कितेक प्रकारची अत्तरं. कुठून कुठून आली होती अत्तरं. गावाकडची, लहान शहरातून आलेली, काही देशी- काही विदेशी तर काही विदेशी नावाची देशी अत्तरं आणि देशी नावाची विदेशी सुद्धा !
आणि त्यांच्या बाटल्या तर ? एकेक अत्तराची बाटली म्हणजे वेगळीच कलाकृती. बहुतेक बिलोरी काचेच्या- काही गडद निळ्या तर अग्गदी लाल काही. काही पिवळ्या-भगव्याही. काही transparent तर काही आतला काहीच थांगपत्ता न लागू देणाऱ्या. अगदी चमकदार रंगात काही तर काही रंगहीन असूनही चमकणाऱ्या. नव्या देवदास मधल्या पारोच्या घराच्या खिडक्या वितळवून या काचेच्या बाटल्या बनवल्यात जणू.
आणि आकार तर काय विचारता ? काही अगदी बाकदार तोंडाच्या, तर काही आरामशीर स्थिरावलेल्या धष्टपुष्ट. काही अदाकारी ने झुकलेल्या तर काही ताठ, माजात मान सरळ ठेऊन उभ्या. काहींना आकर्षक पैलू पाडलेले तर काही अगदी एखाद्या शिल्पा प्रमाणे कोरीव. काही उंच, सुंदर - काही ठेंगण्या, हसऱ्या.
त्यात पण काही मातीच्या वाटाव्या इतक्या सुबक, तर काही चांदीच्या वर्खाने मढलेल्या. काहींच्या "फुस्स-फुस्स " करणाऱ्या नळी जवळ हिरे-मोती जडवलेले. काही काही गावठी flavours पण होते तर काही काही अगदी branded , घरंदाज अत्तरं पण होती.
सगळ्या बाटल्या वेगळ्या एकमेकांपासून. एकाच प्रकारची दुसरी बाटली, दुसरे अत्तर सापडणार म्हणे तुम्हाला.
किंमती पण अगदी रास्त. साधी स्वस्त अत्तरं पण होती आणि अगदी उंची, किमती अत्तरं पण होती. सगळ्या किंमतीतली अत्तरं होती अगदी सगळ्यांना परवडतील अशी. काहीकाही तर अत्तराच्या वापरलेल्या बाटल्या पण होत्या.
कोणी हि तर कोणी ती बाटली घेतली. आपल्या आवडीनुसार, ऐपतीनुसार, गरजेनुसार लोकं बाटल्या सॉरी अत्तरं खरेदी करत होते. खूप मागणी वाढली होती आणि खपही कित्येक पटीने वाढला होता.
दिवस संपताना ८ वर्षाचा जहांगीर म्हणतो कसा "बाबा, सगळ्यांनी बाटली बघूनच अत्तरं खरेदी केली. लोकं बाटल्या घ्यायला आले होते का अत्तरं ? एकानेही झाकण उघडून आत काय आहे , कसं आहे ते बघितलं नाही."
No comments:
Post a Comment