Pages

Saturday, March 26, 2016

जादूची ट्रिक आणि 'मसान' ची जादू

जादूची ट्रिक सामान्य. प्रसंगही तसा छोटा, अगदी साधा.
          दुर्गापूजेच्या जत्रेमध्ये आपल्या हिरो-हिरोईनची होणारी नजरा-नजर आणि त्यांची अगदीच  साधेपणाने उमलत जाणारी फ्रेन्डशिप. जत्रेमध्ये एका ठिकाणी जादूचे प्रयोग चालू असतात. हिरोईन आणि तिच्या मैत्रिणी समोर बसून ते खेळ गावठी-सुलभ आश्चर्याने पाहत असतात. आणि त्यांना पहायच्या बहाण्याने हिरो (दीपक) आणि मित्रमंडळी तिकडेच घुटमळत असतत.  स्टेजवर जादुगार एक घड्याळ गायब करतो. ते नेमकं हिरोकडे सापडतं. हिरो खुश होऊन हिरोईनकडे हसून बघत स्टेजवर जातो. हिरोईन पण त्याला स्माईल देते.  अगदीच साधा प्रसंग- जसं रेल्वे गेल्यामुळे खालचा पूल थरथरावा.

दुसरा प्रसंग असाच.
          दुसर्या गोष्टीतल्या छोटा मुलगा मोक्याच्या शर्यतीच्या वेळी गायब होतो. कुठल्यातरी चौकात बाल-सुलभ आश्चर्याने तो जादूचे खेळ बघत असतो. जादुगार एक निळी गोटी तोंडात टाकतो आणि गायब करतो. मग काहीवेळाने एक-दोन-तीन म्हणत ती गोटी परत काढून दाखवतो.

"मसान"
           गंगेच्या तीरावरच्या दोन गोष्टी. एक गोष्ट संस्कृत पंडिताच्या घरातली (देवी) तर दुसरी डोम/खालच्या जातीतल्या घरातली (दीपक).  दोन तीरावरच्या दोन गोष्टी. दोन समांतर चालणारे धागे. आणि यांना जोडणारी हि जादूची ट्रिक म्हणजे तिसरा प्रसंग:
            दुसऱ्या गोष्टीतील तो लहान मुलगा यावेळी ती ट्रिक दाखवतो. पहिल्या गोष्टीमधली अंगठी तो पाण्यातून शोधून काढतो आणि दुसऱ्या गोष्टीतील गरजू बापाला आणून देतो. अप्रत्यक्षपणे या दोन गोष्ठी जोडल्या जातात.
"रूल ऑफ थ्री" नुसार अगदीच साधेपणाने तो प्रसंग खूप मोठा परिणाम करून जातो.

"मसान" ची जादू या अशा लहान लहान गोष्टींमध्ये आहे.  देवीचे  (दुसऱ्या गोष्टीतली हिरोईन - रिचा चढ्ढा) कपडे, ती अगदी सतत बाळगत असणारी खचाखच भरलेली सैक, पुरुष वापरतात तसे तिचे wallet, गळ्यातला एक साधा काळा दोरा, तिची पियुष बद्दलची तगमग, देवीची  पियुषच्या घरच्यांशी झालेली भेट आपण फक्त बाहेरून बघत असतो तो प्रसंग, पोलिस पैसे मागताना एकदा आपल्या लहान मुलीला पण घेऊन येतो तेव्हा किंवा पहिल्या गोष्टीतली दीपकची चेन तुटलेली, जुनी-काळी सैक, फुगे हवेत सोडून कळवलेला होकार, बोटामध्ये रुतलेल्या अंगठीचं सहज-सोपं कारण, पहिल्या डेटचा कोल्ड-कॉफी-पिझ्झा-सेझवन सॉसचा मेनू, heart-shaped eraser, "Happy Birthday Surpise". आणि अशा बऱ्याच गोष्टी आणि बरेच between the lines अर्थ.

अजून एक आवडलेली गोष्ट: "मसान" मध्ये "आई" जवळपास नाहीचे. म्हणजे दोघंहि पोरके नाहीयेत अजिबात, पण त्या दोघांचं आपापल्या वडिलांबरोबरच नातं इतकं सुंदर मांडलंय कि आईची गरजच नाहीये. केवळ मूख्य पात्रंच नाही तर देवीच्या ऑफिस मधला सहकारी पण सांगतो "हम अकेले नही रेहते पिताजी के साथ रेहते है". लहानपणापासून फिल्म्समध्ये 'आई' या पात्राचे Trump Card वापरलेलं बघायची सवय लागून गेलीये, त्यामुळे "मसान"मध्ये वडील-मुलगा/वडील-मुलगी यामधील नातं बघणं खूप वेगळा, चांगला आणि आश्वासक अनुभव आहे.         

फिल्मचा शेवट तर अप्रतिमच!  कस्तुरीच्या शोधासारखं ती दोघं भटकत असतात. Closure साठी.
आणि शेवटी गंगेच्या तीरावरच्या या दोन गोष्टी, दीपक आणि देवी, संगमावरच एकमेकांना भेटतात.
पाण्यामधून ती होडी हळूहळू जातीये असा एक लांब शॉट आहे. तो पाण्याचा आवाज, मागे वाजणारं गाणं, होडीचे पाण्यावर उठणारे तरंग.
त्या शॉटमध्ये, त्या संगमावर आपल्यालाही Closure मिळाल्याचा अनुभव येतो.
 

Saturday, February 28, 2015

मथुरानगरपती, काहे तुम गोकुल जाओ?

प्रिय मथुरानगरपती,

हो मथुरानगरपतीच, आपण सगळेच. आपल्या ४x४ फुटाच्या ऑफिसचे, २१ इंची laptop च्या स्क्रिनचे, आपल्या फुटकळ टीमचे, त्याहूनही गरीब असणाऱ्या आपल्या प्रोजेक्टचे आपण राजेच. मग कितीही मोठ्या कंपनीमध्ये आपण छोटुसा भाग असेनात का किंवा छोट्याश्या स्टार्टअपमधली जरा मोठी पोझिशन.. आपण नगरपतीच. कुठल्यातरी दूर देशात, हजारो मैलांची यमुना पार करून आलेलो आपण सगळे मथुराराजच. आपल्या नोकरीचा सुंदर ताज मिरवत, हातात किंवा खांद्यावर आपला राजदंड सांभाळत आपण इकडे-तिकडे वावरत असतो. आपला मनोहर वेश, परका-स्वच्छ-सुंदर देश दाखवत, लाखो लहान मोठ्या टेकड्या-झाडं-झुडपं-बिल्डिंगांवर आपल्या check-ins चे झेंडे गाडत, वेगवेगळ्या मेजवान्यांचे फोटो शेअर करत किंवा potluck ने पोट भरत, शेकडो लोकांना भेटून feeling awesome किंवा अजून काही ठेवणीतल्या/नेहमीच्या भावना वाटून घेत असतो. मुलांच्या क्लासेसच्या वेळा आणि त्यांच्या  accent शी जुळवून घेत असतो. उत्साहाने सण आणि त्याहूनही जास्ती उत्साहाने गोकुळातली सुख-दुःख आपण इकडे-मथुरेत साजरी करत असतो. आपलं राज्य मस्त चालू असते एकदम...

तिकडे-गोकुळात पण राधा-प्रिया-आई-वडील आपल्या रहाटगाडग्यात मग्न असतात. आपली तिकडची घरं, बँकेची खाती, आपलीच लांब-जवळची नाती आनंदाने सांभाळत असतात ते. स्वतःची पत्थ्य-पाणी-औषधांचे डोस आणि डॉक्टरांच्या चकरा याच्यात त्यांचाही दिवस कसा संपतो कळत नाही त्यांना. स्लोस्पीड इंटरनेट, इंफेक्टेड computers आणि नीट ऐकू न देणारे फोन, हे सगळे त्यांना आपल्यापासून disconnect नाही करू शकत. Technology शी लढून त्यांना पण भाग होता येते आपल्या कारभाराचा. पाठीवर थाप किंवा चेहऱ्यावर बोटं मोडता येत नसली तरी आपल्या गोष्टींना-घटनांना Like करत, रात्री-अपरात्री आपल्या फोनची वाट पाहात, दुखणी-खुपणी लपवून ठेवत, आपल्याला जाणवू न देता आपल्या आठवणी काढत गोकुळाचा कारभार पण व्यवस्थित चालू असतो....                                  

पण मग अचानक एक दिवस....
कुठून तरी कुठलेसे गाणे वाजते, कुठून तरी नेहमीचा वास येतो, कसली तरी चव आठवते, कशाच्या तरी स्पर्शाचा भास होतो.
अचानकच आजीचा सुरकुतलेल्या पण अगदी मऊ हातांचा स्पर्श आठवतो, आईचा केसांमध्ये फिरणारा हात, पाठीवरची थाप, घट्ट मिठी, चेहर्यावरून मोडली जाणारी बोटं, जोरदार गालगुच्चे, खोट्या-खोट्या मारामारीतले बुक्के-चिमटे, खेळताना प्लास्टिकचा चेंडु लागून लाल-निळी झालेली पाठ, केस नाकात हुळहुळत असूनही कुशीत आलेली ऊब, कोपरखळ्या आणि अगदी समेवर दिलेल्या टाळ्या, कपड्यांचे हजार वेगळेवेगळे स्पर्श, सारवलेल्या अंगणात अनवाणी चालणं, खडे टोचणारया पायवाटा हे अचानक जाणवायला लागतात.
आपली नावं कोरलेली भांडी, गुळगुळीत झालेली जिन्यांची लाकडं, आपुलकीने हसणारे कडी-कोयंडे, उंबऱ्यावरच्या नक्ष्या, खडानखडा माहितीच्या गल्लीबोळा, ओळखीचे वीट-पडके म्हातारे वाडे आणि डोकावणाऱ्या खिडक्या, नेहमीची वळणं आणि त्यावरचे चुकवलेले/चुकवता न येणारे खड्डे, गर्दीत गुंग झालेले चौक आणि वाहनांचा भार कसाबसा सांभाळून चालणारे रस्ते. सगळं-सगळं डोळ्यासमोर तरळून जातं.
कुरकुरणारे झोपाळे, आरत्या-घंटांचे आवाज, तुपाच्या फोडणीचा आवाज, हॉर्न, वेड्या गप्पा, आठव्या मजल्यापर्यंत हमखास जाणाऱ्या हाका, इरसाल शिव्या, पोरांचा गोंगाट, रात्री साडेआठ चे भोंगे अचानक ऐकू यायला लागतात. 
कुशीत शिरणारी-अंगावर मुतणारी बाळं, दंगा करणारी-गुडघे फुटलेली पोरं, भेगाळलेल्या पायाच्या काटक-मायाळू आज्या, तेलकट वासांची किराणा दुकानं आणि त्यातले खडूस दुकानदा आणि सातमजली हसणाऱ्या मावश्या अजूनच हसून आपल्याला बोलावत आहेत असं वाटत रहात.

आणि मग कुठेतरी आत हलते, डोळयात पाणी तरळते. दुसऱ्याच क्षणी आपले सगळे राज्य आणि राजपाठ धुळीसमान वाटायला लागते. राजदंड फेकून द्यावासा वाटतो. डोक्यावरचा मुकुट काढून ठेऊन त्या जागी आपल्या बाळांना घेऊन यमुनापार गोकुळात जाण्यासाठी पाय परत सरसावतात.
पण यावेळी मात्र आपलीच आपल्याला कैद असते. आपणच आपले बंदिवान. आपल्याच बेड्या आणि आपलेच पाय.
तट निवडण्याच्या स्वातंत्र्याचे ओझे आणि त्या ओझ्याखाली दबून गेल्याने पायातून जाणारे त्राण. अगदी अर्जुनासारखीच कोंडी....

मग एकांतात यमुनेच्या काठावर जायचं. हळुवार वारा वाहत असतो आणि सोबतीला यमुनेच्या पाण्याचा खळखळाट.  समोरच्या तीरावर गोकुळाचे दिवे टिमटिमत असतात, कुठल्याश्या मंदिरातून निजारतीचा आवाज येत असतो.
रात्रीची चादर गोकुळावर पांघरून सावकाशीने त्याच्या आठवणीच्या उबेत स्वतःपण झोपून जायचं.

मनात कुठेतरी बासरी वाजत राहतेच... "अब सुबह सुबह का ख्याल रोज, वापस गोकुल चल मथुराराज!"
शेवटी आपण सगळेच अर्जुन, आपण सगळेच वसुदेव, आपण सगळेच राधा आणि आपण सगळेच मथुराराज!

तुझाच,
मथुरानगरपती.



Tuesday, February 25, 2014

लाईटचा खांब

चायला.. कधी कशाची आठवण येईल सांगता येत नाही. 'कशाची' म्हणालो मी, 'कोणाची' असं नाही.

नगरच्या जुन्या घरात दीड पायऱ्या उतरून आत गेलं कि डाव्या हाताचा कोनाडा माझी खेळायची जागा होती. कितीतरी लहान-सहान-किडूक-मिडूक गोष्टी होत्या माझ्या खेळात. डावीकडच्या पायरीवर वरती शत्रूंच्या सेना मांडायच्या आणि समोर- खाली आपला किल्ला. जिथे किल्ला असायचा त्याच्या खालची फरशी जरा इतरांपेक्षा वेगळी होती, खडबडीत आणि भुऱ्या रंगाची. घर खूपच जुनं असल्यामुळे त्या फरशी खालची जमीन बहुतेक (घुशींनी पोखरून) भुसभुशीत झाली असणार....
तर परवा, त्या फरशीवर काही आपटलं कि पोकळ आवाज यायचा, त्या आवाजाची आठवण आलेली...

बरीच वर्ष बाहेरून प्लास्टर नव्हतं बंगल्याला त्यामुळे खिडकीतून बऱ्याचदा पावसाचं पाणी आत यायचं. लोखंडी फ्रेम आणि लाकडी खिडक्या खरतर वाईट पण त्यातल्या त्यात स्वस्त combination होतं. लोखंडी फ्रेम पिच्कायची आणि लाकडी खिडक्या फुगायच्या. त्यामुळे खिडक्यांच्या खिट्ट्या कधी नीट लागायच्या नाहीत. खूप खटपट करून त्या लावाव्या लागायच्या. नाहीतर नाड्यांनी त्या खिडक्या घट्ट बांधायचो आम्ही.
तर परवा, त्या खिडक्यांच्या खिट्ट्या लावताना करावी लागणारी कसरत आठवली.

बाजूच्या जुन्या भिंतीवरून चालणे आमच्यासाठी मोठा पराक्रम असायचा. त्या भिंतीवर जागोजागी पक्ष्यांना दाणा-पाणी द्यायला म्हणून काही छोटे खड्डे केलेले होते मग ते चुकवत जावं लागायचं.
परवा त्या लहान खड्ड्यांचा बोटी सारखा आकार आठवला... उगाच...

मध्ये एकदा सातारच्या बागेच्या कुंपणाला लावलेला वायरीचा कडी-कोयंडा आठवला होता.

आणि आजतर आमच्या वाड्याच्या बोळी समोरचा लाईटचा खांबच आठवला..
अगदी छोटी ८-१० फूट रुंद बोळ होती आमची आणि बोळ जिथे रस्त्याला मिळते तिथे हा खांब होता.
या खांबाला जमिनीपासून एक-दीड फूट उंच असा सिमेंटचा बेस होता आणि खांबाला लागून ३-४ फूट उंच शेजारच्या दुकानाचा कट्टा.
आत्या-आजी मला घेऊन यायची कडेवर. अगदीच हडकुळी होती आजी, मी झेपायचो नाही तिला म्हणून मग ती खांबाला टेकून मला रस्ता-गाड्या-गाई दाखवत रहायची.
मग नंतर लहान असताना कट्ट्यावर चढायचे म्हणजे आधी या सिमेंटच्या बेस वर चढायचा आणि मग गुडघे टेकवून कट्टा सर करायचा. आधी अवघड जायचं ते पण मग नंतर तो खेळ बनलेला. इकडून चढून दुसरीकडून पायऱ्यांनी उतरायचं. Jungle Gym होती ती आमची.
'लोखंड-पाण्याच्या' खेळात हा खांब म्हणजे शेवटचा stop होता. आईच्या शाळेतून लोहचुंबक आणलेलं ते घेऊन लोखंड-पाणी खेळायचो, उगाच भाव पण खाता यायचा आणि शिवाय "हे लोखंड नाहीये- हे अलुमिनियाम आहे, ते स्टील आहे" अशी भांडणं पण नाही व्हायची. [between 'लोखंड-पाणी' मध्ये स्टील चालते]      
जरा मोठे झाल्यावर त्या कट्ट्यावर खांबाला टेकून उभे राहता यायचे. मग या खांबाला टेकून रोज संध्याकाळी आई शाळेतून यायची वाट बघत बसायचो.
वयात येत असताना, संध्याकाळी चितळे रोड वरून जाणाऱ्या मुली याच खांबाला टेकून मनसोक्त पाहायचो.
बोळी मध्ये क्रिकेट खेळताना या खांबाची लाईन म्हणजे फोर होती. Six म्हणजे Out कारण मग ball रस्त्यावर जायचा ना.
आतून पोकळ होता तो त्यामुळे खांबाला दगड मारला किंवा ball लागला कि मस्त आवाज पण यायचा. घंटा वाजल्या सारखा.
दहीहंडी मध्ये एक टोक खांबाला तर दुसरे समोरच्या भिंतीवरच्या खिळ्याला असायचे.
रस्त्याच्या समोरच्या बाजूला खूप श्रीमंत लोकांचा वाडा होता. दिवाळीच्या रात्री आमचे लहान-लहान फटाके संपले कि त्यांची आतिषबाजी सुरु व्हायची.-४ तास मग या खांबाला टेकून त्यांची दिवाळी बघत बसायचो. दहा हजाराची लड लागली कि खांबाला घट्ट धरून ठेवायचो, नवीन-नवीन शोभेचे फटाके पापणी न मिटता - गाल खांबाला चिकटवून बघत राहायचो. थंडीमध्ये खांबाला गाल लागले कि मस्त गार वाटायचं. एकदम गुळगुळीत झाला होता तो खांब, नवीन कपड्यांना मग त्या खांबाचे शिक्के लागून राहायचे...
नेहमी एखादा तरी पतंग या खांबावर फडफडत असायचा...
कित्येक वर्ष झाली असतील तिकडे जाऊन- तो खांब पाहून- त्याला टेकून. आज अचानक आठवला तो. भरून आले खूप.

एकवेळ माणसे आठवणं साहजिक आहे पण अशा काहीच्या-काही गोष्टी कशा काय आठवतात कळत नाही.
कुठल्यातरी काळच्या, कुठेतरी दिसलेल्या, कधीतरी हाताळलेल्या शेकडो गोष्टी डोक्यात असतात आपल्या. का आठवतात या गोष्टी? कुठे नोंद असते यांची? कशाशी नातं अस्त यांचं? का कधीपण डोके वर काढतात या मधूनच?
काही काही कळत नाही..

फक्त या गोष्टींचे स्पर्श, आवाज, चवी अजूनही जाणवतात राहतात.

Sunday, July 28, 2013

−47 °C


"...म्हणजे आजच"
हाताने एक वीत अंतर आकाशावर मोजत नानूक पुटपुटला आणि टेकाडाच्या आडोश्याला बांधलेल्या त्याच्या इग्लूजवळ थांबला.

एव्हाना बराच अंधार पडला होता, घोंघावणाऱ्या थंड वाऱ्यांचा वेग आता वाढायला लागला होता. भुरभुरलेल्या बर्फासारखे आकाशात तारे पसरले होते. क्षितिजापासून एक वीत अंतरावर तो लालसर तारा आणि त्याच्या सरळ, ३ बोटं अजून, वर ध्रुवतारा. म्हणजे आजचाच दिवस होता तो.
   
हार्पून आणि काठ्या शेजारच्या मऊ बर्फात खुपसून त्याने स्लेजवरचे सामान उतरवले. कुत्र्यांना स्लेजपासून सोडवून त्याने जवळच्या हार्पूनला बांधले. सीलच्या कातड्याच्या स्लेजला कुत्र्यांपासून वाचवायला त्याने ती इग्लूवर ठेऊन दिली आणि कुत्र्याच्या लहान पिल्लांना त्यांच्या छोट्या इग्लुमध्ये सोडले. आणि मग छोट्या इग्लूच्या शेजारच्या बर्फात त्याने हातभर खोदलं. गेले २ महिने तेथे लपवून, जपून ठेवलेली ती गोष्ट त्याने बाहेर काढली. एक "Walrus Ivory Flute- वालरसच्या दातापासून बनवलेली बासरी"

गेल्याच उन्हाळ्यात त्याने वालरसची पहिली शिकार केली होती. एकट्याने त्या धिप्पाड वालरसच्या अंगात हार्पून खुपसला होता. जमिनीवरच तो संथ वालरस पाण्यात जाताच चवताळून गेला होता. जेव्हा चौघांनी ओढून त्याला पाण्याबाहेर आणला तेव्हा कुठे तो त्याचा विरोध संपला. त्या निष्प्राण वालरसकडे बघत बराच वेळ थरथरत होता नानूक. बक्षीस म्हणून त्याला  त्या वालरसचे दोन्ही सुळे मिळाले होते. एका सुळ्याचा त्याने स्वतःसाठी चाकू बनवला आणि दुसरा सुळा जपून ठेवला होता त्याने. मागे एकदा एका इंग्लिश व्यापाऱ्याकडे त्याने बासरी बघितली होती. बासरी हवी होती त्याला. बाहेरच्या उनाड वाऱ्याला सुरात आणणारी. मग तिथल्याच एका कलाकाराकडून दुसऱ्या सुळ्याची त्याने ही बासरी बनवून घेतली होती. पूर्ण पांढऱ्या रंगावर काळ्या रंगात कोरलेले शिकारीचे दृश्य. नुसती वाऱ्यात धरली तरी कितेक प्रकारचे आवाज निघायचे त्यातून.

चाकूने इग्लूचा बर्फ कापून तो आत जाताच वाट पाहून दमलेल्या नायलाने त्याला घट्ट मिठीच मारली. तिच्या मिठीच्या उबेत नानूक कितीतरी वेळ तसाच उभा होता. मग नायलाला खाली बसवून तिचा हसरा चेहरा तो न्याहाळू लागला. बर्फाच्या खिडकीतून येणारा प्रकाश नायलाच्या चेहऱ्यावर पडला होता. खिडकीतून तो लाल तारासुद्धा आत डोकावून बघत होता.
खिडकीकडे बोट दाखवून नानूक म्हणाला
"बरोबर एका वर्षापूर्वी. एका वर्षापूर्वी हा तारा इथेच होता, असाच डोकावत. आणि तू ही अशीच माझी, माझ्याजवळ"
हातातली बासरी तिच्या ओठांना लावत नानूक: "Happy Anniversary, Nyla".
नवऱ्याच्या पराक्रमाची ती इतकी सुंदर निशाणी पाहून ती हरखून गेली होती.
भानावर येताच ती म्हणाली "मला वारा ऐकव!"

बाहेर 47  °C तापमानात ते थंड वारे घोंघावत वाहत होते, त्यांना कोल्ह्यांच्या आणि कुत्र्यांच्या आवजाची भेसुरी संगत होती...
आणि आत...
...आत बासरीच्या सुरांमध्ये ही दोन उष्ण शरीरं लपेटली जात होती.
इग्लुच्या घुमटामध्ये घुमणारे ते बासरीचे सूर, एका तालात चालणारे दोघांचे श्वास, आणि एकाच लयीत धपापणारी शरीरं यांची मैफिल आत भरली होती.

Friday, November 23, 2012

अडगळीची खोली

आज फेस करायचंय तुला...

आज नाही केलं तर कदाचित मी तो दरवाजा कधीच उघडू शकणार नाही..

नाही, किल्ली हरवू नाही दिलीये अजूनही....
रोज पूजा आटोपली कि देव्हाऱ्याचा खालचा कोनाडा उघडून बघतो.. गेली पंधरावर्ष पडून आहे किल्ली तिथे..
किती विरोधाभास आहे ना हा? 'तुझ्या' खोलीची किल्ली आणि देव्हाऱ्यात? तसाच आणि तितकाच विरोधभास तर तुझ्या आणि माझ्यामध्येहि आहे म्हणा... असो.
हो. हजारो वेळा ती किल्ली दुरवर भिरकावून देण्याचे क्षण आले...
नको ती किल्ली... त्याने बंद केलेला तुझ्या खोलीचा दरवाजा आणि मुख्य म्हणजे तू...

नको होतास तू... नको असशील सुद्धा...  पण आज हवा आहेस..

तुझं नाव उच्चारता येण्याआधीच तू पळून गेलास...
मग तुला "तू" म्हटले काय आणि "तुम्ही" काय... फरक काय पडतो..
वयाचा काय तो तीसेक वर्षांचा फरक.. त्याचे काय सोयरेसुतक आता?
आणि तू तरी मला कधी हाक मारली होतीस का? कोणत्या नावाने?
तुझी एक हाक, तुझी एक झलक, तुझा हलकासाहि स्पर्श ... काही काही आठवत नाहीये... नपेक्षा  काहीच आठवू नये अशीच तजबीज करून ठेवली होती मी...

सुरुवातीला? सुरुवातीला  खूप प्रयत्न करायचो तुला आठवायचा.. आणि सोबत तुझ्या बरोबरच्या मला आठवायचा ...
कोणाकोणाच्या आठवणींतून भेटत रहायचास... तू कसा दिसत-वागत असशील याची उत्सुकता असायची...
प्रत्येक मित्राच्या बापांमध्ये मी तुला शोधायचो.. आजूबाजूच्या लोकांमध्ये तुझी छबी हुंदळत भटकायचो...
तुझे कुठं-कुठं उरलेले, कोणाकडून-कधीतरी चुकून सापडलेले, टोचणारे-बोचणारे तुकडे जुळवून तुझी प्रतिमा तयार केली होती...

पण मग हळूहळू जाणवत गेलं कि त्यात तू कमी आणि माझेच तुकडे जास्ती होते..
तुला लोकांमध्ये शोधून-शोधून कंटाळलो होतो मी... शिवाय त्यातून तसंही हशील काहीच होणार नव्हतं..
मग तो हट्ट सोडला... तेव्हाच तू सुटलास... तू मला तेव्हाच सोडलेस पण मला तुला सोडायला वर्षे  लागली...
तू नव्हतास ... 'तुझ्याबरोबरचा मी' तर त्याहूनहि कधीच अस्तित्वात नव्हतो... फक्त मी होतो आणि फक्त मीच राहणार होतो..

मग बाप असणाऱ्या पोरांत राहण्यापेक्षा बाप नसणारी पोरं जवळची वाटायची मला..
छे-छे ..सम-दुःखी म्हणून नाही.... तर ती मुलं त्यांच्या बापांबरोबर खेळताना, बापाबद्दल बोलताना सहन नाही व्हायचं...

इव्हन जेव्हा मला तुझ्या या खोलीचा शोध लागला तेव्हाही ती न उघडता तशीच कुलुपबंद करून ठेवली होती...
आजतागायत..
मला बाप नव्हता ....
मला बाप आवडत नाहीत ...
कोणाचेच...
सगळ्यांचेच ..

मला कधीच बाप व्हायचं नव्हतं ....

पण.. पण काल झालोय.....

आणि म्हणून आज मला माझ्या बापाच्या खोलीचा दरवाजा उघडायचाय...
मला माझ्या बापाला फेस करायचंय आज.....

Sunday, April 8, 2012

With Arms Wide Open


"Christ The Redeemer" चा तो statue/पुतळा जेव्हा पहिल्यांदा बघितला होता तेव्हाच खूप आवडला होता. काहीच माहिती नसतानाही त्या मूर्तीची (Statue ला 'मूर्ती' म्हणूयात 'पुतळा' नको) नोंद आतवर कुठेतरी झाली असेल. 

 
हिरव्याकंच पर्वताच्या सर्वोच्च शिखरावरची ती अतिभव्य मूर्ती. पण तरीही तशी साधीच. विशेषतः आपल्या नटलेल्या, दागिन्यांनी बरबटलेल्या मूर्त्यांपेक्षा तर विशेषच साधी.
अवघं आकाश कवेत असूनही जवळ बोलावणारे येशूचे लांबसडक हात, किंचित कललेली मान, त्याचा तो अगदीच साधा-ढगळ झगा. चेहऱ्यावरचे निरासक्त-शांत भाव.
भव्य तर वाटतेच मूर्ती - पण तरीही काहीतरी विशेष वेगळे आहे त्या मूर्तीमध्ये . येशू इतका उंच, मोठा असूनही आपल्याला तो सहज त्याच्या मिठीत घेईल असं वाटतं.
मला मिठीत/कुशीत घेणाराहक्काने ज्याच्या खांदा आसवांनी भिजवता येईल असा, ज्याच्या मिठीत सगळी पापं, चिंताथकवा दूर होईल असा येशू, मुर्तीरुपातला.
मूर्तीचं  नाव "Christ the Redeemer" आहे हे समजण्याआधीपासूनच हि मूर्ती मला तशीच वाटत आलीये- Redeemer. खरंच जर पापमुक्ती- पापक्षालन वैगेरे होत असेल तर मी गंगेत डुबकी मारण्यापेक्षा या मूर्तीला मिठी मारेन.
नाहीतरी दंतकथा-शाप-मुक्ती-संकटमोचन-नवस-संस्कारयांच्या ओझ्याने/भीतीने डोके टेकवण्यापेक्षा किंवा खरंच विश्वासाने/श्रद्धेने नतमस्तक होण्यापेक्षा जास्ती वेळा निव्वळ एका मिठीची गरज जास्ती असते. अशावेळी लहान बाळासारखं पळत जाऊन त्याच्या आश्वासक हातांमध्ये स्वतःला झोकून द्यायचं.     
With Arms Wide Open म्हटलं कि पहिल्यांदा हि मूर्ती आठवते..
 

इंग्रजी गाणी ऐकायला लागलो त्यावेळी सुरुवातीचा एक काळ "With Arms Wide Open (Creed)" नावाच्या गाण्याने भारलेला होता (एकूणच Creed ने). Scott Stapp ला जेव्हा तो बाप होणारे हि बातमी समजते त्यावेळी त्याने हे गाणं लिहिलंय (असं म्हणे). आपल्या होणाऱ्या बाळाचे स्वागत तो मोकळ्या मनाने करतोय पण त्याचवेळी थोडी धाकधूक पण आहे अशा अर्थाचे गाणे आहे ते. "Father Hood" वरचे अप्रतिम गाणे. आपल्याकडे आई होणे धामधुमीत साजरे होते, पण बाप होण्याचा तो आनंद celebrate करणारे ते एकमेव गाणे असेल.

एक प्रश्न नेहमी पडतो. हात पसरवून धावत-पळत येणाऱ्या बाळाला आपण मिठीत घेत असतो कि तेच आपल्याला त्याचा इवल्याश्या मिठीत घेत असते? तेच घेत असावे का? कारण सगळ्या चिंता-थकवा दूर करण्याचे काम त्याचे ते लहानसे Wide Open हात करत असतात. आपल्याला कुठे असं मोकळ्या मनाने कोणाला जवळ घेता येते? With Arms Wide Open?
नेहमीसारखे गर्दीत बुजलेले असताना हात जास्तीकरून खिशात किंवा बोलताना हाताची घडी असते
तर एकदा सिंहगडाच्या wind point गेलो होतो. संध्याकाळ, मस्त वारा सुटलेला.
तेव्हा असे हात पसरवुनस्वतःला विसरून वारा पीत होतोअगदी मीच वारा झालो होतो.
इतकं मुक्त क्वचितच कधी वाटलं असेल अगदी उडी मारली असती तरी वाऱ्यातच सामावलो असतो इतकं मुक्त
दोन्ही हात असे लांबवर पसरवून समोर येणाऱ्या कशालाही आनंदाने स्वीकारण्याइतका.
काही क्षण गेले असतील तसे पण लगेच भानावर आलोहात खाली केलेगारठले होते तेपटकन खिशात टाकलेमान आत घालून आल्या वाटेने परत गेलो.
तेव्हा जर Arms Wide Open केले नसते तर कधी कळलंच नसतं काय असते ती भावना.

पहिला Snow-fall पहात होतो. कधी एकदा गाडीबाहेर पडून तो बर्फ अंगावर घेतो असं झालं होतं.
Nasu Mountain च्या त्या पठारावरच्या एका ओंडक्यावर हात पूर्ण पसरून तोंडावर-अंगाखांद्यावर हलकेच येऊन बसणारा तो Snow अनुभवत होतो.
दाढीच्या केसांना, पापणीच्या केसांवर अडकून राहिले होते कितीतरी बारकुले कण. अगदी निवांत येऊन बसायचे ते.
कसलाही आव आणता, स्वतः वितळून जात असतानाचे क्षण हि ते कण किती निवांतपणे व्यतीत करत होते.
मी त्यांना माझ्या मिठीत घेत होतो. वितळून माझ्याच रक्तात सामावले जाणार होते ते शेवटी.
तसाच उभा होतो कितीतरी वेळ, ती पोज टिपिकल होती ती पण तो क्षण नक्कीच टिपिकल नव्हता.. at least माझ्यासाठीतरी नाहीच...
 
'कल हो ना हो'  मधल्या शाहरुखसारखं - हात पसरवूनपळत जाऊनगोल गोल फिरत खाली बसायचं होतं.
जपानच्या सर्वात उंच इमारतीच्या आवारात तसा video पण काढला होता. अगदी तशाच angle मध्ये... लाजत-बुजत -re-take पण झालेले.
पण हात पसरवून गोल गोल फिरत असताना खरंच भारी वाटत होतं. बघताना जितकं आवडले होते त्याच्या कितीतरी पट जास्ती तसे फिरताना आवडलेले. 
Sufi Whirling मध्ये फिरतात ना तसं.
दोन्ही हात लांब करून हृदयाला अक्ष मानून उजवीकडून डावीकडे फिरायचं.. स्वतःला असं लांब पसरवून टाकायचं आणि अगदी त्याचवेळी गिरकीच्या अक्षाभोवती सगळं एकवटून जायचं.. डोकं गरगरत असतं पण त्यात एक axis/अक्ष असतोकशाभोवती तरी फिरण्याचा एक कैफ असतो...
तो axis/अक्ष काहींसाठी देव असतोकाहींसाठी स्वतःकाहींसाठी ना दिसणारं पण जाणवणारं काहीतरी.
त्या अद्वैताची प्रचीती अशी With Arms Wide Open घ्यायची. 

Bungee Jumping केली तर तसेच हात पूर्ण मोकळे सोडून पडणारे मी खाली.. काहीचकशाचाच आधार नसताना तो fall मुक्तपणे अनुभवायचा आहे, स्वीकारायचा आहे... With Arms Wide Open.

पूर्ण रिकामं झाल्यावर दोन्ही हात पसरवून पडायचंमाझ्या हृदयाच्या ठोक्यांशी कोणीतरी गुज करत असावं.
एकेका श्वासाला श्वास देत तसंच पडून राहायचंनिवतानाचे ते क्षण तसेच With Arms Wide Open करून पकडायचे.    

किंवा Final Cut दिल्यावर दोन्ही हात बेडवर पसरून छताकडे तोंड करून पडायचं.
रक्य ठिबकत राहील, डोक्याला रक्ताचा पुरवठा कमी होत जाऊन डोकं झिंगायला लागेल... दिसणं कमी होत जाईल.
तेव्हा तसेच हात ठेऊन येणाऱ्या मृत्यूला स्वीकारायचं.... With Arms Wide Open ...  

तेव्हा...
या चांगल्या-वाईट क्षणांनो, या हलक्या-फुलक्या किंवा अवजड कणांनो, या सुखांनो, या दुःखांनो, या संकटान्नो किंवा या संधींनो..
तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे... अगदी With Arms Wide Open!

Tuesday, December 13, 2011

सटर-फटर


माझ्याच स्तोत्रांचे अर्थ मीच तुला समजावून सांगावेत इतका तू लहान निश्चितच नाहीयेस आता...
उलट स्तोत्रांमधून निघणाऱ्या अर्थांमध्येही मी नसतो हे कळण्याइतका मोठा झालास कि ये...
मस्त गप्पा मारत बसू...

-------------

तुझं चुकतंय यासाठी मी तुला सतत टोकणार नाही.
पण पळताना धडपडशील तेव्हा फुटके गुडघे घेऊन ये माझ्याजवळ...
मी फुंकर घालीत बसेन त्यावर ...   
खूप वाईट आहे मी...
पण तू ही शिकायला हवं आता तुझ्याच चुकांमधून...

------------

अनोळखी नजरेने दार उघडतं माझं घर आजकाल....
.....
घर आता घरासारखं नाही राहिलंय कि मीच आता मी नसतो?

------------

सगळं जग आपल्या हातात आहे म्हणताना आपला हात तरी आपला असतो का?

-----------

एकवेळ बाप होणं सोपं आहे. पण स्वतःच स्वतःचा बाप होणे खूप अवघड!

-----------

मला भिडणाऱ्या गोष्टी तुलाही तितक्याच तीव्रतेने भिडतील/जाणवतील असं नाही.
पण जेव्हा माझं "High" होणे तुला झेपणार नाही तेव्हा "Please, मला तसं सांगू नकोस."

-----------

वधू : पहिले पाउल कोण टाकणार?
वर : अरुंद आहे खूप दार आणि केवळ एकालाच प्रवेश आहे आत...
वधू : ?
वर : स्वतःला विसरून एक व्हावं लागेल. आपण दोघं नसून एकच आहोत असं वागावं लागेल. आहेस तयार?
वधू : आहे...
वर : उजवा पाय आधी...
वधू: तुझा कि माझा ?

----------

एका हातात सिगरेट आणि दुसऱ्या हातात मिनरल वॉटरचा बर्फाचा गोळा खाताना पाहिलंय तुला. काळपट पडत चाललेल्या गरमसर ओठांचा तू खरा? कि कैरी फ्लेवरने हिरवट आणि बर्फाने बधीर झालेल्या थंड ओठांचा तू खरा?  हा प्रश्न तेव्हाही होताच.

तृप्त-तप्त-निवल्या-नागव्या देहाने हैप्पी-मील मधल्या Toy शी खेळताना मिनिटभरापूर्वीचा तुझा आवेग कुठे होता ?
लहान मुलापेक्षा जास्ती कुतूहलाने तू त्या खेळण्याच्या हालचाली निरखत होतास.
मुलांना हैप्पी-मील मधल्या बर्गरपेक्षा त्याबरोबर मिळणाऱ्या Toy चं वेड जास्ती असतं, तसं तू मला तुझ्या या बालरुपाचे वेड लावलेस.

Samual Adams Seasonal Beer चा डार्क ग्लास एका हातात धरून दुसऱ्याने Transformer चे तुकडे जुळवून Optimus Prime बनवण्यात तू गुंग झाला होतास.
एकीकडे सळसळत तारुण्यात असताना दुसऱ्याच क्षणाला अवखळ बालपणात transform होणं कसं जमतं तुला?

----------

वयोमानापरत्वे नाही जमत आता लिहिणं. ब्लॉगबरोबरचा रोमान्स काही फुलत नाही आजकाल. मग असेच काही सुमार Bits n Pieces सुचतात. सटर-फटर काहीतरी....