Pages

Saturday, February 28, 2015

मथुरानगरपती, काहे तुम गोकुल जाओ?

प्रिय मथुरानगरपती,

हो मथुरानगरपतीच, आपण सगळेच. आपल्या ४x४ फुटाच्या ऑफिसचे, २१ इंची laptop च्या स्क्रिनचे, आपल्या फुटकळ टीमचे, त्याहूनही गरीब असणाऱ्या आपल्या प्रोजेक्टचे आपण राजेच. मग कितीही मोठ्या कंपनीमध्ये आपण छोटुसा भाग असेनात का किंवा छोट्याश्या स्टार्टअपमधली जरा मोठी पोझिशन.. आपण नगरपतीच. कुठल्यातरी दूर देशात, हजारो मैलांची यमुना पार करून आलेलो आपण सगळे मथुराराजच. आपल्या नोकरीचा सुंदर ताज मिरवत, हातात किंवा खांद्यावर आपला राजदंड सांभाळत आपण इकडे-तिकडे वावरत असतो. आपला मनोहर वेश, परका-स्वच्छ-सुंदर देश दाखवत, लाखो लहान मोठ्या टेकड्या-झाडं-झुडपं-बिल्डिंगांवर आपल्या check-ins चे झेंडे गाडत, वेगवेगळ्या मेजवान्यांचे फोटो शेअर करत किंवा potluck ने पोट भरत, शेकडो लोकांना भेटून feeling awesome किंवा अजून काही ठेवणीतल्या/नेहमीच्या भावना वाटून घेत असतो. मुलांच्या क्लासेसच्या वेळा आणि त्यांच्या  accent शी जुळवून घेत असतो. उत्साहाने सण आणि त्याहूनही जास्ती उत्साहाने गोकुळातली सुख-दुःख आपण इकडे-मथुरेत साजरी करत असतो. आपलं राज्य मस्त चालू असते एकदम...

तिकडे-गोकुळात पण राधा-प्रिया-आई-वडील आपल्या रहाटगाडग्यात मग्न असतात. आपली तिकडची घरं, बँकेची खाती, आपलीच लांब-जवळची नाती आनंदाने सांभाळत असतात ते. स्वतःची पत्थ्य-पाणी-औषधांचे डोस आणि डॉक्टरांच्या चकरा याच्यात त्यांचाही दिवस कसा संपतो कळत नाही त्यांना. स्लोस्पीड इंटरनेट, इंफेक्टेड computers आणि नीट ऐकू न देणारे फोन, हे सगळे त्यांना आपल्यापासून disconnect नाही करू शकत. Technology शी लढून त्यांना पण भाग होता येते आपल्या कारभाराचा. पाठीवर थाप किंवा चेहऱ्यावर बोटं मोडता येत नसली तरी आपल्या गोष्टींना-घटनांना Like करत, रात्री-अपरात्री आपल्या फोनची वाट पाहात, दुखणी-खुपणी लपवून ठेवत, आपल्याला जाणवू न देता आपल्या आठवणी काढत गोकुळाचा कारभार पण व्यवस्थित चालू असतो....                                  

पण मग अचानक एक दिवस....
कुठून तरी कुठलेसे गाणे वाजते, कुठून तरी नेहमीचा वास येतो, कसली तरी चव आठवते, कशाच्या तरी स्पर्शाचा भास होतो.
अचानकच आजीचा सुरकुतलेल्या पण अगदी मऊ हातांचा स्पर्श आठवतो, आईचा केसांमध्ये फिरणारा हात, पाठीवरची थाप, घट्ट मिठी, चेहर्यावरून मोडली जाणारी बोटं, जोरदार गालगुच्चे, खोट्या-खोट्या मारामारीतले बुक्के-चिमटे, खेळताना प्लास्टिकचा चेंडु लागून लाल-निळी झालेली पाठ, केस नाकात हुळहुळत असूनही कुशीत आलेली ऊब, कोपरखळ्या आणि अगदी समेवर दिलेल्या टाळ्या, कपड्यांचे हजार वेगळेवेगळे स्पर्श, सारवलेल्या अंगणात अनवाणी चालणं, खडे टोचणारया पायवाटा हे अचानक जाणवायला लागतात.
आपली नावं कोरलेली भांडी, गुळगुळीत झालेली जिन्यांची लाकडं, आपुलकीने हसणारे कडी-कोयंडे, उंबऱ्यावरच्या नक्ष्या, खडानखडा माहितीच्या गल्लीबोळा, ओळखीचे वीट-पडके म्हातारे वाडे आणि डोकावणाऱ्या खिडक्या, नेहमीची वळणं आणि त्यावरचे चुकवलेले/चुकवता न येणारे खड्डे, गर्दीत गुंग झालेले चौक आणि वाहनांचा भार कसाबसा सांभाळून चालणारे रस्ते. सगळं-सगळं डोळ्यासमोर तरळून जातं.
कुरकुरणारे झोपाळे, आरत्या-घंटांचे आवाज, तुपाच्या फोडणीचा आवाज, हॉर्न, वेड्या गप्पा, आठव्या मजल्यापर्यंत हमखास जाणाऱ्या हाका, इरसाल शिव्या, पोरांचा गोंगाट, रात्री साडेआठ चे भोंगे अचानक ऐकू यायला लागतात. 
कुशीत शिरणारी-अंगावर मुतणारी बाळं, दंगा करणारी-गुडघे फुटलेली पोरं, भेगाळलेल्या पायाच्या काटक-मायाळू आज्या, तेलकट वासांची किराणा दुकानं आणि त्यातले खडूस दुकानदा आणि सातमजली हसणाऱ्या मावश्या अजूनच हसून आपल्याला बोलावत आहेत असं वाटत रहात.

आणि मग कुठेतरी आत हलते, डोळयात पाणी तरळते. दुसऱ्याच क्षणी आपले सगळे राज्य आणि राजपाठ धुळीसमान वाटायला लागते. राजदंड फेकून द्यावासा वाटतो. डोक्यावरचा मुकुट काढून ठेऊन त्या जागी आपल्या बाळांना घेऊन यमुनापार गोकुळात जाण्यासाठी पाय परत सरसावतात.
पण यावेळी मात्र आपलीच आपल्याला कैद असते. आपणच आपले बंदिवान. आपल्याच बेड्या आणि आपलेच पाय.
तट निवडण्याच्या स्वातंत्र्याचे ओझे आणि त्या ओझ्याखाली दबून गेल्याने पायातून जाणारे त्राण. अगदी अर्जुनासारखीच कोंडी....

मग एकांतात यमुनेच्या काठावर जायचं. हळुवार वारा वाहत असतो आणि सोबतीला यमुनेच्या पाण्याचा खळखळाट.  समोरच्या तीरावर गोकुळाचे दिवे टिमटिमत असतात, कुठल्याश्या मंदिरातून निजारतीचा आवाज येत असतो.
रात्रीची चादर गोकुळावर पांघरून सावकाशीने त्याच्या आठवणीच्या उबेत स्वतःपण झोपून जायचं.

मनात कुठेतरी बासरी वाजत राहतेच... "अब सुबह सुबह का ख्याल रोज, वापस गोकुल चल मथुराराज!"
शेवटी आपण सगळेच अर्जुन, आपण सगळेच वसुदेव, आपण सगळेच राधा आणि आपण सगळेच मथुराराज!

तुझाच,
मथुरानगरपती.



No comments: