Pages

Monday, May 3, 2010

'cliché' च्या ऐवजी दुसरा शब्द पाहिजे होता !

सालं ...हे परत सुरु झालंय...चहा घ्यायला पण ए.सी. च्या बाहेर येउशी वाटत नाहीये. चिकचिकाट साला आणि वरून खूप गरम होणार. तेव्हड्यात मग ढग येणार..संध्याकाळी भरपूर रंग सांडलेले आभाळात. मोकाट वारा सुटणार.खूप धूळ, पाला-पाचोळा, प्लास्टिक ब्यागा, पुठ्ठ्याचे डब्बे रस्ताभर भिंगरी घालणार.... बापाचा माल असल्यासारखा हा मुजोर वारा धिंगाणा घालत राहणार. मग गरीब झोपड्यांवर तो रेप करणार-त्यांचे पत्रे उचकटवणार, आत घुसून कपडे उडवणार. मोठ्या इमारतींशी लगट करणार हा - त्यांची दारं, खिडक्या , तावदानं जोरजोरात ठोठावणार. झाडांच्या झिंज्या ओढून वाकवणार त्यांना. कपडे उडवणाऱ्या वाऱ्याला कसबसं आवरत लोकं आडोश्याला जाणार. घरातली Safe मानसं मग त्यांची धांदल बघत coffee चे झुरके मारणार. काही आंबटशौकीन लोकं सिनेमातल्या रेपसीन सारख्या आवडीने हा वाऱ्याचा मस्तवालपणा खिडकीअडून पाहणार. काही लोकं फोनवरून हा वारा दुसर्यांना ऐकवणार...
आणि मग हा पाऊस पडणार... जणू वारा उपगुंड आणि हा पाऊस त्यांचा म्होरक्या. हा पण वेड्यासारखा बसरणार-फुटणार . काही आचपेच न ठेवता..मिळेल त्याला झोम्बणार, मध्ये येईल त्याला झोडपणार, निस्ता धिंगाणा त्याचा. आई-बहिण-भाऊ न जुमानता मिळेल त्याची मारणार. मग साले ते टपोरे थेंब मातीत घुसणार. एकामागे एक रानटीपणे घुसत राहणार मातीत.. पण पेताड नवऱ्याच्या बिचाऱ्या बायको सारखी माती हे सगळं सहन करणार. आधी कावरीबावरी होणार मग विस्कटणार, आणि मग स्वतःच्या केसांच्या झिंज्या पिंजारून रांडेसारखी अजूनच लगडणार त्या पुरुषी थेंबांना. थकून-भागून सुस्तावणार ती आणि तिचा घामट वास जाणार दूरदूरवर.. सगळ्यांना समजणार मातीचा आणि पावसाचा अंगसंग चालूये ते.... साला 'पाऊस' पण cliché झालाय खूप आजकाल...

सालं....रात्री झोप येत नसणार. काहीतरी खुसपट sites चालू असणार. आणि अचनक lights जाणार. बाहेर वाऱ्याने दोनेक DP जाळल्या असणार किंवा शे-दोनशे तारांना तोडलं असणार त्याने. त्याच्यामुळे सगळीकडे अंधारलेलं. मोजक्या श्रीमंत घरात Inverter च्या जोरावर काही दिवे माज करत लुकलुकणार. परत हप्ता-वसुलीचा खेळ सुरूच राहणार. वाऱ्याचा नेहमीचा आकांड-तांडव. तेच हट्टी पोरासारखं खिडक्या-दारं वाजवणं सुरु झालेलं. आक्रस्ताळीपणा सुरूच. विजा चमकवणार, आख्खे-च्या आख्खे ढग फोडणार हा.... भूकंप झाल्यासारखं गडगडणार वर आभाळात. कोथरूड ते कोरेगाव पार्क पर्यंत एक भीतीची, विजेची, गडगडती रेषा सापासारखी चमकून जाणार. कितीही सांभाळले स्वतःला तरी खूप भीती वाटणार. कुणाचा तरी हात हातात घट्ट असावा असे वाटणार. कुणाच्या तरी कुशीत, मिठीत लपून रहावेसे वाटणार. मग मी दार धाडकन बंद करणार. बेडवर झोकून देणार स्वतःला. उशी उराशी घट्ट धरून लोळत पडणार. बाहेरच्या वाऱ्याने पंखा हलणार, पडदे फडफड करत राहणार, उर धपापत राहणार. संदीपच्या पंधरा कविता आठवणार,.सौमित्रच्या ५-१० आणि मग इकडच्या तिकडच्या,.लुंग्या-सुन्ग्या किंवा मान्यवरांनी लिहिलेल्या अजून १५-२० आठवणार. पाउस-वारा ऐकू पण येऊ नये म्हणून उशी डोक्याशी घट्ट धरलेली असणार. मग Mobile कडे लक्ष जाणार. Unlock केला कि वखवखणारा उजेड येणार त्याचा डोळ्यावर. ना कोणाचा Missed-Call असणार ना कोणाचा SMS. मग पाठ असलेला number dial करणार अन लगेच Cancel पण. मग जुने SMS वाचणार ...कंटाळून परत Mobile परत Switch-Off करणार. परत आढ्याकडे तोंड. मधेच चारदा सु ला जाऊन येणार. होत नसताना उगाच अपेक्षेने उभेच राहणार. पाणी पिणार,.थोडं कराकरा खाजवून घेणार. परत येऊन बेडवर झोकून देणार. रडू येत नसणार पण टरारा दाटून आलेलं. त्यात बाहेर साला हा मनसोक्त बरसतोय, मोकळा होतोय....खाडकन त्याला mobile फेकून मारावासा वाटणार. मग परत आठवण येणार. आशेने Mobile परत Switch On करणार. ना कोणाचा Missed-Call असणार ना कोणाचा SMS..........साला.....'एकटेपणा' पण कसला cliché झालाय....

आणि मग इतकं होऊनही स्वतःच स्वतःला समजवावं लागणार. परत Gonna Rise Up. दार उघडून जड पायांनी बाहेर जाणार. थोडं भिजून येणार. काहीतरी गोष्टी सांगून स्वतः ला लोरी म्हणणार. भिजल्यामुळे झोप पण लगेच लागणार. सकाळी लवकर उठवणार नाही. घाईघाईत आवरणार. रात्रीचा पावसाचा कल्ला बाहेर दिसणार. मग चिकट चिकट रस्त्यावरून office ला जाणार. गेल्या गेल्या गोड हसावं लागणार. मग खूप busy आहे असा भासवून कामं लांबवत राहणार. मधेच भुरट्या गप्पा -गोष्टी-जोकस मारणार. २-४ वेळा Bank Balance चेक करणार. भरमसाठ saving चे आकडे पाहणार, सुखावणार. खूपच भूक लागली रात्री कि नाईलाजाने घरी जाणार.. हा साला बाहेर रिपरिपतोच आहे. कसबसं जेवण करून परत computer वर थोडं मोकळं होणार आणि परत blog शी लगट सुरु करणार, काहीतरी खरडणार...श्या ..साला 'life' पण किती cliché झालंय ..

सालं रोजचय हे.. दररोज 23 ठार आणि 48 जखमी होणार, १५ जणीवर रेप झालेला असणार- त्यातल्या 7 जणींना मारून टाकलेलं असणार. कंटाळून ७-८ लोकं रोज आत्महत्या करणार, 17 ठिकाणी दरोडे होऊन खून झालेले असणार. 11 लोकांच्या अनैतिक संबंधातून हत्या झालेल्या असणार. काही लोकं गाडीखाली येणार, काही आकस्मिक तर काही अपघाती मृत्यू च्या नावाखाली पोलीस स्टेशनच्या फळ्यावर जमा होणार. ५ मित्र diabetics ने आजारी असणार, ७ जणांना hypertension,.चौघे angioplasty करत बसलेले. 9 जणांना कमरेचे-पाठीचे दुखणे, .. 19 जणांना already attack आलेला. त्यातले काही paralyzed. रोज कुणी ना कुणी, कोणत्या ना कोणत्या कारणाने मरतंय. चायला ... साला..'मृत्यू' पण किती cliché झालाय...

2 comments:

me said...

Chayla.. far vaiet language aahe lekhakachi.. aikta aikta kilas yete.. kuthun shikla kon jane..

sagar said...

Thanks for the complement, 'me' ! (Yes, I take it as the complement)
हासडलेली शिवी हि शिवीच वाटली पाहिजे आणि आणि अंगभर थरथरलेला शहारा हा शहाराच !
इतकं वाईट लिहावं कि वाचून शिसारी यावी आणि इतकं चांगलं लिहावं कि अंगावरून मोरपीस फिरावं !