Pages

Monday, September 19, 2011

चुप्प


अंथरुणात माझ्याबरोबर लोळत पडलेला मोबाईल सकाळी-सकाळी तुझा पहिला स्पर्श घेऊन येतो...  तुझे अस्पष्ट, झोपाळू शब्द कानांना गुदगुल्या करत झोपेतून उठवत असतात... जरा उशीर झाला उठायला कि मग तेच शब्द कानांच्या पाळ्यांशी  खेळत राहतात... अगदीच चिडले कि तिथे तुझ्या दातांचे व्रणपण सोडून जातात...
तुझा आवाज तुझा स्पर्श असतो....

उशीर झालेला असतो, अजिबात उठवत नसतं... तरी ते उठायला लावतात.. बेडवरून उठताच, दुसऱ्याच क्षणाला, परत खेचून घेतात.... पांघरुणाची घडी घातल्याशिवाय मग गळयाभोवतालचा हात सोडत नाहीत ते शब्द.. 
घाईघाईत आवरत असताना तुझे शब्द अवतीभोवती पिंगा घालत असतात... ओल्या केसाने-अंगाने  मोबाईलवर बोलत असताना केस पुसले ही जातात काही... निथळलेले काही थेंब आणि चुकलेले काही शब्द मग अंगावर शहारे आणून हसत बसतात...
तुझ्या आवडत्या परफ्युमचा घमघमाट खोलीभर पसरला कि... काहीकाळ केवळ तुझे श्वास ऐकू येत राहतात... शब्द बाहेर येण्यासाठी धडपडत असताना, श्वास मात्र स्पर्श करत राहतात...
तुझे श्वास तुझे स्पर्श असतात..
   
अपरात्री मधूनच झोपेतून उठून बोलतो... बोलता बोलता तू तशीच झोपून जातेस... किंवा भांडणात जेव्हा काहीच शब्द सुचत नसतात तेव्हा एकमेकांचे मौन केवळ ऐकत राहतो... निरोपाच्या वेळी जेव्हा काहीच बोलत नसतेस तू..तेव्हाही लांब जाताना तुझ्या मौनातून जाणवत राहतेस...
अगदी तुझं मौन सुद्धा स्पर्श करत राहतं मला..

कधी अगदी भरून आलेलं असतं किंवा कधी काहीच बोलायचं नसतं... कधी अगदी थकून-भागून शिणून गेलेलो असतो...कंटाळलेलो  असतो सगळ्याला... तेव्हा तुझे शब्द येतात...
काही माझ्या शब्दांना झेलून घेतात... काही कुशीत घेऊन माझ्याशी काही-साही बोलत बसतात.. काही शब्द माझ्या हातांना घट्ट पकडून असतात...  तर काही शब्द केसांतून हळुवार हात फिरवत मला शांत करतात...
तेव्हा तुझे शब्द तुझा स्पर्श बनलेले असतात...

पण ....
पण आता एकदम चुप्प बस जरा... नकोयत शब्द...
जरा तुझ्या स्पर्शांनाही बोलुदेत कि....

2 comments:

Amit F. said...

Sundar !!

इनिगोय said...

अायुष्य इतकं तरल का राहत नाही!