Pages

Showing posts with label Dream of 2 Leaves. Show all posts
Showing posts with label Dream of 2 Leaves. Show all posts

Monday, April 25, 2011

Rapunzel


कठड्यावरून डोकावत वर आलेला सूर्य आरशामधून दिसायचा तिला. मग न्याहाळता नाही यायचं तिला, चमकत राहायचा आरसा. 
आरसा असा चमकला कि म्हातारी यायची वेळ झालेली असायची...  केस सांभाळत Rapunzel उठेपर्यंत खालून आवाज ऐकू यायचा..     
"Rapunzel, Rapunzel, let down your hair, so that I may climb the golden stair"
म्हातारी चढून वर आली कि कितीतरी वेळ बघत रहायची तिच्याकडे... केस उपटून तोडून टाकल्याचं नाटक करून म्हातारी तिची दृष्ट काढायची...
दिवसभर मग कौतुक चाललेलं असायचं, हजार प्रकारे तिच्या इतक्या मोठ्या केसांच्या वेण्या घालत बसे म्हातारी.. दोन म्हातारे हात दिवसभर तिच्या केसांना गोंजारत बसायचे.. आणि हे करत असताना हजार गोष्टी बोळक्या तोंडाने म्हातारी सांगत बसायची. 
"बाहेरचं जग किती  वाईट आहे, पिसासारखी तू इथे कशी सुखात आहेस. किती दुःख आहेत बाहेर, या उंच मनोऱ्यापर्यंत कोणतीच दुःख कशी पोहोचू शकणार नाहीत" असे एक ना हजार किस्से रोज नवीन उत्साहाने सांगत बसायची म्हातारी. 

कधीच न पाहिलेल्या बाहेरच्या जगाचं असं चित्र Rapunzel ने म्हातारीने दिलेल्या रंगाने रंगवले होते. 
कंटाळून मग सूर्य पण कठड्यावरून उडी मारून फरार व्हायचा. संध्याकाळच्या प्रकाशात लालसर चमकणाऱ्या केसांच्या दोरीने म्हातारीपण तिच्या महालात जायची.

दिवसभर केसात अडकून राहिलेल्या सूर्याची किरणे सोडवत बसायची ती. सुटलेली ती किरणं संध्येला अजून रंगीत करत राहायचे. म्हातारीने लाडाने घातलेल्या वेण्या सोडताना म्हातारीने डोक्यात भरवलेल्या गोष्टीपण सोडून देण्यासाठी गात बसायची ती.  
आवडत्या कंदिलात वात लावून दिवा पेटवेपर्यंत खालून अजून एक हवीहवीशी हाक ऐकू यायची.        
"Rapunzel, Rapunzel, let down your hair, so that I may climb the silver stair"
दिवसभर उन्हातानात मेंढ्यामागे भटकणारा गुराखी तरुण खाली हसत तिला हाक मारायचा. हाक इतक्या उंचावरच्या मनोऱ्यापर्यंत पोहोचेपर्यंत Rapunzel चे केस खाली पोहोचलेले असायचे.   आल्याआल्या त्याच्या घामट मिठीमध्ये विस्कटून जायची ती, केसांसकट. 
आवडत्या कंदिलातली वात काढून ती त्याने आणलेल्या आकाशकंदिलात लावायची. तिच्या एका केसाला आकाशकंदील बांधून हवेत उडवायचा तो. कितीतरी वेळ आकाशात उडणाऱ्या त्या दिव्याकडे बघत ते सगळे ग्रह, तारे फिरून यायचे. 
तो तिला बाहेरच्या जगाची सुंदर-सुंदर चित्र काढून दाखवायचा. म्हातारीने दिवसा सांगितलेल्या सगळ्या गोष्टी तो रात्री पुसून टाकायचा.
कंदिलातली एकुलती एक वात प्रकाश सांडत आकाशात फिरत असायची आणि खाली हे दोघं अंधारात आकार-उकार-हुंकारांची चित्र रेखाटत बसायची.    

कधीच न पाहिलेल्या बाहेरच्या जगाचं असं चित्र Rapunzel ने तिच्या गुराखी-राजकुमाराने दिलेल्या रंगाने रंगवले होते. 
रात्रीबरोबर रात्रभर फिरून-थकून, डोळे किलकिले करत आकाशकंदील पण जमिनीवर उतरायचा. Rapunzel चे डोळे उघडायच्या आधीच चंदेरी चमकणाऱ्या केसांच्या दोरीने तो गुराखी त्याच्या माळावर परत जायचा. 

म्हातारीच्या गोष्टी डोक्यात जास्ती वेळ राहायच्याच नाहीत. त्या तरुणाच्या गोष्टी मात्र डोक्यात सतत फिरत राहायच्या, काहीतर पोटापर्यंत जाऊन बीज होऊन रुजल्या होत्या.
त्यारात्री चंद्राच्या प्रकाशात तिने हे त्याला सांगितलं, ती सांगत असताना तो मात्र आकाशकंदील आखडून घेत आहे याची जाणीवही नाही झाली तिला. 
त्यारात्री लवकरच आकाशकंदील खाली आला. 
अजून पेरभर वात शिल्लक होती. 
कंदिलाच्या त्या मिणमिणत्या प्रकाशातही चमकणाऱ्या केसांच्या दोरीने तो खाली उतरला. माळावर नाही गेला तो. कुठे गेला कोणालाच नाही कळलं. 

कोणी रंगवून सांगितलेलं जग खरं? दिवसा म्हातारीने सांगितल्यासारखं  कि रात्री त्याने दाखवल्यासारखं ?
कि दोन्ही जग खोटीच? आपण नाहीच पहिलीत ती. कसा विश्वास ठेऊ त्यांच्यावर? 
दोघांनी केवळ त्या जगाची स्वप्न दाखवली. कोणीही नेऊन का नाही आणलं मला त्या जगात?
कि दोघांनी मी हवी होते? केवळ मी? या बंद मनोऱ्यातली 'बंधिस्त Rapunzel'?
 
"Rapunzel, Rapunzel, let down your hair, so that I may climb down the stony stair"  
स्वतःलाच हाक मारली तिने.. आणि स्वतःच ओ पण दिला.
स्वतःला शेवटचं न्याहाळून आरसा फोडून टाकला तिने. आरश्याच्या काचेने केस कापून टाकले स्वतःचे. 
कठड्याला एक टोक बांधून उतरली ती तिच्या मनोऱ्यावरून. 
उतरल्या उतरल्या दुसऱ्याच पावलाला ठेचकाळली ती. आवडत्या कंदिलाला थोडा तडा गेला.

म्हातारीचे आणि गुराखी-तरुणाचे रंग घेऊन ती त्यांने रंगवलेल्या जगात एकटीच निघाली. दोघांनी रंगवलेल्या चित्रांशी खरं जग कुठेच जुळत नव्हतं. दोन्ही चित्र खोटीच निघाली.
काट्याकुट्यातून, दऱ्या-खोऱ्यातून, नदीनाले पार करत ती खरं जग आता पाहत होती. 
घासातला घास देणारे हात आणि बरबटलेल्या नजरा झेलत होती ती.
दोघांचे सगळे रंग एकत्र होऊन नवीनच काहीतरी रंग तयार व्हावा तसं जग होतं हे. 
कितेक दिवस सगळं सहन करत, सोसत राहिली ती. खूप त्रास भोगला तिने, खूप चांगली मानसं पण पहिली.
पण जसजसे पोट दिसायला लागले होते तसं तसं शरीरपण थकत चाललं होतं. 
शेवटी तिने ठरवलं.
         
"Rapunzel, Rapunzel, let down your hair, so that I may climb the final stair"  
इतके दिवस ते दोघं याच वाटेने माझ्यासाठी स्वप्न घेऊन वर येत होते. आता याच केसांच्या दोरीने सत्य घेऊन वर चढायचं आपल्या मनोऱ्यात परत. शेवटचं.. मग बंधिस्त..
रुक्ष-राठ झालेल्या, काचणाऱ्या केसांच्या त्या दोरीने ती भर उनात कशीबशी वर चढून गेली. 
कठड्यावरून अक्षरशः अंग टाकून दिलं तिने आत. ग्लानी आली होती तरी उठून तिने कठड्याला बांधलेली केसांची गाठ आधी सोडली...
आता कोणी खालून कोणी हाक मारायला नको, कोणी वर यायला नको आणि कोणी खालीही जायला नको. 
ते जग सुटलं, त्या जगाशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध आणणारे हे लांबसडक केसहि नकोत.
Rapunzel आता या केसांशिवाय जगेल. 
जगाशी काहीच संबंध न ठेवता जगेल.

शेवटचे २ महिने खूप वाईट गेले तिचे, सतत उलट्या व्हायच्या तिला. 'अति उलट्या म्हणजे बाळाला जावळ खूप' असं ऐकलेलं तिने.

त्या रात्री कितीतरी आकाशकंदील आकाशात तरंगत होते. इकडून तिकडे आकाशात आतिषबाजी चालू होती. उल्कावर्षावाने सगळी रात्री पेटून उठली होती. 
आजवर पाहिलेल्या रात्रीच्या आकाशापेक्षा हि रात्र खूप जास्ती प्रकाशमान होती. Rapunzel च्या स्वप्नात नेहमी येणारे 'उडणारे आकाशकंदील' ते हेच होते.
प्रसवकळा विसरायला लावणारी रात्र होती ती. रात्रभर जागीच होती ती. सकाळ होत आली तरी ते दिवे जमिनीवर येईनात. 
सूर्यपण डोंगराडून रात्रीची हि आतिषबाजी बघत रेंगाळला होता. त्याची काही अति-शिस्तीशीर किरणं वेळ पाळून घुसली होती आकाशात. 
रात्रीचे म्हातारे रंग आणि पहाटेचे तरुण रंग एकमेकांत मिसळले होते. ती रात्र पण नव्हती आणि दिवस पण नाही. 
दोघांचेही रंग नव्हते ते. 
सगळ्या रंगांचं अजब सुंदर चित्र आकाशाच्यापटावर रंगलेलं होतं..

त्या दोघी रात्र आणि पहाटेचं हे सुंदर चित्र अनिमिष डोळ्यांनी पाहत होत्या.

Rapunzel च्या 
चेहऱ्यावर
 प्रसववेदनेची आभा होती. कुशीतल्या बाळाला उबेत घेत होती ती.
आणि कुशीतल्या लहानग्या जीवाचे किरमिजी-टपोरे डोळे आकाशातले ते रंग टिपत होते. 
सोनेरी-चंदेरी-निळ्या-लाल-भगव्या प्रकाशात बाळाचे लांबसडक केस चमकत होते... 

तेच लांबसडक केस....जगाशी जोडणारे....परत    
"Rapunzel, Rapunzel, let down your hair, so that I may climb the colorful stair" 

Wednesday, January 26, 2011

Rachel Greathouse!


आजकाल दरवेळी लायब्ररीमधून पुस्तक घेताना चोविसावं पान उघडून बघतो. तिने खुण केलेली असतेच तिथे, "Clef" ची musical note. अगदी माझ्या छातीजवळ गोंद्लेल्या tattoo सारखी. ditto

लायब्ररीमधून आपल्या मनाचं पुस्तक घ्यायचो, अगदी आपल्या आवडीचं. जे ठरलेले लेखक आहेत त्यांचीच किंवा नेहमीच्या genre ची पुस्तक घ्यायचो. किंवा कोणीही न वाचलेली-अगदी करकरीत कोरी पुस्तकं पण कधीकधी. वेगळ्या वाटेवर लिहिणाऱ्या कोणाचीही पुस्तकं घ्यायचो मी
कधीकधी आपल्या वेगळ्या निवडीचं उगाच कौतुक वाटायचं. 'सहा फूट माणसांच्या गर्दीत सव्वासह फूट असणे' इतकाच काय तो फरक, पण तरीही चांगलं वाटायचं... पण तरीही  दरवेळी 'आपण सोडून हि पुस्तकं कोण वाचत असेल?' असा प्रश्न पडायचाच. मग पुस्तकाच्या शेवटी जायचो. शेवटच्या पानावर लायब्ररीवाल्या बाईने शिक्के मारलेले असायचे. वर्षानुवर्षाचे date-stamps सापडायचे. बरीच पुस्तकं महिने-महिने पडून राहिलीत अशा तारखांच्या नोंदी सापडायच्या.
एकतर ती पुस्तकं लायब्ररीच्या शेल्फ मधेच पडून राहिली असतील किंवा वाचणाऱ्याने त्याची हजार पारायणं तरी केली असतील असा(उगाच) अंदाज बांधत परत वाचायला लागायचो...

पहिल्यांदा जेव्हा चोविसाव्या पानावरची ती खुण पाहीली तेव्हा थबकलो होतो. आरशात जाऊन परत माझा tattoo पाहून घेतला. 
माझ्या चोविसाव्या वाढदिवसाला काढलेला तो tattoo... 'S' शी साम्य म्हणून आणि काहीतरी musical हवं छातीशी म्हणून Clef ची sign काढलेली...
चोविसाव्या पानावर Clef ची ती musical note त्याच्या लफ्फेदार शेपटीसकट अगदी जशीच्या तशी होती... 
शिवाय दाबून काढलेलं अक्षर, मागच्या ३-४ पानांवर उमटलं होतं.
जरावेळ थांबून सगळं पुस्तक कितेकदा तरी चाळलं. अजून कितीतरी खुणा सापडल्या- माझ्या आवडत्या बऱ्याचश्या वाक्यांच्या खाली टिंबाच्या पुसटश्या खुणा होत्या, दुमडलेल्या पानांवरचे उतारे पण बहुतेक माझ्याच आवडीचे, पुस्तकातल्या नेमक्या माझ्याच आवडीच्या कथांची पानं खिळखिळी झालेली वाटली - परतपरत खूप वेळा वाचून त्या कथेच्या आजूबाजूच्या पानांच्या घड्या सैल झाल्यासारख्या वाटत होत्या....
मग नंतरच्या प्रत्येक पुस्तकावर सापडली ती खुण, त्या खुणा... पूर्वी घेतलेली जुनी पुस्तकं पण चाळली, त्यावर पण त्याच खुणा सापडल्या. कदाचित आधीच्या पारायणा त्या दिसल्या नव्हत्या.
मला न आवडणारी पुस्तक पण चाळली, पण त्यावर त्या खुणा नव्हत्या. अगदी माझे नावडते पण प्रसिद्ध लेखक पण पिंजारले, त्यांच्या पुस्तकांची २४ वी पानं अगदी कोरी होती.
बाकी कोणत्याच पुस्तकांवर या खुणेचा कसलाच आवाज नव्हता आणि माझ्या आवडीच्या पुस्तकांवर मात्र Clef चा आवाज नेहमी किणकिणत असायचा...

(..आणि हो, हे आपलं उगाचच.. "तिच्या", "तिने खुण केलेली असतेच तिथे".... जणू काही अशा खुणा करणारी व्यक्ती खरच "स्त्री"च आहे. खरतर ती स्त्री आहे कि पुरुष आहे हे माहिती नाही. पण ती व्यक्ती एक पुरुष आहे हे imagine करण्यापेक्षा ती एक स्त्री/मुलगी आहे हे imagine करणं खूप चांगलं वाटतंय मला. तसाही ५०% chance आहेच कि हे खरं होण्याचा. शिवाय ती व्यक्ती कोण आहे हे मी नाहीच शोधणारे. तसं जास्ती अवघड नाहीये शोधणं, खूप मोठी नाहीचे लायब्ररी आमची. पण तरी नकोच... ती अशीच अज्ञात राहिलेली हवीये मला.. खरच स्वप्नवत आहे हे मग ते तसंच स्वप्नच राहिलेलं आवडेल मला.. पण तरीही राहून राहून आश्चर्य वाटतच राहातं, आणि ते नाही रोखू शकत मी.) असो..

विश्वासच बसतच नाही माझा..
इतक्या कशा पुस्तकांच्या निवडी सारख्या असतील? आवडी पण कशा बहुतेक सारख्याच? 
इतक्या कशा सगळ्याच वाटा सारख्याच असतील? 
तिनेच वाचलेली पुस्तकं मी वाचतोय किंवा तीच तिचं पुस्तक वाचून झालं कि मला देतीये वाचायला, तिला आवडलेल्या गोष्टी सांगतीये मला..असं वाटत राहातं..
कि मीच तिच्या पाऊलखुणावरून चालतोय? नाही, असं कसं होईल? हि वाट तर माझीच होती ना?... माझ्याच आवडीची, माझ्याच निवडीचीहि..ती यायच्या आधीही? याच वाटेने ती सुद्धा गेलीये हे समजायच्या आधीही मी चालत होतोच कि या वाटेने?
काय आहे हे? कोण आहे हि? कि हा पण मी तयार केलेला भासच? प्रतिमांचा खेळ पूर्वीचाच?
पण काहीही असू देत, राहू देत हे असंच....
असू देत असंच तिच्या पाऊलखुणांवरून चालणं, त्या कोणाच्या आहेत हे माहिती नसूनही...
कोणीतरी आहे या वाटेवर माझ्याबरोबर हेही काही कमी नाहीये माझ्यासाठी.. एकटेपणा नाही जाणवत मग चालताना. 
आधी कोणीतरी याच वाटेवरून चालल्याचं समाधान आणि कदाचित ती व्यक्ती जवळपासच कुठेतरी असेल याचा आधार पण वाटतो...
पानापानांवर तिची पायरव अशी ऐकू आली कि सोबत जाणवते तिची.. अंधारात अगदी हातात हात नसला तरी तिचं अस्तित्व मात्र जाणवत राहतं आजकाल...   

असो...नाहीच शोधते मी तिला, पण मग पुस्तक घेतलं हातात कि तिची आठवण होतेच....डोळे शब्द वाचण्याऐवजी तिच्या पाऊलखुणाच शोधात राहतात.
रात्र खूप झालीये आता.. पण हि नवी कोरी आवृत्ती मिळालीये 'पिंगळावेळ'ची.. संपत आलीये वाचून ...'यात्रिक' चाललंय..आरशात बघतोय असा भास होत असतो नेहमी हि गोष्ट वाचताना.. किंवा खूप थकल्याने आपणच डॉन आहोत असं वाटायला लागतं मग..पण मग फरक फक्त इतकाच कि इथे डॉन पण मीच आणि Sancho पण मीच..      
झोपतो आता.. नाही जागवते आता.. या गोळ्या घेऊन जाऊ झोपी..

---------------------------------------------------------
किती शांत झोपलाय, सैरभैर असतो नाहीतर नुसता. गोळ्यांचा उपयोग होतोय तर..
माझ्या राजा, तुझा छातीवरचा tattoo तुझ्यापेक्षा जास्तीवेळा मी बघितलाय. 
त्या clef च्या शेपटीचा लफ्फेदारपणा तुझ्या स्वाक्षरीत तर आहेच पण तुझ्या वागण्यात पण तसाच आहे हे माझ्या पेक्षा जास्ती कोणाला माहिती असेल?
जितक्या तीव्रतेने/intensity ने तू लिहितोस/बोलतोस ते उठतंच कि मागच्या ४-५ पानांवर सुद्धा. तू केलेल्या वारांचे व्रण आहेतच कि माझ्याकडे,दिसतात त्याच्यापेक्षा जास्ती खोलवर उमटले आहेत ते.
केवळ सात पावलं नाही टाकलीयेत बरोबर आपण, हि वाट तुला तुझ्या एकट्याची वाटत असली तरी माझी मूक सोबत असेलच रे. 
तू एकटा नाहीयेस हे तुझ्याच प्रतिमांच्या खेळातून तुला आम्ही पटवून देतोय. इतकंच...

चल, तुझ्या या नवीन कोऱ्या पुस्तकावर खुणा करत बसते आता जरा वेळ. तूच सांगितलेलं असतं सगळं मला, मी फक्त वाक्यांखाली टिंब करते किंवा पानं दुमडून ठेवते...
शेवटी औषधाबरोबर हेही करणं तितकंच महत्वाचं आहे.


So i will help you read those books....
.....and we will put the lonesome back on the shelf!   

Sunday, February 21, 2010

Graffiti !

....नाहीतरी मी काय करतो ? ब्लॉगच्या या पांढर्या भिंतीवर Graffiti च काढतो. चित्रकला काडीची येत नसूनही !

भिंतीवर काही गणितं लिहून दिली होती मृणालला. अवघ्या १० मिनिटात "Multiplication With Carry Over" शिकली ती.
...पण तरी चिडले वडील मृणालवर 'भिंत खराब केली' म्हणून. माझीच आयडिया होती पण बोलणे तिला खावे लागले. Asian Paint Royal ची- सैफअली खान ची - Ad आठवली.

खरतर भिंत आणि त्याला पेंट करतानाचा Scene मला नेहमीच खूप Romantic वाटत आलाय. मग तो RHTDM मधला "चुराया चुराया " चा असो वा 'आर्यन' सारख्या बकवास फिल्म मधलं "जानेमन" गाणे असो. किंवा सैफचीच Royal Play ची advt.
पूर्ण मोकळं घर - आणि त्यात दोघंच - घराला आपल्या मनासारखे रंग भरताना. ते रंग देतानाचे moments खूप मस्त वाटतात. नव्याकोऱ्या डायरी मध्ये आपले पहिले-वाहिले शब्द लिहितानाची अवस्था . अगदी एकदम कोऱ्या कॅनवासवर आपल्याच मनासारखं चित्र काढायचं स्वातंत्र्य. नवं आयुष्य अगदी आपल्याच परीने रंगवायचं स्वातंत्र्य ! जणू या भिंती आपल्या आवडीनुसार रंगवल्या तर बाकी आयुष्य पण आपल्या आवडीनुसार रंगेल (हा भाबडेपणा ! ( पण आवडतो मला)).

खरतर "भिंत" हि नेहमी बंधनाचे, पारतंत्र्याचे प्रतिक ठरत आलीये. चीन - बर्लिनची भिंत, भाषा-देश-प्रांत यांची भिंत, जेल ची उंचच उंच भिंत किंवा "ये दिवार तोड दो " वाली भिंत. नेहमीच ती कोणाला कोणाला अडवत आलीये. आणि त्याच भिंतीवर, कशाला हि न जुमानता, आपल्याच मनाप्रमाणे तिला रंगवायची हि जी भावना आहे तीच मला खूप आवडते. Graffiti मधला हा rebelism मला जास्ती भावतो. त्यामुळे Graffiti मध्ये कितीही Gaudy रंग असले तरी तिच्यातील या मुक्ताविष्कारामुळे ती आवडतेच. कदाचित काही मांडण्याचे स्वातंत्र्य, व्यक्त होण्याचे समाधान किंवा "Be A Rebel" अशी काहीशी भावना कुठेतरी आहे तिच्या मागे.

असो. भिंत वरून बरेच घसरलो - भरकटलो.

ज्या घरांमध्ये असे भिंतीवर रंगांचे, पेन्सिलीचे रेघोटे दिसतात ते घर मला लगेच आवडून जाते. अशा घरांमध्ये त्यातील बाळाची वाढ खुडणार नाही याची आपसूक खात्री मिळते.
आधी २ फुटांवर काढलेली वेगळीच चित्रलिपी-अक्षरलिपी मग जस जशी बाळाची उंची वाढत जाईल तसे ३-४ फुटांपर्यंत विकसित होत जाते. वळण नसलेल्या रेघोट्यांना मग हळूहळू आकार येत जातात. त्यांच्या अफाट कल्पनांना त्या भिंती कॅनवास देऊ लागतात. त्यांचं अवघं आकाश त्या भिंतींवर, चादरींवर सांडू लागतं.

खरतर व्यक्त होणं मूतणारया बाळाकडून शिकावं. त्यांचा भावनांना व्यक्त करायचा सर्वात सोप्पा मार्ग असतो - मिळेल त्या गोष्टीने भिंतीवर, चादरीवर रेघोट्या मारणे. अगदी सर्वात Raw मार्ग आणि सर्वात efficient. (नाहीतर इकडे इंटरनेट चालू होईपर्यंत अर्ध्या-अधिक कल्पना उडून जातात)

Yes, We are damn expressionist right from our birth ! पण मग आई रागावते "भिंतीवर नको लिहूस, राजा". मग तिचा तो राजा ताज्या वर्तमान पत्रावर लिहायला लागतो. त्यावर परत चिडचिड. मग तो जुन्या वह्या खराब करायला लागतो. पुन्हा चिडचिड. मग आता इथे नको लिहायला, तिथे नको चित्र काढायला असे करत करत काही लिहिण्यासाठी, रंगवण्यासाठी त्याला कोरीच पाने लागायला लागतात. नंतर नंतर तर अजूनच नाटकं सुरु होतात - branded वहीच, branded पेनच, branded रंगच, branded कॅनवासच ! असं करता करता "व्यक्त होणे" हा केवळ एक सोस राहतो त्यातला rawness, सृजन हे कधीच उडून गेलेले असते.

रंगवू द्यावं त्यांना -लिहू द्यावं त्यांना. भिंतीवर, चादरींवर, फळ्यांवर, ओसरीवर. त्यांचे कॅनवास, त्याचं आकाश असं हिसकावू नका.
मांडू द्या - सांडू द्या त्यांना! व्यक्त होऊ द्या त्यांना-मुक्त होण्यासाठी !

आदिमानवाने 'गुहेच्या भिंती खराब होतील', 'वनस्पतींचा रंग वाया जाईल' म्हणून आपल्या लहान मुलांना रागावले असते (त्यांना भिंती रंगवू नसत्या दिल्या ) तर "भीमबेटका" सारख्या ठिकाणच्या आदिमानवाच्या गुहांमध्ये काहीच लिहिलेलं, रंगवलेलं सापडलं नसतं आपल्याला.
कदाचित भविष्यात, ५००० हजार वर्षांनंतर, उत्खननात आपले शहर सापडेल. 244 फुटांवर माझ्या घराची भिंत सापडेल. आणि त्यावर माझ्या मुला-बाळाने काढलेले आकार-उकार सापडतील. त्यांच्या चित्रलीप्या सापडतील. त्यांच्या कल्पनेचे प्राणी पक्षी चितारलेले दिसतील त्यांना.
मग एखादा पुराणवस्तू संशोधक म्हणेल "त्याकाळी 'अशी' चित्रलिपी अस्तित्वात होती. आणि 'हे-हे' 'असे' प्राणी-पक्षी वावरत होते....इत्यादी इत्यादी "
आणि एखादा मानववंश संशोधक म्हणेल "त्याकाळाची लहान मुले खूप मुक्त वातावरणात वावरलेली दिसतात...इत्यादी इत्यादी "

Sunday, February 7, 2010

Black *TONG*

मन्नू - ...........अजून १ कारण आहे माझ्याकडं ... माझे ओठ कधीच उलत नाहीत... हिवाळ्यात नाही - पावसाळ्यात नाही - उन्हाळ्यात तर नाहीच नाही.
i am "Kiss-Ready" all the year round .... हे कारण मान्य आहे का तुला ?
the only n the safest thing we can do together....
नीरु - Shut up !!! कधी कधी Bad Breath सहन करावा लागतो मला. अ बिग नो !
मन्नू - ठीके. मिंट खात जाईल मी भरपूर मग ... दिवसभर ..
नीरु - नको... नको मिंट खाल्ल्याने "Impotency" येते म्हणे .... नो ..
मन्नू - मग मी भरपूर "कांदा" खात जाईल..त्याने power वाढती म्हणे ... आता ?
नीरु - म्हणजे परत तो कांद्याचा घाण वास.... "नो" च ..
मन्नू - परत मिंट मग.... मिंट - कांदा - मिंट - कांदा - मिंट .... all the year round...जितके उरले आहेत तितके ....
नीरु - अर्रे आलास परत तिकडेच...... ठरलं होतं ना आज याबद्दल काहीच बोलायचं नाही ...
मन्नू - ...................म्हणजे लोकं अगदी ओठ काळे-कुट्ट होईपर्यंत सिगारेट पितात, दातांच्या .........
नीरु -.......नको ना ते .. चालू ठेव ना हेच ...please मन्नू ......
मन्नू - ....................दातांच्या अगदी फळ्या होईपर्यंत गुटखा, मावा खातात आणि अगदी लिवर बाहेर येईपर्यंत दारू पिऊन ओकतात ...
नीरु - "Yes" ..."हो" आहे माझ्याकडून ...पटलं मला ओठांच कारण...चल बदल विषय...
मन्नू - .....................आणि मी.. रक्त द्यायला जावं आणि .....
नीरु - मन्नू, अशा लहान-सहान दिवसांच्या Anniversaries तरी कितीशा उरल्यात ? निदान आज तरी नको रडूस...
मन्नू - ......................आणि तरी ते भरपूर जगतात....आणि त्यांच्या बायकांना असं ओठांच्या रंगासाठी convince पण नाही करत..........
नीरु - .... तुझ्याशी लग्न करायचं धाडस नाही होतंय माझं अजून...
मन्नू - जर हे लग्नानंतर समजलं असतं तर ?
नीरु - नको रे असे प्रश्न विचारूस. मी खोट्या उत्तरांनी कसंबसं स्वतः च समाधान केलंय.. ..
नको ना परत... केवळ तुझ्यासाठी कशीबशी उभी राहिलीये ....
ऐक न.. मी असेल तुझ्याच जवळ.....अशीच, नेहमी....
पण हा हट्ट नको ना. आज नको......... कधीच नको...
-------------
आजकाल हे असं chunks मध्ये सुचतं. काही प्रसंग, भावना, पात्रं सुचतात नुसते. Complete स्टोरी काही हातात लागत नाही.
पण हे असे Chunks or Components पण भरपूर useful असतात. कुठेही वापरता येतात.
आता ते "मिंट-कांदा-मिंट ..." पर्यंत चा प्रसंग "मात्ररात्र" मध्ये वापरता येईल.
पूर्ण प्रसंग एखाद्या एड्स वरच्या Short-Film साठी पण .....
Reusable Components !
ते काहीतरी Comedy / Black Comedy काहीतरी असतं ....त्यासारखं हे झालाय "Black Se..." (sorry) "Black *TONG*"
आणि 'रेनकोट' चालूये background ला म्हणून मन्नू-नीरु ...... ३ रा post 'रेनकोट' चा उल्लेख असणारा...

Monday, January 11, 2010

समेवर...

आधी तुला बघायचो मग स्वर कळायचे मला. स्वरांची पहिली ओळख कानाआधी डोळ्यांनीच करून दिली. तुझ्या चेहऱ्यावरचे हाव-भाव वाचूनच तर रागदारी कळाली मला.

आपल्या खटल्याच्या घरात कुठला आलाय एकांत ? त्यामुळे तुझ्याजवळ राहण्याची संधी म्हणून बासष्ठचा सवाई अजून आठवतो मला. हिवाळ्याच्या ४-५ दिवसात तुझ्या बरोबर काढलेले कित्येक तास आणि शिवाय संगीत जोडीला.

आपला पहिला सवाई. गर्दीत बुजलेली तू , तानपुरयाचे पहिले स्वर ऐकताच स्तब्ध झालीस. तानपुरा लागे पर्यंत तुझे काळेभोर, आसुसलेले डोळे स्वरमंच शोधात राहिलेले आणि मग हिराबाईंचा षडज लागला. त्याच क्षणी तू डोळे हलकेच मिटलेस..... कदाचित दुसर्या कोणत्याच sense ने कानाला मिळणारा आनंद biased होऊ नये म्हणून visual sense तू बंद केलास. 'दीर्घ "कश" घेताना डोळे आपोआप का मिटतात ?' या नुकत्याच पडलेल्या कोड्याचे पण मला उत्तर त्यावेळी मिळालेले. अगदी स्वर न स्वर तू साठवत होतीस आणि तुझ्या चेहऱ्यावर तो आनंद ओसंडून वाहत होता. अजूनही षडज लागल्यावर तुझेच डोळे आधी दिसतात नंतर तो कानांना समजतो...

मग प्रत्येक तानेला होणारी तुझी भुवयांची हालचाल, हरकती ऐकताना तुझ्या नाजूक ओठांची थरथर आणि समेवर येताना मानेला दिलेले हलकेसे झटके. कितेक वेळ मग सगळा 'तिलक कामोद' मला तुझ्या चेहऱ्यावर दिसत होता, समजत होता.
संगीतातला ओ कि ठो काळात नव्हता त्या वेळी पण काहीतरी नवीनच अनुभवत होतो मी. ती तुझ्या सौंदर्याची अनुभूती होती कि संगीताची हे अजूनही सांगता येणार नाही. पण त्या वेळेपासून नवीच दिसलीस तू मला, नितांत सुंदर.

तुझ्या सोबतीत आजूबाजूचं संगीत पण नव्यानेच ऐकू यायला लागलं होतं.
आणि मग मला ते वेडच लागलं - तुला ऐकताना बघायचं !

आलापी ऐकताना पापण्यांची होणारी मंद थरथर अगदी डोळ्यांच्या आजूबाजूला सुरकुत्या आल्या तरी तशीच हवीहवीशी वाटायची मला.

तबल्याच्या तालांना आपल्या नाजूक पावलांनी ठेका द्यायचीस. मऊशार पावलं आणि ती पैंजणं . विलंबित त्रितालात लोकांना तबला ऐकू यायचा आणि मला तुझ्या पावलांच्या ठेक्याने वाजणारी पैजणे. नंतर पावलं भेगाळली तरी तबल्याची साथ अजून तशीच होती...आणि मला ऐकू येणारी ती पैंजणांची छुमछुम पण...

अतिशय अवघड ताण घेताना आपसूक तुझाही हात वर जायचा. हिरव्याकंच नऊवारी मधून तो गोरापान हात बाहेर यायचा आणि त्या हातांमधल्या त्या गडद हिरव्या बांगड्या. नेहमी पदराआड लपलेले ते सोंदर्य अशावेळी नकळत बाहेर यायचे. लोकं त्या अचूक तानेच्या/जागेच्या सोंदर्यसाठी "वाह !!!!" म्हणायचे अन माझ्या हि तोंडून "त्या" जागेसाठी "वाह !" निघून जायचे. मीही मग अश्या अवघड तानांची वाट पाहत बसायचो. अजूनहि पाहतोय.

मैफिल संपली कि भानावर यायचीस तू, पदर वगैरे नीट करून सावरायाचीस. मग संपला दिवस कि नदी काठावरून घरी जाताना एरवी अबोल असणारा मोगरा फुलून यायचा. किती सांगू किती नको असं होऊन जायचं तुला. अगदी सगळ्या जागा, सगळे राग, बंदिशी त्या हिवाळ्याच्या थंडीतच समजल्या मला.
'सवाई' 'थंडी' शिवाय रंगत नाही म्हणे पण आपली 'थंडी' 'सवाई' शिवाय रंगायची नाही. भारावलेले दिवस ते.
हळूहळू मग माझ्या भावनांना, वेळा-काळाला, प्रहारांना राग समजत गेले. त्याहून महत्वाचे म्हणजे मला "तू" समजत गेलीस....

मैफिलीच्या सर्वोच्य क्षणी शहारून तू डोळे उघडयाचीस, मला शोधायला. तो क्षण तुला माझ्या बरोबर share करायचा असायचा. तुझे ते पाणीदार डोळे बघून माझ्याही अंगभर शहारा फुललेला. मग कळायचं नाही हा शहारा त्या उत्कुष्ट संगीताचा असायचा कि तुझ्या नजरेचा. असे कित्येक क्षण एकत्र जगलेलो, एकत्र शहारलेलो. संगीतामुळे शहारा आला कि शहारलेली, डोळ्यात थोडेसे पाणी आलेली तू दिसतेस. गेल्या चाळीस वर्षात असे कित्येक क्षण सवाई ने दिले....

आणि आता....
माझा चाळीसावा सवाई ! पण तुझ्याशिवाय पहिलाच !!
पण या वेळी स्वरांची कसोटी आहे. ते सगळे स्वर 'ऐकताना' तू 'दिसायला' हवियेस आता मला....

Sunday, September 27, 2009

अंतर !

तो : नाही जमत मला हे आता. मी काय मशीन आहे का ? आत जा आणी सैम्पल घेउन बाहेर या. नाही होत माझ्याने हे आता. त्याच त्या "test cycles" परत आणी "Counts and Mobility" च्या Details चे रिपोर्ट्स. नाही एइकायचाय score मला तो. प्लीज ! काहीच imagine होत नाही आत गेल्यावर. अगदी कर्तव्य म्हणुन पण करता येत नाही ते....
ती : ऐक ना ... माहितीये रे मला. आता इतक्या टेस्ट केल्या अजुन एकच ... may be यावेळी Counts वाढलेला असेल... हे magazine घेतोस ?
तो : कशाला चेष्टा लावालियेस आता ? u know that !
(ती वाकून magazin खाली ठेउन देते ... आणी त्याच्या कड़े बघत)
ती : आपल्याला फ़क्त 1 हवाय रे. शेवटपर्यंत पोहोचनारा. healthy ! फ़क्त एक सगळं अंतर पार करून जाणारा... आठव ना मी जवळ असतानाचे सगळे क्षण...अजुन एकदा...
तो : (हसून) सगळं अंतर पार करणारा.... जवळ-लांब असं कधी वाटलंच नव्हतं कधी... आताच काय ते "अंतर" कळतयं..कसं सांगू तुला काय काय आठवतं मला आत गेल्यावर....
( आणी आत जातो ..)

कसं सांगू मी तुला काय काय आठवतं ते ... अगदी सगळे क्षण क्षण आठवतात, त्याच्या आजू-बाजुच्या गंधा- स्पर्शा सकट.. तू खरच जवळ आहेस की नाहीस असा भ्रम होणारे ते क्षण ...

पहिल्यांदा सोडायला आलीस Airport वर ... जसं जसं departure जवळ येत होतं तशी तशी हाताची तुझी पकड़ घट्ट होत गेलेली.. जाणवन्याइतपत! आणी अगदी आत जायच्या वेळी, टपोरे डोळे तुझे -अगदी सांडायच्या बेतात. कोणत्याही क्षणी मिठीत येउन "नको जाऊ " म्हणशील असं वाटलेलं. तेव्हढ्यात सोडलीस तू पकड़ हाताची आणी खाली वाकलिस Documents check करायचं नाटक करून.. दुसर्या मिनिटाला वर पाहिलस.. आणी डोळ्यातलं सगळं आभाळ निरभ्र झालेलं ... मिठी मारता, ना काही बोलताही केवढा धीर दिलास तू मला .. अगदी आता वाकलिस ना magzin ठेवायला आणी दुसर्या क्षणी normal झालीस तसं. आता हेच सगळं आठवतं ...

पहिल्याच Airport वरून लगेच फोन लावला तुला. 1000 मैलांचं अंतर ते अर्ध्या रिंग मधे फोन उचललास. थोडा वेळ काही बोललोच नाही आपण. मधे होतो मी journey च्या. धड ना तुझ्यापासून खुप लांब ना धड तुझ्या बरोबर...काय बोलायचं असतं अशावेळी ते पण माहित नव्हतं. फ़क्त इतकाच कळत होतं की अंतर वाढतय. काहीतरी बोलत होतीस पण मला सोडल्यावर रात्रभर झोपली नाहीस हेच जाणवत होतं त्यातून... १००० मैल काय किंवा २०००-५००० काय? अंतर तर होतच...

तिकडं पोचल्यावर पहिला फोन बूथ पाहून लगेच फोन केला. सावरली होतीस तोवर. अन एकदम तुझे प्रश्न सुरु झाले.. 'कशी झाली journey?', 'हे कसय ते कसय', 'कसा वाटला पहिला वारा तिथला?' 'थकलास का ? jetlag का ?' अशा वेळी काय विचारावं ते अजुनही माहित नव्हतं तुला अणि मला पण 'अशा' प्रश्नाला उत्तरं देणं खुप सोप्पं होता त्यावेळी. किती बोलू, किती नको असं झालेलं.. अणि मग अचानक लक्षात आलं की कितीही बोललो तरी दुसर्या क्षणी जवळ नाही येणार आहोत आपण. मग आलेला तुझा बहर अचानक ओसरला. शांत झालीस एकदम. मग मीच काहीबाही बोलत राहिलो. अंगाला वारा झोम्बत होता, तोंडातून धूर निघत होता. पण कितीही झालं तरी लगेच तुझ्या श्वासांची ऊब मला मिळणार नव्हती. दोघं नविन शहराबद्दल बोलत होतो पण अजूनही आपल्या गावातली धुक्यात हरवलेली गल्ली-बोळं हिंडत होतो. 'DownTown' सांगताना दोघांना नदीपलिकडली कॉलनीच आठवत होती, अगदी प्रत्येक वळणावरच्या खुणांसकट.

मग मी तुला कधीही, कुठेही फोन करायचो. दिवस-रात्र काही कशाचं भान नसायचं. मी लख्ख उन्हात तुझ्या चंद्राच्या आठवणी एइकयाचो. बाहेर snow पडत असताना तू घामेघुम होउन "छत्रीचा रंग कोणता घेऊ? " विचारत असायचीस. शांत रात्रि तू पाउस पडताना एइकावायाचिस मला. स्वतः तयार केलेली करपलेली पोळि खात असायचो अणि तू पूरण-पोळि वर तुपाची धार सोडताना माझी आठवण झाली म्हणुन कस्नुशी झालेली. २-४ शाली अंगावर घेउन, कुडकुडत शेकत बसलेलो मी अणि तू चिम्ब होउन आलेली, ओलेत्यानेच मला चिडवत बसायचिस. एकमेकांच्या ॠतुंची वाटावाटी करायचो आपण. त्यावेळी पण कधी अंतर असं वाटलच नाही...

Gallery च्या पत्र्याची choice करायची होती. वेड्यासारखे दोन्ही पत्रे पावसात धरलेस अणि विचारलस "कोणता आवाज आवडला तुला ? तो पत्रा लावू.". खरतर दोघही मागच्या पावसात गेलेलो आपण अणि खिडकीच्या काचांवरचा पाउस पाहत होतो. दोघं एकाचवेळी म्हणालो "काच लावायची का मधे मोठी ?" मग कितेक वेळ तरी पाउस पडत राहिला... आता तूच सांग. या क्षणी पण तू जवळच होतीस ना माझ्या ?. हेच सगळे क्षण आठवतात ग.. ..

कानाला फोन लावून कणिक मळत बोलायाचिस तू. ३ पापुद्रे यावेत पोळीला म्हणुन मधून घडी घालयचिस. दुसर्या घडी नंतर केसांची चेहर्यावर आलेली बट वर करायची सवय तुझी. फोनमुळे ते करता नाही यायचं तुला. मग मी हळूच ती पीठ लागलेली तुझी बट कानामागे सरकवून ठेवायचो, मुद्दाम हळूच सावरायाचो की next पोळिला ती परत चेहर्यावर येइल अणि परत अवघडलेली तू मला बट नीट करायला सांगशील म्हणुन...
कुकर काढलास की वरण गरगटायला घ्यायचीस. रवी घुसळताना तुझ्या बांगड्यांची किणकीण एइकू यायची. मग मी मागुन म्हणायचो "जास्ती घाल मीठ थोडं. मी नाहीये आता कमी मिठाचं वरण खायला" थोडा वेळ बांगड्यांची किणकीण थाम्बायची मग. तरी जास्तीचं मीठ टाकलेलच नसायचं वरण-भात खाताना परत माझी आठवण यावी म्हणुन.. सांग आता यावेळी मी जवळ नव्हतो तुझ्या ?

वीकभर आलेलं टेंशन तुला सांगायला रात्रि फोन करायचो. तू अशी सकाळी सकाळी शिकेकाईने न्हालेली. तसेच ओलेते माझा फोन घ्यायाचिस. अणि मग ओल्या झालेल्या फोन मधून तुझ्या केसांचा तो वास माझ्या पर्यंत यायचा. एक दीर्घ श्वास घ्यायचो मी. तुझ्या गंधाने भारलेली माझी ती रात्र ! फोनवर बोलताना मधून मधून केसं झटकायचा आवाज येत रहायचा अणि जणू त्याचे तुषार माझ्याच तोंडावर उड़ताहेत असं होउन जायचं. सगळी tensions विसरून गेलेलो असायचो. तुला सांगू की नको असं करता करता तू केव्हाच ती माझ्याकडून वदवून घेतलेली असायचीस. केसं सावरताना मलापण सावरायला कसं जमायचं ग तुला ?

बोलताना कधीकधी कोकिळेचा आवाज यायचा मागुन. मग तू सांगायचीस मागच्या आंब्याला मोहोर आलाय म्हणुन. दोघही लगेच आपल्या लहानपणात जायचो. आंबे पाडायला बागेत. खाली पडलेला पाड मी धुवायला जायचो तर तू आडवायचीस अणि तसाच मातकट पाड खात बसायचीस. तू आंब्याबद्दल बोलायला लागलिस की मी लगेच सुटून आपल्या बागेत पळायचो तर तिकडे तू आधीच पोचलेली. 11 hrs चा distance आपल्यात खरतर पण दोघं एका मिनिटात लहानपणात पोचायचो. अंतर काय असतं ग ? जवळच वाटायचीस तू तेव्हाही ...

किती दिवस लांब होतो ग आपण. मी मोजायचोच नाही. मोजले की हमखास वाढायचे ते. 'strip क्लब' ला नेलेलं मित्रांनी तिकडे मला. हो-नको-हो करता करता आत पोचलो. अणि दुसर्याच क्षणी बाहेर आलो. फोन करायचं reason देऊन. 27 वेळा फोन ट्राय केलेला तुला. तू फोन विसरून गेलेलिस. तुझा आवाज कधी एकदा एइकू कधी एकदा तुला सांगू हे असं झालेलं. काहीच कळत नव्हतं काय करतोय मी ते... मला त्यावेळी फ़क्त तुझ्याशी बोलायचं होतं..अणि मग 28 व्या कॉल ला तू फोन उचललास. हाय रे देवा! इतकं हलकं वाटलं होतं तेव्हा. त्या तशा Area मधे पण मला फक्त तूच एइकू येत होतीस. चुकलेल्या लहानमुला सारखं बिलगलो होतो मी तुला. तूच सांग आता magazin कसं वापरू मी यावेळी ?
घरी जाताना आधी Webcam घेतला. मला आता तुला पहायचं पण होतं. असं वाटलेलं की पाहून अंतर कमी होइल..

पावसाची रेष पाहायला बाहेर पडलेलो. खुप पुढे गेलो तरी पाउस संपलेला काही दिसेना. मग अचानक जोरात गारा पडायला सुरुवात झाली. वेड्यासारखे गोळा करत सुटलेलो. छतरी उलटी करून त्यात गारा गोळा केलेल्या. वरुण सपसप गारा पाठीवर बसत होत्या, कधी डोक्यात, कधी मानेवर, कधी ढुंगणावर. वण आलेले अंगभर. अणि साठवलेल्या गारांच छतरी मधेच पानी झालेलं. वेचलेल्या उरल्या-सुरल्या गारा मग खात बसलो होतो कितेक वेळ. रात्रि अंग शेकून घेताना आईने विचारलेलं "सुलीच पण अंग दुखतय म्हणे. बरोबरच गेला होता का फिरायला पावसात ?".. पकडलो गेल्याची आठवण म्हणुन पहिल्या गारा पाठवल्यास. "Waterproof and Temparature- proof " बॉक्सच Courier आलेलं. छोटीशी छतरी अणि पाणी होतं आत. सगळ्या गारा वितळलेल्या डब्यात त्या. मग मी परत त्यांना freezer मधे ठेउन दिलं. Webcam सुरु करून त्या गारा खाऊन दाखवत होतो तुला. चुकून म्हणालो "गारा वितळल्या ग त्यादिवशी सारख्या. अंतर खुप वाढलय का ? ". पागोळ्या लगडल्या लगेच पापण्यांना तुझ्या अणि त्यातला एक टचकन निखळला. सवयीने लगेच sceen कड़े हात गेला माझा अणि मग सगळेच सांडायला लागले. पहावत नव्हतं तुला रडताना, Technical कारण सांगुन webcam off केला. Chat वर सगळे पावसाळे परत जगुन आलेलो आपण. कोण म्हनतं chatting करताना डोळ्यातलं पाणी दिसत नाही ? webcam off करून पण तुला रडताना पाहताच होतो मी. यावेळी किती अंतर होतं आपल्यात ?

खरतर तुझा-माझा चन्द्र एकच होता. तू त्याला सांगितलेल्या कानगोष्टी मग तो मला दुसर्या दिवशी (सॉरी रात्रि) सांगायचा. फ़क्त तुझ्यासाठी अणि माझ्यासाठी त्याचे "Working hrs" वेग़ळे असायचे. पण तरीही महिन्यातल्या 4 दिवसांच्या खुणा माझ्याही कैलेंडरवर करायचो मी. तुझ्याबरोबर प्रत्यक्ष नसलो तरी तुझ्या मूडची जरा जास्तीच काळजी घ्यायचो मग त्याकाळात...त्यावेळी मग तू चिडलीस की जास्तीच अपराधी वाटायचं मला. तू कितीही Control केलस तरी तुझ्या मनातलं बाहेर पडायचं पण तू असं मनातलं बोललेलं आवडयचं मला. माझा माफीनामा मग मी चन्द्राकरवी पाठवायचो तुला.. तितके अंतर बिचारा रोज पार करायचा.

तू जवळ असतानाचे क्षण आठव म्हणालीस तर हेच क्षण आठवतात. आता तूच सांग कसे आठवू बाकि काही ?
असे माझे श्वास एइकत राहायचिस. ना बोलता ही त्यातून मला काय हवे ते तुला कळुन जायचं. तू माझे श्वास ऐकतानाचेच क्षण आठवतात मला. नुकत्याच भेगाळलेल्या तुझ्या टाचा जेव्हा माझ्या पृष्टभागाला लागायच्या तेव्हाचेच शहारे आणणारे क्षण आठवतात. माझ्या छातीवर डोके ठेवून माझ्या Weak Heart चे बीट्स एइकतानाच तू आठवतेस. घामेजल्या केसांना सावरत माझ्याशी बोलणारी तू आठवतेस मला. कसं आठवू बाकि काही ?

काही युगांपुर्वीचे हे सगळे क्षण वाटतात पण जसेच्या तसे आठवतात. आणि आजकाल ?

बेडच्या दोन कोपर्यात झोपलेलो असतो आपण. एकमेकांकडे पाठ करून- आपल्या कधीही न होणार्या बाळासाठी मधे दिड-दोन फुटाची जगा सोडून.
झोपलेलो नाहीये म्हणुन एकमेकांकडे पाठ करून, अगदी पापण्यांच्या उघड-झापेचा पण आवाज होऊनये म्हणुन डोळे बंद करून पडून असतो आपण रात्र-रात्र. ३-४ वेळा पाणी प्यायला हवं रात्रि असं कारण सांगतो मी तुला. झोपेची नाटकं तरी किती करावी ? तुला तर नाहीच येत करता. लोळुनलोळुन बेडभर फिरायचिस तू रात्रि. आता सरळ पडून असतेस सकाळ पर्यंत. निदान लोळायचं तरी नाटक शिकून घे.
सकाळी पण तुझ्या डोळ्याला डोळे देता येत नाहीत. मग पटकन ऑफिस मधे जातो मी अणि मग नंतर फोन वर बोलनं सोइस्कर होतं.
हॉस्पिटल मधे पण अवघड होतं बरोबर येणं. विषय नाही निघावा म्हणुन दोघेही धड्पडत असतो.

'अंतर' खरं तर आता वाढलय आपल्यातलं. हे अंतर आपणच पार करायला हवं नाही का ?