Pages

Saturday, March 5, 2011

गोष्ट


आजोबा प्रत्यक्षात भेटण्यापेक्षा लोकांच्या त्यांच्याबद्दलच्या आठवणींमधून जास्ती भेटत राहिले.. राहतात अजूनही ..

खूप रुबाबदार व्यक्तिमत्व होतं त्यांचं.. भरपूर गड किल्ले पालथे घातलेले.. जितके भाषेवर प्रभुत्व तितकाच इतिहास हि पक्का ... किल्ल्यांवरच्या चढाईच्या त्यांच्या गोष्टी असे काही रंगवून सांगायचे कि बस... त्यात त्यांच्या भुतांच्या गोष्टी ऐकून तरी ओलीच व्हायची रात्री.. लहान होतो तेव्हा बराच....तेव्हा त्या गोष्टी अर्थाच्यादृष्टीने वेगळ्या भासलेल्या...आता आठवल्या तर संपूर्णपणे नवीनच अर्थ लागतो त्यांचा..

तेव्हा..
तर आजोबा आणि त्यांचे २ विद्यार्थी कोणता तरी अवघड गड उतरून येत होते.. संध्याकाळ झालेली...वाट बहुदा चुकलेली. तरीपण गाव काही सापडेना...रात्र होत आली होती... दूरवर एक दिवा दिसला त्यांना..
दिव्याचा माग काढत पोचले ते तिथवर.. एका झोपडी मध्ये तो मिणमिणता दिवा लागला होता.. आत गेले तर एक बाई घरकाम करत होती.. आजोबांनी सांगितलं...कि "थकून आलोय, रस्ता चुकलोय, खूप भूक लागलीये, काहीतरी खायला मिळालं तर बरं होईल"...ती  बाई जेवण करून द्यायला तयार झाली.. हे सगळे लोक बाहेर अंगणात गप्पा मारत बसलेले.. पाणी आणायला म्हणून आजोबा आत झोपडीत गेले..
तर ती बाई भाकऱ्या करत होती.. आणि चुलीमध्ये लाकडाऐवजी स्वतःचे पाय सरपण म्हणून घालून बसली होती...
आजोबा तसेच गुपचूप बाहेर आले आणि सगळे लगेच तिथून पळून आले..
खूप भीती वाटलेली तेव्हा हि गोष्ट ऐकून, आताही trek करताना हमखास हि गोष्ट आठवते. लाकडा ऐवजी स्वतःचे पाय जाळणारी ती बाई..

आता...
मग आता हि गोष्ट वेगळ्या तर्हेने appeal होते....
अशी कि.. ती बाई आपले पाय सरपण म्हणून वापरून घरासाठी भाकऱ्या करत होती.. आणि बाहेर तिचा नवरा सरपणासाठी कुऱ्हाडीने स्वतःच्या पायावरच घाव घालत होता.. स्वतःच्या पायाचीच लाकडं करून तो घरासाठी सरपण गोळा करत होता..

त्या दोघांची भीती नाही वाटत मला .. उलट ती हसत, अगदी गोल भाकरी यावी यासाठी अजूनच जास्ती एकाग्रतेने भाकरी करताना मला दिसते..आणि तो पायाचे तुकडे गोळा करून, त्याची मोळी चुलीच्या कडेला सरकावून बायको आणि स्वतःला ताट वाढून घेत असताना दिसतो..

त्यांच्यात मला संसारासाठी काहीही करणारे, प्रसंगी स्वतःला जाळून-तोडून-विसरून "जगणारं" "भूत जोडपं" दिसतं.. आणि ते असेच एकत्र  जगतील याची खात्री वाटते..

No comments: