यामुळे माहितच नाही ..........
तुझ्याबरोबर जगलेल्या प्रत्येक क्षणाची Anniversary व्हायला हवी खरतर..

2 :
प्रत्येक क्षणात प्रचंड ताकद असते. तो जितक्या बधिरपणे, कमालीच्या bore-पणे वाया घालवता येतो तितक्याच उत्कटपणे जगताही येतो.
शेवटी त्याला तसाच वाया घालवायचा कि प्रत्येक क्षण तुडुंब जगुन Celebrate करायचा हे आपणच ठरवायचं असतं....
आता हेच घ्या....
५ वेळा snooze करून सकाळी बळेबळेच उठतो आपण, mechanically brush करतो. दात घासून झाल्यावर, धुतलेल्या त्याच brush च्या bristles वरून बोटं फिरवा आणि उडणारे ते तुषार तोंडावर घेऊन बघा.... चेहऱ्यावर केलेले ते "spray painting" एकदम fresh वाटते. नेहमीचे 'दात घासणे' हि क्रिया पण celebrate होऊन जाते.
संडासात गेलात तरीही अजिबात constipation, pressure , "आपण काल काय खाल्ले होते ?" याचा विचार करू नका.. बादलीत पाणी पडताना नळ कमी-जास्ती करून होणारे वेगवेगळे आवाज सिनेमाच्या गाण्यात कुठे वापरले आहेत ते शोधा ! किंवा एकदम घट्ट नळ बंद केला तरी सगळ्या विरोधाला झुगारून, कसाबसा एक थेंब नळाच्या तोंडाशी येऊन ठेपतो. पाण्यात पडायच्या अतीव महत्त्वाकांक्षेने तो लटकत राहतो. आणि तो थेंब ठराविक टपोरा झाला कि टप्पकन बादलीत पडतो. त्याचा तो प्रवास एकदा observe करा.
संडासच्या बादलीच्या पाण्यात उठणारे तवंग, थेंब पडल्यावर बादलीला येणारा शहारा, ripples चे काठापर्यंत जाणे परत केंद्राशी येणे ....
ohhh. okay. commode वापरता ? हरकत नाही. कधी toilet-paper ची होडी केलीये ? किंवा लहानपणी origami मध्ये शिकवलेली चटई, ससा, कासव, विमान करून बघितलाय त्याचं ?
ठीके इतकं पण हार्ड नाही म्हणत मी. frustrated आहात का ? - मग toilet-paper चा Star-shape करा आणि पुसा आपली. Broken Hearted आहात ? मग त्या paper चा heart-shape करा आणि त्याने पुसा. किंवा खिशात पेन असेल तर आपले वेडेवाकडे, श्लील-अश्लील विचार कागदावर लिहा. नंतर मग विचार आणि तो कागद दोन्ही flush करा .... हागणं पण celebrate करता येतं. हे सगळे बघा, जगा.

उन्हाळ्यातल्या घामेजल्या दुपारी bathroom मध्ये जा. (स्वतःच्या :D) अंगावरचे अगदी एकुंच्या-एक कपडे काढा. shower खाली पूर्ण नग्न उभे राहा. आणि बारीक धार सोडा shower ची. पाण्याचा पहिला ओहोळ संपूर्ण अंगावरून जाताना त्याचं स्पर्श feel करा. पहिल्यांदा केसातून वाट काढत टाळूला जाणवणारा थंड स्पर्श, कानामागून - उष्ण मानेवरून जातानाचा स्पर्श. मग छातीवरून ओघळताना मंद गतीत चालणार्या हृदयाचा त्याचवेळी ठोका पडतो, मग क्षणभर आलेल्या त्या उंचवट्या वरून जातानाचा थेंबाचा झालेला तो स्पर्श. मग पोटावरून - बेम्बिला गुदगुली करून तो ओघोळ खाली बेचक्यात सरकतो. आतापावेतो डोक्यावर पडलेला थंड थेंब शरीराच्या गरमीने थोडा कोमट झालेला असतो. तरीही सर्रकन शहारे आणणारा त्याचं उष्ण स्पर्श जाणवतो तिथेही ...मग भर्रकन मांडीवरून जाताना आणि पोटरी-गुडघ्याला पोचता पोचता मागचा ओघोळ त्याला मिळालेला असतो. आपल्या एकेक अंगाला स्पर्शाल्यामुळे त्या ओघोळाला होणारा आनंद feel करा. गोमटेश्वराचा मस्तकाभिषेक इतकी लोकं celebrate करतात, मग स्वतःच्या शरीराला होणारा हा अभिषेक celebrate करायला नको आपण ?

संध्याकाळी अवेळी lights जातात. काहीतरी इंटरेस्टिंग बघत असतो, वाचत, लिहित असतो आणि तेव्हड्यात lights जातात. इतकी technology ची सवय झालीये कि technology शिवाय १ sec. पण राहवत नाही. अशा वेळी मेणबत्ती लावू नका, battery लावू नका, mobile घेऊ नका बरोबर आणि जिथे कणभर हि प्रकाश येत नाही अशा खोलीत जावा...अगदी मिट्ट काळोखाची खोली - शांत पडून राहा, डोळे सरावतील तोवर. आणि मग अंधारात बघायचा प्रयत्न करा.खूप शांत वाटतं डोळ्यांना. प्रकाशाची - रंगांची वखवख नाही, कसला आवाज नाही, popups नाहीत काहीच नाही. ज्या शरीराचा इतका माज असतो त्याकडे बघा...काहीच दिसत नाही...फक्त अनुभवतो आपण त्यांना हात, पाय, नखं, वक्ष. सगळ्या गोष्टी काळोखाचाच एक भाग असतात. न दिसत सगळ्या गोष्टी अनुभवून बघा. तो शांत, गंभीर काळोख अनुभवा.. lights नसतानाचे माणसाचे आदिम क्षण Celebrate करा ...

कंटाळवाण्या दुपारी जेवायला हि बाहेर पडावेसे वाटत नसते. मग सरळ maggi उघडा एक. tastemaker चा sachet फोडा. पातेल्यात टाकले सगळे tastemaker कि ते sache पूर्ण कापून ते sachet आतून चाटून घ्या. tastemaker चा एकही कण वाया गेलेला मला आवडत नाही. maggi बनले, खाऊन झाले कि पातेले चाटून घ्या.................
...........श्या ....................
3.
कित्येक दिवसांपासून या Post चा mood च बनत नव्हता. खूप दिवसांनी आज वेळ मिळाला... म्हणून लिहून काढलं बरंच. जरा break घेतला.
break नंतर आलो तर complete मूड change होता. Post परत वाचला आणि माझी reaction होती....
.......Bullshit !!!
किती Bullshit लिहितो मी ! खोटा आदर्शवाद, erectile dysfunctional romanticism, Utopian मुद्दे, बिनकामाच्या जाणीवा-नेणिवा, diabetic लवस्टोरया n blah.. blah...
म्हणून मग तिसरा "Bullshit" वाला पार्ट add केला....
आणि असं वाटायला लागलंय कि आजकाल मी माझ्यासाठी लिहित नाहीये, तर लोकांसाठी लिहायला लागलोय ...
कित्येक वेळा लिहिणं सोडून देण्याचा विचार आलाय मनात... कधीतरी कोमेजून देईल सोडून ... असो... आज पुरतं इतकंच बास....