Pages

Saturday, February 12, 2011

ते


कधीकधी येतात 'ते' अगदी नटून-थटून. ठेवणीतले कपडे घालून. दागिने वगैरे पण एकदम चकचकीत. makeup आणि  touch-ups मध्ये भरपूर वेळ घालूनच येतात. सणासाठी तयार झाल्यासारखे. आवडून जातात मग, अगदी बघत रहावसं वाटतं त्यांच्याकडे. नखशिखांत almost perfect, flawless.

-कोण रे 'ते' ?
--अर्रे तेच ना... आपले हे रे..काय म्हणतात त्यांना?.. डोळ्यासमोर आहेत राव ते... ऐनवेळी बरोबर आठवत नाहीत बघ  ..

किंवा कधीकधी 'ते' झोपेतून उठून, चीपाडलेले डोळे चोळत समोर उभे राहतात... विस्कटलेल्या,सुटत आलेल्या night dress मध्ये..अर्धवट झोपेत असतात.. सुजलेले झोपाळू डोळे, उशीच्या लालसर खुणा उमटलेले टम्म गाल, हळूहळू-रडकी चाल.. मग येऊन बिलगतात.. तोंडाचा वास येत असतोच... पण तरी उचलून घ्यावसं वाटतं त्यांना, टम्म गालाला अजून लाल करणारा एक मोठा मुका घेऊन कडेवर घ्यायचं त्यांना.... मान खांद्यावर टाकून परत झोपी जातात किंवा नुसते चिकटून बसतात आपल्याला.. अगदी कसलाही आव न आणता आलेले असतात 'ते', innocent, raw, सच्चे ... 

-चिल्लीपिल्ली पोरं का ?
--नाहीरे.. थांब सांगतो.. आवडतात  मला ते तसे चिल्ल्यापिल्ल्या बाळासारखे चिकटलेले.. 

किंवा ...तू जादुगाराची  कळशी बघितलीयेस का? सगळं पाणी ओतून देतो तो..असं वाटतं सगळं पाणी संपलंय आता..पण मग थोड्या वेळाने तो परत कळशी उलटी करतो...परत त्यातून पाणी पडतं..असा कितीही वेळा करा..थोड्याथोड्या वेळाने थोडे थोडे पाणी त्यातून पडत राहत...किंवा तुला diabetes आहे का? दिवसातून हजारवेळा जावं लागतं....दरवेळी थोडी का होईना होतीच..पण पूर्ण नाहीच.अगदी छटाक -छटाक दरवेळी.. तसे येतात ते.. हळूहळू, थांबून थांबून.... धड संपत पण नाही आणि धड सलगपणे एकाच वेळी येतही नाहीत.. इतके नाही आवडत ते मला अशावेळी.. एक चांगलं असतं कि संपत नाही कधीच ..Daily Soaps सारखे... पण मग मजा नाही राव त्यात.... तितका patience लागतो मग त्यांना पूर्ण पाहायला...  इतका वेळ घेऊन येतात पण चांगले असतात एकदा आले कि..

-मला नाहीये diabetes अजिबात. उगाच काही करून अश्या  घाणेरड्या उपमा कशाला देत असतोस? सांग ना पटकन काय आहे ते...
--घाणेरड्या उपमा काय? चायला जगातल्या ३७.६७% लोकांना diabetes आहे...त्यांना कळेल कि हे लगेच... आणि  बाकी लोकांसाठी जादूगाराच्या कळशीची  उपमा आहे ना.. थांब ..अजून एक वाईट उपमा देतो...... 

constipation झाल्यासारखे! नाहीच येत 'ते' कधी कधी... कितीही वेळ वाट पहा, pressure येण्यासाठी वर्तमानपत्र  वाचा, cigg ओढा.. नाहीच येत ते...मग वेड्यासारखी मिन्नात -वारी करत बसायची.. कधी एकदा ते येतात असं झालेलं असतं.. खूप साचून-साचून असतं आत सगळं... मोकळं व्हायचं असतं.. आणि नेमके त्यावेळी ते येत नाही... अस्वस्थ वाटत असतं खूप पण तरी ते आपली पर्वा न करता, त्यांच्याच मर्जीने येतात..
पण एकदा ते आले कि मग खूप मस्त वाटत असतं..मोकळं-मोकळं, हलकं-हलकं... अशावेळी ते जेव्हा येतात ते खूप भारी होऊन येतात... इतकी वाट पाहण्याचं सार्थक झाल्यासारखं असतं ते.. 

- आवर रे..सांग बाबा पटकन... इतकं pressure देण्यासारखं  नाहीये हे.... 'ते ' कोण आहेत ते सांग.. तुझे कमरेखालचे जोक्स नाईलाजाने ऐकत बसण्याइतकं नाहीयेत 'ते' महत्वाचे ..सांग लवकर, नाहीतर जातो मी 
--'ते' महत्वाचे नाहीयेत ?

असे ढगफुटी सारखे येतात कधीकधी 'ते'..  अचानक, तयार नसतो आपण अजिबात...धो-धो बरसतात ते... काही कळायच्या आत आपण चिंब भिजलेलो असतो... 'ते कसे आले', 'कसे गेले' हे कळण्या आधीच तो क्षण ओसरलेला असतो... केवळ ते येऊन गेले इतकंच कळत असतं...ढगफुटीचा तो moment नाहीच परत जसाच्या तसा मांडता येत... नंतर चिबं अंगाला जाणवणारे शहारे तेव्हडे राहतात... केवळ ते शहारे हीच ते आल्याची आल्याची खुण, पुरावा... ते आल्याचे exact moments, त्यांचं त्यावेळचं नेमकं रुपडं नाहीच सापडत परत.. जसंच्यातसं नाहीच सांगता येत - ते कसे आले होते?, ते कसे होते?.
पण त्यांचं येणं हे फक्त अनुभवणं  असतं.. नाहीच  सांगता येत काय वाटतं त्यावेळी.. सर्वात भारी असतात 'ते' त्यावेळी.. 

-निघालो मी.. इतकी पानं खाऊन पण नाही सांगता आलं तुला कोण आहेत 'ते'...किती लायनी खर्च केल्यास? बघ जरा - पंधराशे लायनी, सतराशे साठ शब्द....
-- "शब्द"...अगदी बरोबर.. आता आठवला तो शब्द............अर्रे "ते" म्हणजे "शब्द"..        

Wednesday, January 26, 2011

Rachel Greathouse!


आजकाल दरवेळी लायब्ररीमधून पुस्तक घेताना चोविसावं पान उघडून बघतो. तिने खुण केलेली असतेच तिथे, "Clef" ची musical note. अगदी माझ्या छातीजवळ गोंद्लेल्या tattoo सारखी. ditto

लायब्ररीमधून आपल्या मनाचं पुस्तक घ्यायचो, अगदी आपल्या आवडीचं. जे ठरलेले लेखक आहेत त्यांचीच किंवा नेहमीच्या genre ची पुस्तक घ्यायचो. किंवा कोणीही न वाचलेली-अगदी करकरीत कोरी पुस्तकं पण कधीकधी. वेगळ्या वाटेवर लिहिणाऱ्या कोणाचीही पुस्तकं घ्यायचो मी
कधीकधी आपल्या वेगळ्या निवडीचं उगाच कौतुक वाटायचं. 'सहा फूट माणसांच्या गर्दीत सव्वासह फूट असणे' इतकाच काय तो फरक, पण तरीही चांगलं वाटायचं... पण तरीही  दरवेळी 'आपण सोडून हि पुस्तकं कोण वाचत असेल?' असा प्रश्न पडायचाच. मग पुस्तकाच्या शेवटी जायचो. शेवटच्या पानावर लायब्ररीवाल्या बाईने शिक्के मारलेले असायचे. वर्षानुवर्षाचे date-stamps सापडायचे. बरीच पुस्तकं महिने-महिने पडून राहिलीत अशा तारखांच्या नोंदी सापडायच्या.
एकतर ती पुस्तकं लायब्ररीच्या शेल्फ मधेच पडून राहिली असतील किंवा वाचणाऱ्याने त्याची हजार पारायणं तरी केली असतील असा(उगाच) अंदाज बांधत परत वाचायला लागायचो...

पहिल्यांदा जेव्हा चोविसाव्या पानावरची ती खुण पाहीली तेव्हा थबकलो होतो. आरशात जाऊन परत माझा tattoo पाहून घेतला. 
माझ्या चोविसाव्या वाढदिवसाला काढलेला तो tattoo... 'S' शी साम्य म्हणून आणि काहीतरी musical हवं छातीशी म्हणून Clef ची sign काढलेली...
चोविसाव्या पानावर Clef ची ती musical note त्याच्या लफ्फेदार शेपटीसकट अगदी जशीच्या तशी होती... 
शिवाय दाबून काढलेलं अक्षर, मागच्या ३-४ पानांवर उमटलं होतं.
जरावेळ थांबून सगळं पुस्तक कितेकदा तरी चाळलं. अजून कितीतरी खुणा सापडल्या- माझ्या आवडत्या बऱ्याचश्या वाक्यांच्या खाली टिंबाच्या पुसटश्या खुणा होत्या, दुमडलेल्या पानांवरचे उतारे पण बहुतेक माझ्याच आवडीचे, पुस्तकातल्या नेमक्या माझ्याच आवडीच्या कथांची पानं खिळखिळी झालेली वाटली - परतपरत खूप वेळा वाचून त्या कथेच्या आजूबाजूच्या पानांच्या घड्या सैल झाल्यासारख्या वाटत होत्या....
मग नंतरच्या प्रत्येक पुस्तकावर सापडली ती खुण, त्या खुणा... पूर्वी घेतलेली जुनी पुस्तकं पण चाळली, त्यावर पण त्याच खुणा सापडल्या. कदाचित आधीच्या पारायणा त्या दिसल्या नव्हत्या.
मला न आवडणारी पुस्तक पण चाळली, पण त्यावर त्या खुणा नव्हत्या. अगदी माझे नावडते पण प्रसिद्ध लेखक पण पिंजारले, त्यांच्या पुस्तकांची २४ वी पानं अगदी कोरी होती.
बाकी कोणत्याच पुस्तकांवर या खुणेचा कसलाच आवाज नव्हता आणि माझ्या आवडीच्या पुस्तकांवर मात्र Clef चा आवाज नेहमी किणकिणत असायचा...

(..आणि हो, हे आपलं उगाचच.. "तिच्या", "तिने खुण केलेली असतेच तिथे".... जणू काही अशा खुणा करणारी व्यक्ती खरच "स्त्री"च आहे. खरतर ती स्त्री आहे कि पुरुष आहे हे माहिती नाही. पण ती व्यक्ती एक पुरुष आहे हे imagine करण्यापेक्षा ती एक स्त्री/मुलगी आहे हे imagine करणं खूप चांगलं वाटतंय मला. तसाही ५०% chance आहेच कि हे खरं होण्याचा. शिवाय ती व्यक्ती कोण आहे हे मी नाहीच शोधणारे. तसं जास्ती अवघड नाहीये शोधणं, खूप मोठी नाहीचे लायब्ररी आमची. पण तरी नकोच... ती अशीच अज्ञात राहिलेली हवीये मला.. खरच स्वप्नवत आहे हे मग ते तसंच स्वप्नच राहिलेलं आवडेल मला.. पण तरीही राहून राहून आश्चर्य वाटतच राहातं, आणि ते नाही रोखू शकत मी.) असो..

विश्वासच बसतच नाही माझा..
इतक्या कशा पुस्तकांच्या निवडी सारख्या असतील? आवडी पण कशा बहुतेक सारख्याच? 
इतक्या कशा सगळ्याच वाटा सारख्याच असतील? 
तिनेच वाचलेली पुस्तकं मी वाचतोय किंवा तीच तिचं पुस्तक वाचून झालं कि मला देतीये वाचायला, तिला आवडलेल्या गोष्टी सांगतीये मला..असं वाटत राहातं..
कि मीच तिच्या पाऊलखुणावरून चालतोय? नाही, असं कसं होईल? हि वाट तर माझीच होती ना?... माझ्याच आवडीची, माझ्याच निवडीचीहि..ती यायच्या आधीही? याच वाटेने ती सुद्धा गेलीये हे समजायच्या आधीही मी चालत होतोच कि या वाटेने?
काय आहे हे? कोण आहे हि? कि हा पण मी तयार केलेला भासच? प्रतिमांचा खेळ पूर्वीचाच?
पण काहीही असू देत, राहू देत हे असंच....
असू देत असंच तिच्या पाऊलखुणांवरून चालणं, त्या कोणाच्या आहेत हे माहिती नसूनही...
कोणीतरी आहे या वाटेवर माझ्याबरोबर हेही काही कमी नाहीये माझ्यासाठी.. एकटेपणा नाही जाणवत मग चालताना. 
आधी कोणीतरी याच वाटेवरून चालल्याचं समाधान आणि कदाचित ती व्यक्ती जवळपासच कुठेतरी असेल याचा आधार पण वाटतो...
पानापानांवर तिची पायरव अशी ऐकू आली कि सोबत जाणवते तिची.. अंधारात अगदी हातात हात नसला तरी तिचं अस्तित्व मात्र जाणवत राहतं आजकाल...   

असो...नाहीच शोधते मी तिला, पण मग पुस्तक घेतलं हातात कि तिची आठवण होतेच....डोळे शब्द वाचण्याऐवजी तिच्या पाऊलखुणाच शोधात राहतात.
रात्र खूप झालीये आता.. पण हि नवी कोरी आवृत्ती मिळालीये 'पिंगळावेळ'ची.. संपत आलीये वाचून ...'यात्रिक' चाललंय..आरशात बघतोय असा भास होत असतो नेहमी हि गोष्ट वाचताना.. किंवा खूप थकल्याने आपणच डॉन आहोत असं वाटायला लागतं मग..पण मग फरक फक्त इतकाच कि इथे डॉन पण मीच आणि Sancho पण मीच..      
झोपतो आता.. नाही जागवते आता.. या गोळ्या घेऊन जाऊ झोपी..

---------------------------------------------------------
किती शांत झोपलाय, सैरभैर असतो नाहीतर नुसता. गोळ्यांचा उपयोग होतोय तर..
माझ्या राजा, तुझा छातीवरचा tattoo तुझ्यापेक्षा जास्तीवेळा मी बघितलाय. 
त्या clef च्या शेपटीचा लफ्फेदारपणा तुझ्या स्वाक्षरीत तर आहेच पण तुझ्या वागण्यात पण तसाच आहे हे माझ्या पेक्षा जास्ती कोणाला माहिती असेल?
जितक्या तीव्रतेने/intensity ने तू लिहितोस/बोलतोस ते उठतंच कि मागच्या ४-५ पानांवर सुद्धा. तू केलेल्या वारांचे व्रण आहेतच कि माझ्याकडे,दिसतात त्याच्यापेक्षा जास्ती खोलवर उमटले आहेत ते.
केवळ सात पावलं नाही टाकलीयेत बरोबर आपण, हि वाट तुला तुझ्या एकट्याची वाटत असली तरी माझी मूक सोबत असेलच रे. 
तू एकटा नाहीयेस हे तुझ्याच प्रतिमांच्या खेळातून तुला आम्ही पटवून देतोय. इतकंच...

चल, तुझ्या या नवीन कोऱ्या पुस्तकावर खुणा करत बसते आता जरा वेळ. तूच सांगितलेलं असतं सगळं मला, मी फक्त वाक्यांखाली टिंब करते किंवा पानं दुमडून ठेवते...
शेवटी औषधाबरोबर हेही करणं तितकंच महत्वाचं आहे.


So i will help you read those books....
.....and we will put the lonesome back on the shelf!   

Tuesday, December 28, 2010

तहानलाडू - भूकलाडू


लहानपणी कितीदातरी ऐकलेले हे शब्द... अजूनही लहान मुलांच्या गोष्टी वाचतो तेव्हा अडखळतो या शब्दांना....
काय असतात खरच हे तहानलाडू-भूकलाडू?
कसे दिसतात? कसे लागतात? चव कशी असते? आवडतील का आपल्याला? नाही आवडले तर कशाबरोबर  तोंडीला लावावेत? किती दिवस टिकतात? भागते का तहान? भागते का भूक? मावतात त्या पुरचुंडीत? किती लाडु बरोबर घेतात लोकं generally? घरीच बनतात कि विकत मिळतात? कशाचे असतात actually? काय भाव असतो? एका वेळी किती खावेत? जास्ती खाल्ले तर बाधतात का? तोंडाला वास तर नाही ना येत खाल्ल्यावर?
काहीच माहिती नव्हतं त्यांच्याबद्दल..

गोष्टीमधले लोकं/प्रवासी नेहमी खूप दिवस चालतात. कोणाला जवळ नसतंच जायचं-सगळेच लांबच्या ठिकाणाचे प्रवासी. किंवा जवळच्या प्रवासाची कसली आलीये गोष्ट?
मग खूप थकून-माकून ते बसतात एखाद्या जीर्ण झाडाच्या पारापाशी. उन्हाने तापलेले, धुळीने माखलेले, भुकेले, चालून पायाचे तुकडे पडलेले ते बिचारे प्रवासी.
गाठीला बांधलेली आपली पुरचुंडी उघडतात ते आणि त्यात हे तहानलाडू-भूकलाडू असतात त्यांच्या साथीला...
मग प्रवासी ते लाडु खातात. प्रवासाचा शीणवटा जातो सगळा त्यांच्यामुळे. आणि परत नव्यासारखे होतात ते.
नव्या उत्साहाने परत प्रवास चालू राहतो होतो त्यांचा....
.... अशी, इतकीच काय ती त्यांची ओळख होती मला..  

आपलेच जुने शब्द जेव्हा आपलेच "तहानलाडू-भूकलाडू" होतात तेव्हा असंच काहीसं वाटतं..

(लिहणं गरजेचं आहे. कदाचित हा लाडु पुढे जाऊन कोणत्या तरी प्रवासात कामाला येईल...)

Sunday, December 12, 2010

दोघं

भिजल्यामुळे अंगाला शुभ्र सुती कापड जागोजागी चिकटलेल्या स्त्रीचं अर्धनग्न painting जितकं आवडलं तितकंच लांबसडक बोटांनी काही हस्तमुद्रा करत असलेल्या आणि अर्धोन्मीलित डोळ्यांनी शांतपणे  हसणाऱ्या बुद्धाचं painting हि आवडलं.

मी त्या दोन paintings मधून बाजूला झाल्यामुळे त्या दोन paintings ने एकमेकांकडे बघितलं असतं तर ?
तर..
त्या स्त्रीने दुसऱ्या कपड्याने झाकपाक करायची धडपड केली असती कि बुद्धाच्या शांत चेहऱ्याकडे बघून ती तेही विसरून गेली असती?
निथळत्या शरीराकडे पाहून बुद्धाच्या पापण्या जराश्या का होईना किलकिलल्या असत्या का?

Tuesday, November 30, 2010

...काखा वर !

"Safety First!",  "Follow Traffic Rules", "Wear Helmet"  चे पोस्टर्स घेऊन उभे होते शाळेतली पोरं त्या सिग्नलला... 
कपड्यावरून तरी ती मुकबधीर शाळेतली मुलं वाटत होती.
उन्हात उभी होती, भरपूर pollution असलेल्या चौकात, टोपी-मास्क काहीही न घालता...
कितीवेळ उभी राहणार आहेत अशी? माहिती नाही...
काही खाल्लं असेल सकाळपासून? माहिती नाही...
लोकांना traffic rules समजावून सांगावेत असं त्यांना खरच वाटत असेल? वाटत नाही...  
ते असे पोस्टर्स घेऊन उभे राहिल्यामुळे खरच काही फरक पडेल? हेही वाटत नाही...
 
मुकबधीर मुलं म्हणजे केवळ (भावनाशून्य) खांब आहेत असं वाटत असतं  का लोकांना? काहीही अडकवा त्यांच्या गळ्यात - ते काही बोलणार नाहीत, काही विरोध करणार नाहीत...
....शिवाय अशा मुलांकडून हि कामं करून घेतली कि लोकांना जास्ती Appeal होतात...
जसे अगदीच सुमार greetings, मेणबत्त्या, उदबत्त्या त्यांच्या नावावर खपवल्या कि जास्ती खपतात तसं...
किंवा वर्षभरात असे १२-१४ campagnes केले/दाखवले कि donations पण जास्ती मिळतात असा सुप्त हेतू असतो या लोकांचा?                 
 
किती दिवस "Special Children" या गोंडस नावाखाली त्यांच्या disabilities cash करणार आहोत आपण?
"Slumdog Millionair" मधली लहान मुलांना अपंग करून त्यांच्याकडून भिक मागवून घेणारी टोळी आठवली. शिसारी आली... त्यांच्याशी compare करू नये हे मान्य आहे, पण जर तशी आठवण झाली म्हणजे काहीतरी साम्य असेलच ना?
 
जाऊ देत..इथेच थांबवतो. तसंही मला खूप logical, सामाजिक, वैचारिक  इत्यादी  नाहीच लिहिता येत किंवा विचार पण नाही करता येत त्याबद्दल..
(may be हा माझा escape असेल, पण तसंही कोण जाब विचारणारं आहे मला इथे? त्यामुळे चालायचंच)
 

Monday, November 8, 2010

Old Monk

३०...
जहाजाला त्याचा anchor सावरणार, सांभाळणार, एकाच जागी ठेवणार ...
Anchor समुद्राच्या एखाद्या कपारीत, कोनाड्यात अडकणार... anchor ला ती कपार धरून ठेवणार...
२-३ मोठे दगड, कातळ मिळून ती कपार किंवा कोनाडा तयार झालेला असणार...
त्या दगडांना मग जमिनीने घट्ट धरून ठेवलेले असणार...
जमीनपण काय तर पृथ्वीचाच भाग... पृथ्वीनेच तिच्या गुरुत्वाकर्षनाने जमिनीला धरून ठेवलेले असणार....
पृथ्वीला सूर्याने त्याच्या गुरुत्वाकर्षनाने जखडून ठेवलेले असणार...
सूर्यहि अंधारात "कशाला" तरी टेकून उभा असणार...
"कशाला" हि गोष्ट पण कोणाच्या तरी आधाराने तरलेली, तगलेली, बाकीच्यांना आधार देत उभी असलेली..

जहाजाने आपण भरकटलो म्हणून "कशाला" हि जबाबदार धरू नये....उठसूट कशाला "त्याला" दोष द्यायचा ?

६०...
साला....नियती इतकी बेक्कार असते ना..

आपल्याला वाटत असतं आपण नेहमीचा रस्ता सोडून वेगळ्या रस्त्याने जातोय ते आपल्या मर्जीनेच ...
..पण असं नसतं, आपल्याला दोन रस्ते मिळणार आणि त्यातला वेगळा रस्ता आपण निवडणार हेच ठरलेलं असतं... Choice नसतोच तो, उलट उगाच आपल्याला खेळवणं असतं ते....
........तो निर्णय आपल्या मनाने घेतला म्हणून आपण  खुश असतो आणि वर कोणीतरी हसत असते.. 

घसरगुंडी वरून लोक मजा करत खाली येत असताना आपण तिच्यावरून उलटीकडून चढत असतो.. आपल्याला वाटत असतं आपण प्रवाहाविरुद्ध चाललोय...
..पण असं नसतं, आपलं destination त्या रोडच्या डाव्या बाजूलाच असतं (in India and Britain :D) म्हणून आपण तसे जात असतो. विरुद्ध दिशेने जाताना केस विस्कटणे याची नशा वाटते आपल्याला पण ते तसे होणे हेच ठरलेलं असतं..
........आपण प्रवाहाविरुद्ध पोहण्याच्या कैफ मध्ये असतो आणि वर कोणीतरी हसत असते.. 

सगळं चांगलं-सरळ चाललेलं असताना आपण मधेच थांबतो, उलटीकडे चालतो परत किंवा त्याच ठिकाणी घुटमळतो, हरवून घेतो स्वतःला.. जीवनाच्या प्रवाहाच्या वेगात किंवा नाकासमोर चालणं मान्य नसतं आपल्याला. आपलं जीवन असं boring, monotonous असणं किंवा कोणीतरी आपल्याला drive करतोय हा विचार न पटून मग आपण तो प्रवाह सोडून बाहेर पडायला जातो..
..पण असं नसतं. आपण बाहेर पडणार, भरकटणार, थोडा वेळ त्या ठिकाणी time-pass करणार हेच ठरलेलं असतं.. प्रवाहाच्या बाहेरच किंवा आडवाटेलाच काहीतरी वाढून ठेवलेलं असतं अशावेळी..
.......आपण flow बरोबर न जाता आपला वेग आणि रस्ता आपणच ठरवतोय या समाधानात असतो आणि वर परत कोणीतरी हसत असतं.. 

आपल्याला वाटत असतं आपणच ठरवलंय काय आणि कोणाला वाचायचंय ते. कधीतरी अजाणत्या वयात मग आपण GA वाचतो.... मग कधीतरी चांगल्या मूड मध्ये असतानासुद्धा अचानक हे असं आठवतं.. कुठेतरी लपून बसलेले GA, त्यांच्या भीत्या, विचार घेऊन असे पिंगा घालतात, छळतात... कधीकाळी आपणहि असा विचार करायचो हे कळून कसंतरीच वाटत असतं.... तरी पण आपण लिहितो, पटून न पटल्यासारखं कळूनही आपण आपल्याच मनाचं जगायला जातो....
..पण असं नसतं, मी GA वाचणार, कधीतरी ते भिडणार आणि कधीतरी ते छळणार हे असंच होणार असतं....GA च्या आड लपून मी माझेच विचार मांडत असतो आणि मग मी त्याच खवट आनंदात असतो आणि तेव्हाही वर परत कोणीतरी हसत असतं....

मग आता मी हे सगळं लिहिणार आणि तरीही नियतीचे अस्तित्व नाकारणार, स्वतःला पटेल तेच करणार...स्वतःच्या निर्णयांची जबाबदारी स्वतःच घेणार. आणि ते घेतले म्हणून मी माझ्याच नजरेत उतरणार किंवा उंचावणार..
पण असंच "असतं"... नियती तिच्या नियतीमध्ये लिहिल्या प्रमाणे वागणार आणि आपल्याकडे बघून हसणार....आणि आपण हि आपल्या नियतीमध्ये लिहिल्याप्रमाणे तिचं अस्तित्व नाकारणार आणि तिला नजर भिडवून उलट smile देणार....
....आता मात्र अजून खूप वर दोघांकडे कौतुकाने बघून तिसरंच कोणीतरी हसत असतं..  

९०..
पूर्वी असेलही मी असा पण आता मी नाहीये Old Monk....  लहानसं पोर होऊन झोपायचं आहे मला कुशीत...

Thursday, November 4, 2010

Design Flaw



खरतर हा खूप  मोठा 'Design Flaw' आहे हा .. 
आंघोळ  उरकून, tub मधून बाहेर पडून, समोरच्या भिंतीभर पसरलेल्या आरशात बघावं... तर बाथरूम मधल्या गरम पाण्याच्या वाफेमुळे आरसा धुरकट झालेला असतो..
काहीच दिसत नाही मग अशा आरशात, दुधी काच दिसत राहते नुसती आणि काही ठिकाणी थेंब ओघळून झालेल्या पाणवाटा ..
लाजेचा पडदा बाजूला सारून ज्यावेळी स्वतःला पूर्ण बघायचं असतं त्यावेळी असा हा  बाष्पाचा, वाफेचा  पडदा आड येतो.... 
मग हात फिरवून हा पडदा हवा तेव्हढा बाजूला सारायचा आणि न्याहाळायचं स्वतःलाच.

आदल्या रात्रीचं चेहऱ्यावर आलेलं हसू पुसू न देता शनिवारी सकाळी अंघोळ उरकली, स्वतःचे भरपूर वेळ लाड करून घेत.... 
उठलो tub मधनं, समोर बघतो तर आरशाचा कॅनवास भिंतभर पसरलेला- पांढरा , दुधी किंवा धुक्कट कॅनवास...
बाष्पाचा, वाफेचा , धुक्यासारखा तलम  कॅनवास... 
त्यावेळी मग तो "Design Flaw" न वाटता त्या कॅनवास वर काहीतरी मस्त काढावासं वाटलं..
तो कॅनवास बोलवत होता स्वतःला भरवून घायला..मलापण उतरावं असं वाटलं त्यावर... 
आरशात स्वतःलाच बघतो ना नेहमी आपण ? मग या इतक्या सुंदर कॅनवास वर पण परत स्वतःलाच बघायचं?? 
....तुझं नाव काढलं... एकदम मोठ्या अक्षरात ...भिंत भरून....पूर्ण कॅनवास भरेल इतकं मोठं...  
बोटं ब्रश झालेली होती आणि त्या कॅनवास वर त्यांचा स्पर्श लोण्यासारखा वाटत  होता... सर्र्सर्र बोटं फिरत होती काचेवर, ice-skating सारखी.... खूप छान वाटत होतं...
आणि अगदी खुश होऊन "j" वरच्या  टिंबाऐवजी लहान heart पण काढला.. ते काढताना गम्मत वाटत होती..... उगाचच doodle :)
आदल्या  रात्रीच्या  smiles ची एक कॉपी पण  ठेऊन दिली नावाच्या खाली... ते smile तुझं होतं, माझं होतं कि आपलं होतं ? काय फरक पडतो?
त्याच खुशीत आवरलं मग मी...बाहेर जायचं होतं...बरंच लांब...

हळूहळू वाफ निवत गेली...बाष्पाचा पडदा जसा आला होता तसा नाहीसा पण झाला.. धुकं जसं  अचानक  नाहीसं होऊन जातं, अगदी काहीच खाणाखुणा मागे न ठेवता...तसंच झालं..
२ मिनिटापूर्वी मी या आरश्यावर काही लिहिलं असेल यावर शंका यावी इतका तो आरसा स्वच्छ झालेला होता...एकदम clear, धुक्याचा  पडदा बाजूला सरला कि कसं एकदम स्वच्छ दिसायला लागतं तसं...
ना तिथे कॅनवासच्या काही खाणाखुणा होत्या, ना थेंबांच्या पाऊलवाटा...ना तुझ्या नावाचा उल्लेख, ना ओठभर हसणारा smiley ...
काहीच नव्हतं तिकडे...नुसता भिंतीभर पसरलेला आरसा होता तिकडे.....
काहीवेळा पूर्वी तुझं नाव मिरवणारा तो कॅनवास आता मला माझंच प्रतिबिंब दाखवत होता..

direct आठवड्याने आलो घरी.. ज्या मनस्थितीत बाहेर पडलो होतो त्याच्या अगदी उलट mood मध्ये...खूप काही काही घडलं होतं आठवड्यात.... अगदी होत्याच नव्हतं इतकं झालेलं.. भिंगरीगत फिरलो- कधी आपल्याच लोकांभोवती, कधी काहीच संबंध न आलेल्या परक्या लोकांभोवती तर कधी  स्वतःभोवतीच गरागरा.. थकलो होतो खूप, भांडलो होतो सगळ्यांशी,  स्वतःला prove करून दमलो होतो, अगदी माझ्यावर मीच प्रश्नचिन्ह काढावे इतका down झालो होतो... फायली इकडे तिकडे फिरवून-हजार लोकांकडे जाऊन शेवटी मोकळ्या हातानेच आलेलो घरी... जाताना वाटलंच  नव्हतं इतकं उलटं  होईल एका आठवड्यात...आजूबाजूचं इतकं safe समजलेलं जग असं पलटी खाईल असं वाटलं हि नव्हतं.... चूक माझीच असेल कि मीच ते खूप safe, secured, predictable असेल असं imagine केलं  होतं...
खूप दाटून आलेलं ...shower चालू  करून भरपूर रडून घेतलं.. आठवडाभर दाटलेलं सगळं बाहेर पडत होतं... ओल्यानेच बाहेर आलो...हरलेल्या स्वतःला बघायला आरशासमोर उभा राहिलो..
वाफेमुळे सगळा आरसा दुधी झाला होता...
आणि आरशाच्या त्या कॅनवास वर तुझं नाव, त्याच्यावरच्या लहानश्या heart सहित आणि आपल्या smile सहित स्पष्ट दिसायला लागलं होतं....

मग त्या धूसर आरश्यात मला मीच दिसायला लागलो... मी जसा होतो तसा..परत एकदा... जसा हवा होतो तसा... 
असं अगदी दाटून आलं कि तू तुझी आश्वासक smile घेऊन  समोर हजर असणे याला Design Flaw म्हणणार का आता ?