Pages

Showing posts with label Ear Bud. Show all posts
Showing posts with label Ear Bud. Show all posts

Thursday, June 2, 2011

One Night Stand & Summer'68


काल रात्रभर एकच गाणं ऐकत होतो. जवळपास ४ तास तेच गाणं परत - परत - परत.
अर्थ काहीच कळत नव्हता, पण गाण्याचा feel खूप मस्त होता. सतत ऐकावसं वाटत होतं.
ऐकत असताना मधूनच झोप लागली, परत जाग आली तेव्हा तेच गाणं वाजत होतं.
परत ऐकत बसलो कितीतरी वेळ...

सकाळपासून ते गाणं आठवायचा प्रयत्न करतोय. पण नाहीच आठवते काहीच..
चाल नाही, शब्द नाही, गाणं कशाबद्दल होतं तेही नाही, अर्थ नाहीच... काहीच नाही...

रात्रभर माझी सोबत करणारं गाणं इतक्या लवकर कसं विसरून गेलो मी?

One Night Stand चा अनुभव नसल्याने Pink Floyd चं Summer'68 गाणं कधी नीट समजलंच नव्हतं. गाणं मस्तय ते, पण याच्यावर इतकं साधं गाणं होऊ शकतं हे पटत नव्हतं..
And I would like to know
How do you feel, how do you feel, how do you feel?

and now i know, how does it feel....

Wednesday, January 26, 2011

Rachel Greathouse!


आजकाल दरवेळी लायब्ररीमधून पुस्तक घेताना चोविसावं पान उघडून बघतो. तिने खुण केलेली असतेच तिथे, "Clef" ची musical note. अगदी माझ्या छातीजवळ गोंद्लेल्या tattoo सारखी. ditto

लायब्ररीमधून आपल्या मनाचं पुस्तक घ्यायचो, अगदी आपल्या आवडीचं. जे ठरलेले लेखक आहेत त्यांचीच किंवा नेहमीच्या genre ची पुस्तक घ्यायचो. किंवा कोणीही न वाचलेली-अगदी करकरीत कोरी पुस्तकं पण कधीकधी. वेगळ्या वाटेवर लिहिणाऱ्या कोणाचीही पुस्तकं घ्यायचो मी
कधीकधी आपल्या वेगळ्या निवडीचं उगाच कौतुक वाटायचं. 'सहा फूट माणसांच्या गर्दीत सव्वासह फूट असणे' इतकाच काय तो फरक, पण तरीही चांगलं वाटायचं... पण तरीही  दरवेळी 'आपण सोडून हि पुस्तकं कोण वाचत असेल?' असा प्रश्न पडायचाच. मग पुस्तकाच्या शेवटी जायचो. शेवटच्या पानावर लायब्ररीवाल्या बाईने शिक्के मारलेले असायचे. वर्षानुवर्षाचे date-stamps सापडायचे. बरीच पुस्तकं महिने-महिने पडून राहिलीत अशा तारखांच्या नोंदी सापडायच्या.
एकतर ती पुस्तकं लायब्ररीच्या शेल्फ मधेच पडून राहिली असतील किंवा वाचणाऱ्याने त्याची हजार पारायणं तरी केली असतील असा(उगाच) अंदाज बांधत परत वाचायला लागायचो...

पहिल्यांदा जेव्हा चोविसाव्या पानावरची ती खुण पाहीली तेव्हा थबकलो होतो. आरशात जाऊन परत माझा tattoo पाहून घेतला. 
माझ्या चोविसाव्या वाढदिवसाला काढलेला तो tattoo... 'S' शी साम्य म्हणून आणि काहीतरी musical हवं छातीशी म्हणून Clef ची sign काढलेली...
चोविसाव्या पानावर Clef ची ती musical note त्याच्या लफ्फेदार शेपटीसकट अगदी जशीच्या तशी होती... 
शिवाय दाबून काढलेलं अक्षर, मागच्या ३-४ पानांवर उमटलं होतं.
जरावेळ थांबून सगळं पुस्तक कितेकदा तरी चाळलं. अजून कितीतरी खुणा सापडल्या- माझ्या आवडत्या बऱ्याचश्या वाक्यांच्या खाली टिंबाच्या पुसटश्या खुणा होत्या, दुमडलेल्या पानांवरचे उतारे पण बहुतेक माझ्याच आवडीचे, पुस्तकातल्या नेमक्या माझ्याच आवडीच्या कथांची पानं खिळखिळी झालेली वाटली - परतपरत खूप वेळा वाचून त्या कथेच्या आजूबाजूच्या पानांच्या घड्या सैल झाल्यासारख्या वाटत होत्या....
मग नंतरच्या प्रत्येक पुस्तकावर सापडली ती खुण, त्या खुणा... पूर्वी घेतलेली जुनी पुस्तकं पण चाळली, त्यावर पण त्याच खुणा सापडल्या. कदाचित आधीच्या पारायणा त्या दिसल्या नव्हत्या.
मला न आवडणारी पुस्तक पण चाळली, पण त्यावर त्या खुणा नव्हत्या. अगदी माझे नावडते पण प्रसिद्ध लेखक पण पिंजारले, त्यांच्या पुस्तकांची २४ वी पानं अगदी कोरी होती.
बाकी कोणत्याच पुस्तकांवर या खुणेचा कसलाच आवाज नव्हता आणि माझ्या आवडीच्या पुस्तकांवर मात्र Clef चा आवाज नेहमी किणकिणत असायचा...

(..आणि हो, हे आपलं उगाचच.. "तिच्या", "तिने खुण केलेली असतेच तिथे".... जणू काही अशा खुणा करणारी व्यक्ती खरच "स्त्री"च आहे. खरतर ती स्त्री आहे कि पुरुष आहे हे माहिती नाही. पण ती व्यक्ती एक पुरुष आहे हे imagine करण्यापेक्षा ती एक स्त्री/मुलगी आहे हे imagine करणं खूप चांगलं वाटतंय मला. तसाही ५०% chance आहेच कि हे खरं होण्याचा. शिवाय ती व्यक्ती कोण आहे हे मी नाहीच शोधणारे. तसं जास्ती अवघड नाहीये शोधणं, खूप मोठी नाहीचे लायब्ररी आमची. पण तरी नकोच... ती अशीच अज्ञात राहिलेली हवीये मला.. खरच स्वप्नवत आहे हे मग ते तसंच स्वप्नच राहिलेलं आवडेल मला.. पण तरीही राहून राहून आश्चर्य वाटतच राहातं, आणि ते नाही रोखू शकत मी.) असो..

विश्वासच बसतच नाही माझा..
इतक्या कशा पुस्तकांच्या निवडी सारख्या असतील? आवडी पण कशा बहुतेक सारख्याच? 
इतक्या कशा सगळ्याच वाटा सारख्याच असतील? 
तिनेच वाचलेली पुस्तकं मी वाचतोय किंवा तीच तिचं पुस्तक वाचून झालं कि मला देतीये वाचायला, तिला आवडलेल्या गोष्टी सांगतीये मला..असं वाटत राहातं..
कि मीच तिच्या पाऊलखुणावरून चालतोय? नाही, असं कसं होईल? हि वाट तर माझीच होती ना?... माझ्याच आवडीची, माझ्याच निवडीचीहि..ती यायच्या आधीही? याच वाटेने ती सुद्धा गेलीये हे समजायच्या आधीही मी चालत होतोच कि या वाटेने?
काय आहे हे? कोण आहे हि? कि हा पण मी तयार केलेला भासच? प्रतिमांचा खेळ पूर्वीचाच?
पण काहीही असू देत, राहू देत हे असंच....
असू देत असंच तिच्या पाऊलखुणांवरून चालणं, त्या कोणाच्या आहेत हे माहिती नसूनही...
कोणीतरी आहे या वाटेवर माझ्याबरोबर हेही काही कमी नाहीये माझ्यासाठी.. एकटेपणा नाही जाणवत मग चालताना. 
आधी कोणीतरी याच वाटेवरून चालल्याचं समाधान आणि कदाचित ती व्यक्ती जवळपासच कुठेतरी असेल याचा आधार पण वाटतो...
पानापानांवर तिची पायरव अशी ऐकू आली कि सोबत जाणवते तिची.. अंधारात अगदी हातात हात नसला तरी तिचं अस्तित्व मात्र जाणवत राहतं आजकाल...   

असो...नाहीच शोधते मी तिला, पण मग पुस्तक घेतलं हातात कि तिची आठवण होतेच....डोळे शब्द वाचण्याऐवजी तिच्या पाऊलखुणाच शोधात राहतात.
रात्र खूप झालीये आता.. पण हि नवी कोरी आवृत्ती मिळालीये 'पिंगळावेळ'ची.. संपत आलीये वाचून ...'यात्रिक' चाललंय..आरशात बघतोय असा भास होत असतो नेहमी हि गोष्ट वाचताना.. किंवा खूप थकल्याने आपणच डॉन आहोत असं वाटायला लागतं मग..पण मग फरक फक्त इतकाच कि इथे डॉन पण मीच आणि Sancho पण मीच..      
झोपतो आता.. नाही जागवते आता.. या गोळ्या घेऊन जाऊ झोपी..

---------------------------------------------------------
किती शांत झोपलाय, सैरभैर असतो नाहीतर नुसता. गोळ्यांचा उपयोग होतोय तर..
माझ्या राजा, तुझा छातीवरचा tattoo तुझ्यापेक्षा जास्तीवेळा मी बघितलाय. 
त्या clef च्या शेपटीचा लफ्फेदारपणा तुझ्या स्वाक्षरीत तर आहेच पण तुझ्या वागण्यात पण तसाच आहे हे माझ्या पेक्षा जास्ती कोणाला माहिती असेल?
जितक्या तीव्रतेने/intensity ने तू लिहितोस/बोलतोस ते उठतंच कि मागच्या ४-५ पानांवर सुद्धा. तू केलेल्या वारांचे व्रण आहेतच कि माझ्याकडे,दिसतात त्याच्यापेक्षा जास्ती खोलवर उमटले आहेत ते.
केवळ सात पावलं नाही टाकलीयेत बरोबर आपण, हि वाट तुला तुझ्या एकट्याची वाटत असली तरी माझी मूक सोबत असेलच रे. 
तू एकटा नाहीयेस हे तुझ्याच प्रतिमांच्या खेळातून तुला आम्ही पटवून देतोय. इतकंच...

चल, तुझ्या या नवीन कोऱ्या पुस्तकावर खुणा करत बसते आता जरा वेळ. तूच सांगितलेलं असतं सगळं मला, मी फक्त वाक्यांखाली टिंब करते किंवा पानं दुमडून ठेवते...
शेवटी औषधाबरोबर हेही करणं तितकंच महत्वाचं आहे.


So i will help you read those books....
.....and we will put the lonesome back on the shelf!   

Tuesday, December 28, 2010

तहानलाडू - भूकलाडू


लहानपणी कितीदातरी ऐकलेले हे शब्द... अजूनही लहान मुलांच्या गोष्टी वाचतो तेव्हा अडखळतो या शब्दांना....
काय असतात खरच हे तहानलाडू-भूकलाडू?
कसे दिसतात? कसे लागतात? चव कशी असते? आवडतील का आपल्याला? नाही आवडले तर कशाबरोबर  तोंडीला लावावेत? किती दिवस टिकतात? भागते का तहान? भागते का भूक? मावतात त्या पुरचुंडीत? किती लाडु बरोबर घेतात लोकं generally? घरीच बनतात कि विकत मिळतात? कशाचे असतात actually? काय भाव असतो? एका वेळी किती खावेत? जास्ती खाल्ले तर बाधतात का? तोंडाला वास तर नाही ना येत खाल्ल्यावर?
काहीच माहिती नव्हतं त्यांच्याबद्दल..

गोष्टीमधले लोकं/प्रवासी नेहमी खूप दिवस चालतात. कोणाला जवळ नसतंच जायचं-सगळेच लांबच्या ठिकाणाचे प्रवासी. किंवा जवळच्या प्रवासाची कसली आलीये गोष्ट?
मग खूप थकून-माकून ते बसतात एखाद्या जीर्ण झाडाच्या पारापाशी. उन्हाने तापलेले, धुळीने माखलेले, भुकेले, चालून पायाचे तुकडे पडलेले ते बिचारे प्रवासी.
गाठीला बांधलेली आपली पुरचुंडी उघडतात ते आणि त्यात हे तहानलाडू-भूकलाडू असतात त्यांच्या साथीला...
मग प्रवासी ते लाडु खातात. प्रवासाचा शीणवटा जातो सगळा त्यांच्यामुळे. आणि परत नव्यासारखे होतात ते.
नव्या उत्साहाने परत प्रवास चालू राहतो होतो त्यांचा....
.... अशी, इतकीच काय ती त्यांची ओळख होती मला..  

आपलेच जुने शब्द जेव्हा आपलेच "तहानलाडू-भूकलाडू" होतात तेव्हा असंच काहीसं वाटतं..

(लिहणं गरजेचं आहे. कदाचित हा लाडु पुढे जाऊन कोणत्या तरी प्रवासात कामाला येईल...)

Sunday, December 12, 2010

दोघं

भिजल्यामुळे अंगाला शुभ्र सुती कापड जागोजागी चिकटलेल्या स्त्रीचं अर्धनग्न painting जितकं आवडलं तितकंच लांबसडक बोटांनी काही हस्तमुद्रा करत असलेल्या आणि अर्धोन्मीलित डोळ्यांनी शांतपणे  हसणाऱ्या बुद्धाचं painting हि आवडलं.

मी त्या दोन paintings मधून बाजूला झाल्यामुळे त्या दोन paintings ने एकमेकांकडे बघितलं असतं तर ?
तर..
त्या स्त्रीने दुसऱ्या कपड्याने झाकपाक करायची धडपड केली असती कि बुद्धाच्या शांत चेहऱ्याकडे बघून ती तेही विसरून गेली असती?
निथळत्या शरीराकडे पाहून बुद्धाच्या पापण्या जराश्या का होईना किलकिलल्या असत्या का?

Tuesday, November 30, 2010

...काखा वर !

"Safety First!",  "Follow Traffic Rules", "Wear Helmet"  चे पोस्टर्स घेऊन उभे होते शाळेतली पोरं त्या सिग्नलला... 
कपड्यावरून तरी ती मुकबधीर शाळेतली मुलं वाटत होती.
उन्हात उभी होती, भरपूर pollution असलेल्या चौकात, टोपी-मास्क काहीही न घालता...
कितीवेळ उभी राहणार आहेत अशी? माहिती नाही...
काही खाल्लं असेल सकाळपासून? माहिती नाही...
लोकांना traffic rules समजावून सांगावेत असं त्यांना खरच वाटत असेल? वाटत नाही...  
ते असे पोस्टर्स घेऊन उभे राहिल्यामुळे खरच काही फरक पडेल? हेही वाटत नाही...
 
मुकबधीर मुलं म्हणजे केवळ (भावनाशून्य) खांब आहेत असं वाटत असतं  का लोकांना? काहीही अडकवा त्यांच्या गळ्यात - ते काही बोलणार नाहीत, काही विरोध करणार नाहीत...
....शिवाय अशा मुलांकडून हि कामं करून घेतली कि लोकांना जास्ती Appeal होतात...
जसे अगदीच सुमार greetings, मेणबत्त्या, उदबत्त्या त्यांच्या नावावर खपवल्या कि जास्ती खपतात तसं...
किंवा वर्षभरात असे १२-१४ campagnes केले/दाखवले कि donations पण जास्ती मिळतात असा सुप्त हेतू असतो या लोकांचा?                 
 
किती दिवस "Special Children" या गोंडस नावाखाली त्यांच्या disabilities cash करणार आहोत आपण?
"Slumdog Millionair" मधली लहान मुलांना अपंग करून त्यांच्याकडून भिक मागवून घेणारी टोळी आठवली. शिसारी आली... त्यांच्याशी compare करू नये हे मान्य आहे, पण जर तशी आठवण झाली म्हणजे काहीतरी साम्य असेलच ना?
 
जाऊ देत..इथेच थांबवतो. तसंही मला खूप logical, सामाजिक, वैचारिक  इत्यादी  नाहीच लिहिता येत किंवा विचार पण नाही करता येत त्याबद्दल..
(may be हा माझा escape असेल, पण तसंही कोण जाब विचारणारं आहे मला इथे? त्यामुळे चालायचंच)
 

Friday, September 10, 2010

हरितालिका !

"It should not be denied... that being footloose has always exhilarated us. It is associated in our minds with escape from history and oppression and law and irksome obligations, with absolute freedom, and the road has always led West."

Thursday, September 2, 2010

अंगुलीमाल

जंगलातून चालताना अचानक एखाद्या गाणाऱ्या पक्ष्याची सुंदर तान कानावर पडते. अगदी stereo sound - तो आवाज या कानातून जातो ते थेट दुसऱ्या कानापर्यंत...
आपण शोधतो त्या पक्ष्याला पण दिसत नाही तो पक्षी... तो आवाज, ती तान अचानक कानावर येते आणि तशीच अचानक विरूनहि जाते...  अगदी सहजपणे घडतं हे सगळं...

अश्याच सहजतेने कापायचा तो मान वाटसरूंची. कधी, कुठून, कसा उगवेल तो त्या जंगलात ते सांगता नाही यायचं. काही सुचायच्या आत मानेवरून त्याची सुरी फिरलेली असायची - या टोकापासून त्या टोकापर्यंत...
त्या जंगलातून जाणाऱ्या -येणाऱ्याला सतत 'अंगुलीमालची' भीती वाटत असायची. अगणित मानवी बोटांच्या माळा घातलेला अंगुलीमाल !!!
मारायचा , लुटायचा तो वाटसरूंना शिवाय त्यांच्या हाताचं मधलं बोट कापून आपल्या माळेत ओवून टाकायचा. कित्येक पदरी माळ झाली होती त्याची. शेकडो हत्या , शेकडो लोक आणि त्यांची शेकडो मधली बोटं ...त्याला भेटणारा कोणीही अद्याप जिवंत बाहेर पडला नव्हता... अगदी myth किंवा horror फिल्म सारखा प्रकार होता तो. एक बोट आणि (एक) मान कापलेली मानसं सापडायची जंगलाच्या हद्दीवर फक्त ...

पण त्यादिवशी वेगळंच घडलं... हातापायाची बोटं झडलेली, नाकाचा-कानाचा पत्ता नसलेली, अगदी भणंग कुष्टरोगीण त्या जंगलातून चालली होती. गावाबाहेर काढलं होतं लोकांनी तिला. कितेक दिवस उपाशी पोटी राहून, अशा रोगट परिस्थितीत शेवटी तिने निर्णय घेतला - जंगल पार करून दुसऱ्या गावात जायचा. दुसऱ्या गावात या रोगावर इलाज होता. शिवाय तिथल्या लोकांनी कुष्टरोग्यांना accept पण केलं होतं...  जेव्हा जंगल पार करायचा निर्णय घेतला तेव्हा अंगुलीमालचा विचार हि मनात नाही आला तिच्या. फक्त हे गाव सोडून पलीकडच्या गावात जायचा होतं तिला ...तसंही मेल्यासारखं जगत असताना मृत्यूचं भय असतं का ?

त्याने दुरूनच तिला येताना पहिले. अगदी दमून, कष्टाने पावलं टाकत होती ती. इतर लोकांमध्ये जंगल कसबसं पार करण्यासाठी एक धडपड दिसायची, शिवाय एक प्रचंड भीती डोक्यावर घेऊन ते जंगलातून जात असायचे. मात्र हि ? हिला घाई नव्हती, भीती तर अजिबातच नाही. फक्त सोसवत नसूनही, एकेक पाउल टाकणे जड जात असूनही हि चालत होती. तिला केवळ त्या गावात जायचं होतं, कसंही करून- उलट मधेच उरलेला, सुरकुतलेला गळा चिरला गेला असता तर बरंच होतं. झाडाच्या आडोश्याला उभा राहून अंगुलीमाल तिला पाहत होता... किती तरी वेळ... तिचे हाल त्याला बघत नव्हते. त्याचं  लक्ष जेव्हा तिच्या हातांकडे गेलं तेव्हा त्याला लक्षात आलं कि हिच्या हाताला बोटंच नाहीयेत. पहिल्यांदा तो हे असलं काहीतरी बघत होता. त्याचा हात नकळत अंगावरच्या माळेकडे गेला. त्या अगणित बोटांचा स्पर्श जाणवून त्याला कसतरीच झालं. तिला मारून टाकून, लुटण्याचा विचार तर त्याच्या मनातून केव्हाच गेला होता. त्याच्या मनात काहीतरी वेगळंच चाललं होतं....

असं  त्याला कधीच वाटलं  नव्हतं. कितेक माणसांना बघितलं त्याने जाताना या जंगलातून - बेदरकार तरुण, मरणाला घाबरणारे वयस्क, नटलेल्या सुंदर स्त्रिया, गोरेपान पोरं, काळेकुट्ट -धिप्पाड प्रौढ..किती मानसं आणि त्यांच्या देहाचे कितेक आकार, रंग, रग... पण त्याला कधीच ते देह भावले नाहीत... केवळ बोटं असणारी शरीरं इतकंच त्याच्या लेखीत्याचं  महत्व होतं.. फुल खुडताना झाडाकडे किती लक्ष जातं आपलं ? त्याला फक्त बोटं हवी होती.. इतकी बोटं होती त्याच्याकडे आणि आता हे असं शरीर तो बघत होता. बोटं झडलेल, बोटं नसलेलं पण तरीही निर्धाराने चाललेलं....

आणि त्याला प्रेम झालं ...
बदलून गेला मग तो. त्याला काहीच सुचेना... तो कोणालाच मारेनासा झाला... काहीतरी बदल नक्कीच झाला होता त्याच्यात. पण 'काय' ते नव्हतं कळत त्याला. प्रेम म्हणजे काहीतरी असतं आणि ते असंच असेल...अशी त्याची खात्री पटली होती.
"अंगुलीमाल प्रेमात पडला होता".... "अंगुलीमाल एका बोटं नसलेल्या कुष्टरोगी स्त्रीच्या प्रेमात पडला होता"..

पण एक गोची अशी होती कि तिने तर त्याला पाहिलेही नव्हते. तो कसा आहे, कसा दिसतो, कसा राहतो, कसा वागतो ? याच्याबद्दल अफवाच जास्ती. तिला काय माहिती कसा आहे अंगुलीमाल खरंच ?
त्याला मोठा प्रश्न पडला होता "ती करत असेल का आपल्यावर प्रेम ?"

Whether she loves me ? or she loves me not ?
आता हे कसं कळणार ? कसं समजणार ?....पण समजायला तर हवं ना ? काय करायचं ? कसं कळेल ?

Idea !!!!

त्याने त्याच्या आयुष्याची कमाई, त्याची माळ काढली आणि एकेक बोटं घेऊन त्याने सुरु केलं ...
she loves me...
she loves me not...

she loves me...
she loves me not...

एक पदर संपला... दुसरा पण
तिसरा पण...

आता शेवटचा पदर राहिला होता...
जशी जशी माळ संपत चालली होती तसं तसं त्याचा tension वाढत होतं...
she loves me..
she loves me not..

she loves me..
she loves me..... NOT ....
shit ! shit !! shit !!!

त्याने परत मोजली बोटं , परत केलं सगळं count तरी तेच ...she loves me NOT...

इतक्या वर्षात पहिल्यांदा असं काही झालं होतं...आणि हे असं का विस्कटावं ? तो चिडला होता खूप, त्याला ते NOT नको होतं.. तिने प्रेमच करायलाहवं होतं त्याच्यावर. त्याला काहीच सुचेना..
....बास खूप झालं...खूप दिवस नाही मारलं आपण कोणाला.. आता एकाला मारायचं फक्त.. फक्त एक बोट कमीये... ते मिळाला कि - She loves me !!!

आता जे कोणी पहिले दिसेल त्याचं बोट आपलं.... अंगुलीमाल ने एकदा ठरवलं कि बास...
तो उठला आणि निघाला... जंगल भर शोधात राहिला माणसांची निशाणी...
मधला ओढा ओलांडला कि मिळतील मानसं... नाहीच मिळाली तर जंगलाची वेस ओलांडू , वस्तीतून आणू  कोणाला तरी..

गंजत आलेल्या हत्याराला धार करायला त्याने ओढ्यातला दगड शोधला.. आणि पाणी घ्यायला खाली वाकला तो. तितक्यात त्याला आपल्याच हाताचं प्रतिबिंब  दिसलं पाण्यात.
राकट हात आणि निबर बोटं स्वतःचीच... क्षणभर थांबला तो.
आणि दुप्पट वेगात धार करायला लागला सुरीला.. दगड झिजत चालला होता आणि हत्यार चमकायला लागलं होतं... त्याने बोट लावून धार बघितली.. मनासारखी वाटली त्याला.. 

..दुसऱ्याच क्षणी त्याने स्वतःच्या डाव्या हाताचं मधलं बोट सर्रकन कापून टाकलं..  
Now .... She Loves अंगुलीमाल !!! 

Wednesday, July 14, 2010

"जलने में क्या मजा है ?" ज्यांना माहिती आहे त्यांनी हात वर करा! 'परवाने' गप्प बस, तू नको सांगूस!!

"जलने में क्या मजा है, परवाने जानते है !"
किती दिवस आपण त्याच त्या घासून गुळगुळीत झालेल्या, खाऊन खाऊन चोथा झालेल्या, हजारो लोकांनी एक करोड वेळा वापरलेल्या उपमा वापरणार आहो ? 
तीच ज्योत, तीच आग आणि तेच आगीकडे झेपावणारे पतंग ... बाकी कुठेच दिसत नाही का असा पतंगासारखा वेडेपणा ?

पाहीला तर दिसेलही..
  
तसं पाहिलं तर पावसाच्या थेंबांना काय अस्तित्व आहे स्वतःचं ? 
ढगात असताना वाफेचे पाणी असतात ते नुसते आणि जमिनीवर पडले कि एक तर मुरून जातात किंवा ओहोळात मिसळून जातात...
पावसाच्या थेंबांना त्यांचं असं स्वतंत्र अस्तित्व केवळ पडतानाच असतं.....फक्त आभाळातून खाली पडेपर्यंत...बास...     
तेव्हाहि ते एका इर्षेने, एकाच ध्येयाने, केवळ जमिनीवर पडायच्या एकाच वेडाने पिसाट असतात...
बेभान होऊन बरसात असतात ते. कशाची पर्वा न करता, कशालाही न जुमानता....  
केवळ जमिनीत सामावून जाऊन स्वतःचं  अस्तित्व संपवून टाकायचं इतकंच त्यांना माहिती असतं...
जे तसे बेभान होऊन जमिनीवर पडता आणि स्वतःला संपवून टाकतात ते खूप lucky , त्यांना त्यांची मंझील मिळालेली असते ...

पण काही कुठेतरी अडकून पडतात. तारांना, पानांना, दोऱ्यांना अडकून राहतात. पागोळ्या होऊन लटकत राहतात..       
 
त्या पागोळ्यांकडे एकदा नीट पहा... त्या थेंबाच्या जमिनीकडच्या सर्वात खालच्या टोकाकडे पहा.. मातीत मुरायची, रुजायची जीवघेणी इच्छा ठासून भरलेली असते त्यात.
पागोळीचा सगळा आत्मा त्या एका टोकाला साठून राहिलेला असतो. टच्च भरलेलं ते टोक जमिनिकडे अनिवार ओढीने बघत असतं.
"Creation of Adam" मध्ये Adam आणि देवाची बोटं एकमेकांना चिकटलेली नाहीयेत, त्यामुळे ती बोटं touch व्हावीत याची आतुरता किंवा ओढ जी त्या चित्रात जाणवते तीच मला इथे दिसते. पागोळी आणि जमीन यांच्यामध्ये !!  
कधी एकदा फांदीवरून तुटते आणि जमिनीवर पडते असं झालेलं असतं त्या पागोळीला..
...ती जमिनीत मुरून, स्वतःचा अस्तित्व संपवूनच 'पूर्ण' होणार असते.... असं स्वतःचं अस्तित्व संपवून टाकणं हेच तिचं जीवन असतं खरतर... 
त्यातच तिला मजा असते ..

....आपण नुसते बघत बसतो पागोळ्यांकडे पण त्यांच्यातली ओढ कळत नाही आपल्याला आणि आपण मुर्खासारखे गुणगुणत राहतो ..."जलने में क्या मजा है .... "   

Monday, July 12, 2010

Silent Invocation - D

गेली कित्येक वर्षं माझा mobile silent वरच होता.... 
 
माझा पहिला mobile भारीतला होता. भावाने घेऊन दिलेला. आडवा होता mobile तो With memory card, songs , games, etc...
मस्त ringtones हि होत्याच शिवाय गाण्यांच्या ringtones पण देता यायच्या. full आवाजात लावायचो, सतत गाणे वाजत असायचे त्यातून....
32mb memory कार्ड मध्ये बसतील तितके songs सतत वाजत राहायचे.   
पण मग दोन्ही गेले..
 
त्यानंतर एकदम साधे mobile वापरत होतो ३-४ वर्ष. Basic models एकदम.  
ठीकठाक दिसायला, आवाज पण चांगला नसायचा त्यांचा. ringtones पण भारी नाहीत अजिबात. त्यामुळे ते कायम silent वर असायचे..
सतत नुसते vibrator वर, फक्त मला ऐकू यावी त्यांची भुणभुण हे कारण. ते mobiles फक्त माझ्याशीच बोलायचे, बोलायचे पण नाहीत खरतर नुसतेच खुणवायचे .  
इतके शांत होते ते कि मलाच माझ्या जुन्या mobiles चा आवाज माहिती नव्हता कि त्यांचे ringtones माहिती नव्हते... 
त्यांचा आवाज विसरलो होतो हे हि नाही म्हणता येणार उलट मी त्यांचा आवाज कधी ऐकलाच नव्हता.
ते गप्प-बिचारे आवाज नाही करायचे किंवा त्यांचा आवाज मीच दाबून टाकला होता.... 
त्यात inferiority  चा पार्ट होता मान्य आहे पण तो कमी होता... 
उलट त्याने/त्यांने आवाज करू नये, किंवा त्याचा आवाज कोणी ऐकेल कि नाही किंवा त्याच्या आवाजावर लोकं टीका करतील...असं  काहीतरी वाटायचं...
किंवा एकूणच फोन कमी यायचे/येतात त्यामुळे तो कुठेतरी लपून, गप्प असायचा... कधी चुकून माकून आलाच फोन तर हळूच सांगायचा मला तो कोणालाही न कळू देता.
 
....keep your voice to yourself;
Nor should you tinkle and toll your tongue.! सारखं
 
...आणि मी लोकांना सांगायचो कि मला technology नाही आवडत, फोन फक्त call करण्यासाठी असतो, माझ्या कडे बाकी camera, pc आहे त्यामुळे high-fundoo मला गरज नाहीये...अशी काहीही कारणं  देऊन वेळ मारून न्यायचो..आणि इतकं भारी पटवून द्यायचो कि त्यांना खरंच वाटायचं...
 
परवा नवीन mobile घेतला. E - 71 ....
तुला वाटलं असेल कि मी माझ्या mobile चं किती उगाच कौतुक करतोय....
पण कारण असंय कि खूप दिवसांनी माझा mobile आता आवाज करायला लागलाय... त्याचा स्वतःचा आवाज.., मस्त, भारी , सगळ्यांपासून उठून दिसणारा आवाज.... त्याला ओरडून सांगायचं कि - मला पण आता फोन येतात खूप, sms येतात खूप, आणि मला पण आता मस्त गाता येतं (rather गावं असं वाटतंय...) 
परवा जेव्हा नवीन mobile घेतला तेव्हा त्याचा तो आवाज परत आला...  माझ्या साठी ते खूप symbolic आहे...
कारण...
 
कित्येक वर्ष "मी"च silent वर होतो.... 

Thursday, May 20, 2010

कंसामधलं ......


इतकं अति झालंय हे आयटी-बीटीचं खूळ कि वळीव सुद्धा आजकाल Smells Like Software Engineer. आठवडाभर राबराब राबून सगळी भडास weekend ला किंवा friday संपत आला कि काढतो आम्ही. तसंच होतंय हल्ली. आठवडाभर खूप उकडतं आणि मग friday eve ला वगैरे हा वळीव/पाउस फॉर्मात येतो. गेले ४ आठवडे असंच चाललंय. अगदी mainstream पावसासारखा आणि आयटीवाल्यासारखा वागतोय हा. तसा कलंदरच होता तो... 
---
३ friday असेच गेले. late 20's मधल्या कामाच्या जबाबदाऱ्या आणि 'वयोमानपरत्वे लग्न' जमल्यामुळे लग्नातले ओसरलेले अप्रूप यामुळे courtship मध्ये असूनही पाऊस (आणि तो पण भन्नाट, वळीवाचा) एकत्र बघावा असे दोघांनाही वाटले नाही कधी. 
पण मग चौथ्या शुक्रवारी वातावरण मस्त झालं होतं. gallery मध्ये आला तो आणि कामानिमित्त तिला फोन केला. तितक्या जोरात वारा सुरु झाला. जास्ती काही ऐकू येईना.
त्याच्या तोंडून वेळ मारायची म्हणून सहज निघून गेलं "तुमच्याकडे आहे पाऊस ?......जर तुला काही urgent काम नसेल तर भेटायचं का आज ?" ...
तिला पण ऐनवेळी काही कारण सुचेना सो ती पण "हो" म्हणून गेली
arrange marriage  मध्ये असे अवघडलेले क्षणच जास्ती !! 
एकाच बेंच वर बसलेले दोघं, पण दोघांचा पाऊस वेगळा होता. आणि वेगळेवेगळे भिजत होते दोघं त्यात.

पाऊस गडगडाट करेल, विजा चमकावेल, घाबरून सोडेल. पण शेवटी दुसऱ्याच्या कुशीत/मिठीत शिरण्याचा निर्णय हा आपलाच असतो. सांडायचंच नाही ठरवलं तर असंच  ओथंबून राहता येतं. 

किती वेळ नुसता पाउस ऐकणार म्हणून त्याने नेहमीचा typical प्रश्न टाकला. "तुला मातीचा वास आवडतो ?" ..तो  
"हो...असाच ...आणि या वळवाचं हेच आवडतं मला..नेहमीच्या पावसाला नाही येत हा वास." .....ती 
"तुला काय वाटतं मातीचा हा वास मातीसाठी काय असेल ? ..scent , perfume or deodorant ?" ....तो..आणि उत्तराची वाट न पाहता सांगायला लागला...

"पाउस मला merchant navy मधला नवरा वाटतो जमिनीचा. पूर्ण वर्षात ४च महिने बरोबर राहून वर्षभर पुरेल इतकं देणारा. किंवा वळीव म्हणजे parole वर सुटून आलेला, भेटायला आसुसलेला, शिक्षा भोगणारा नवरा... आणि मग जेव्हा तो भेटायला येतो तेव्हा हि माती, हि जमीन आपला अगदी ठेवणीतला scent लावते. किंवा 'जब्भी खयालों में तू आये मेरे बदन से खशबू आये' म्हणणारी रेखाच वाटते. मातीचा हा गंध म्हणजे ठेवणीतला, उंची Scent च !!!!"  ..........तो 
कंसामध्ये तो --( त्याला खूप आठवण आली मेघनाची.. मोरापेक्षाही जास्ती पाउसवेडी पोर ती आणि मोरपिसाहून हळवी. तिला सगळा पाऊस आवडायचा -- पहिला पाऊस , दुसरा पाऊस , तिसरा,... सातवा, त्रेपन्नावा...... अगदी शेवटचा पाऊसहि भरभरून जगला  तिने. खूप दिवसांनी एकत्र पाऊस झेलत होतो त्यावेळीची हि तिचीच वाक्यं ! हळव्या पोरीच्या या हळव्या कल्पना आणि उपमा पण. "चुकलो मी, नाही सोडून जाणार परत " असा म्हणत त्याने तिला घट्ट मिठीत घेतलेला. पाण्याने भिजलेल्या तिच्या दाट पापण्या काजळासारख्या भासत होत्या, त्याने हळूच भिजल्या पापणीवरल्या पागोळ्या ओठांनी टिपून घेतल्या..'i luv u like this rain, meghana' ...'...like rain का ?'  ... 'असंच..निघून गेलं तोंडातून'  )

ती... "hmmm...." तिने दीर्घ श्वास घेतला आणि एकदा परत मातीचा तो गंध भात्यात भरून घेतला...

ती..."पण मला काय वाटतं सांगू ? deodorant आहे तो मातीचा. उन्हाने त्रासलेली असते ती तीनेक महिने. घामेघूम, तापलेली. ना काही सावली ना गार झुळूक एखादी. सुस्त पडून असते. आणि हा पाऊस असा अचानक येतो. जोरात, काही नं सांगता, बेधडक...तिची प्रचंड तारांबळ उडते..काहीच आवरलेलं नसतं तिने. surprise visit याची. ऐनवेळी कपाटातला जो   perfume हाताला येईल तो वापरते ती. deodorant च आहे हा तिचा. अशी विस्कटलेली ती माती कसाबसा deodorant मारून भेटायला पळते पावसाला. मातीचा हा गंध म्हंजे तिचा deodorant च "
कंसामध्ये ती --( तिला अचानक cigarette, घामाचा आणि घामाला लपवायला जरा जास्तीच मारलेल्या deodorant चा mixing होऊन जो पुरुषी वास येतो तो आला. यतीन आठवला तिला अचानक. आपल्या कोवळ्या भावनांना त्याच्या करड्या मिठीत कुस्कारणारा. पण तिला तेच आवडायचं..त्याचा पुरुषी अहंभाव, तो बेरकीपणा, तो मस्तवालपणा. मातीच्या वासाची deodorant शी केलेली तुलना त्याचीच. त्याचीच वाक्यं तिने टाकली. त्याच्या जाड्याभरड्या खरबरीत हातांचा स्पर्श आणि असल्या निबर भावना यांचंच तिला भारी वेड. भर पावसात हे वाक्यं बोलून त्याने तिला घट्ट मिठीत घेतलेले. हि आपली त्याच्या अंगाच्या तीव्र दर्पात मातीचा वास आणि स्वतःला विसरलेली. कोंडलेल्या श्वासामुळे तिला तिच्या मनातलं सांगता हि येईना. त्याची "luv u" म्हणायची हि पद्धत अशीच रानटी, पुरुषी ... )

तो ..."हे...हे.. good भारीये हि deo ची उपमा :D :D . तुम्ही मुली नाहीतरी जास्तीच practical असतात..."  ooops आपण काहीतरी चुकीचं बोललो हे त्याला समजलं. सावरून घेण्यासाठी ...
"but we really complement each other !!! "  

पाऊस चालूच होता. परत केवळ पावसाचाच आवाज येत होता...बराच वेळ...
तो ...."या क्षणी 'complement' च्या ऐवेजी मी तुला "love u" म्हणायला हवं होतं ना ?"
ती ..." जवळ येऊ जरा मी तुझ्या ??"  
तरीही पाउस चालूच होता..फक्त आता दोघे एकाच पावसात भिजत होते इतकंच ........ दोघांचा पाउस आता एकच झाला होता.

----
कंसातलं कंसातच राहायला हवं का ? त्यानंतरचा प्रत्येक पाउस त्यांचा कंसामधला भूतकाळ पुसत गेला. नाहीतरी पाउस असतो कशासाठी ??
And they still lived happily ever after...............