थांब अशीच ...
अजून दोनेक श्वास ...
नको उतरवूस तुझ्या-माझ्या श्वासांनी विणलेलं हे सोवळं ....
थांब ...
...जोवर तुझ्या हृदयाच्या टपोऱ्या ठोक्यांचा बहर ओसरत नाही तोवर,
...जोवर तुझ्या या उष्ण श्वासांचे शरीरभर पसरलेले शहारे, धुमारे निवत नाहीत तोवर....
तोवर असंच असू दे माझ्या देहानं तुझं संगमरवरी चांदणं पांघरलेलं...
आणि माझा अंधार पसरलेला तुझ्या देहावर.
तुझ्या नखांनी छेडलेल्या तारांचे झंकार घुमत राहूदे माझ्या व्रणांच्या डोहात..
अन राहू देत निसटलेले माझे स्वर रेंगाळत
तुझ्या ओठांवरल्या अस्पष्टश्या तिळाजवळ.
..समेनंतरही अजून काही क्षण तरंगत राहू असेच सोबत ...
गंधाहून हल्के अन
असेच रिते
...
राहूदे देहांना असेच आदिम ..
असेच
तप्त .....असेच तृप्त....
थांब अजून ....
निदान श्वास तुटेपर्यंत तरी ??
No comments:
Post a Comment