इतकं अति झालंय हे आयटी-बीटीचं खूळ कि वळीव सुद्धा आजकाल Smells Like Software Engineer. आठवडाभर राबराब राबून सगळी भडास weekend ला किंवा friday संपत आला कि काढतो आम्ही. तसंच होतंय हल्ली. आठवडाभर खूप उकडतं आणि मग friday eve ला वगैरे हा वळीव/पाउस फॉर्मात येतो. गेले ४ आठवडे असंच चाललंय. अगदी mainstream पावसासारखा आणि आयटीवाल्यासारखा वागतोय हा. तसा कलंदरच होता तो...
---
३ friday असेच गेले. late 20's मधल्या कामाच्या जबाबदाऱ्या आणि 'वयोमानपरत्वे लग्न' जमल्यामुळे लग्नातले ओसरलेले अप्रूप यामुळे courtship मध्ये असूनही पाऊस (आणि तो पण भन्नाट, वळीवाचा) एकत्र बघावा असे दोघांनाही वाटले नाही कधी.
पण मग चौथ्या शुक्रवारी वातावरण मस्त झालं होतं. gallery मध्ये आला तो आणि कामानिमित्त तिला फोन केला. तितक्यात जोरात वारा सुरु झाला. जास्ती काही ऐकू येईना.
त्याच्या तोंडून वेळ मारायची म्हणून सहज निघून गेलं "तुमच्याकडे आहे पाऊस ?......जर तुला काही urgent काम नसेल तर भेटायचं का आज ?" ...
arrange marriage मध्ये असे अवघडलेले क्षणच जास्ती !!
पाऊस गडगडाट करेल, विजा चमकावेल, घाबरून सोडेल. पण शेवटी दुसऱ्याच्या कुशीत/मिठीत शिरण्याचा निर्णय हा आपलाच असतो. सांडायचंच नाही ठरवलं तर असंच ओथंबून राहता येतं.
किती वेळ नुसता पाउस ऐकणार म्हणून त्याने नेहमीचा typical प्रश्न टाकला. "तुला मातीचा वास आवडतो ?" ..तो
"हो...असाच ...आणि या वळवाचं हेच आवडतं मला..नेहमीच्या पावसाला नाही येत हा वास." .....ती
"तुला काय वाटतं मातीचा हा वास मातीसाठी काय असेल ? ..scent , perfume or deodorant ?" ....तो..आणि उत्तराची वाट न पाहता सांगायला लागला...
"पाउस मला merchant navy मधला नवरा वाटतो जमिनीचा. पूर्ण वर्षात ४च महिने बरोबर राहून वर्षभर पुरेल इतकं देणारा. किंवा वळीव म्हणजे parole वर सुटून आलेला, भेटायला आसुसलेला, शिक्षा भोगणारा नवरा... आणि मग जेव्हा तो भेटायला येतो तेव्हा हि माती, हि जमीन आपला अगदी ठेवणीतला scent लावते. किंवा 'जब्भी खयालों में तू आये मेरे बदन से खशबू आये' म्हणणारी रेखाच वाटते. मातीचा हा गंध म्हणजे ठेवणीतला, उंची Scent च !!!!" ..........तो
कंसामध्ये तो --( त्याला खूप आठवण आली मेघनाची.. मोरापेक्षाही जास्ती पाउसवेडी पोर ती आणि मोरपिसाहून हळवी. तिला सगळा पाऊस आवडायचा -- पहिला पाऊस , दुसरा पाऊस , तिसरा,... सातवा, त्रेपन्नावा...... अगदी शेवटचा पाऊसहि भरभरून जगला तिने. खूप दिवसांनी एकत्र पाऊस झेलत होतो त्यावेळीची हि तिचीच वाक्यं ! हळव्या पोरीच्या या हळव्या कल्पना आणि उपमा पण. "चुकलो मी, नाही सोडून जाणार परत " असा म्हणत त्याने तिला घट्ट मिठीत घेतलेला. पाण्याने भिजलेल्या तिच्या दाट पापण्या काजळासारख्या भासत होत्या, त्याने हळूच भिजल्या पापणीवरल्या पागोळ्या ओठांनी टिपून घेतल्या..'i luv u like this rain, meghana' ...'...like rain का ?' ... 'असंच..निघून गेलं तोंडातून' )
ती... "hmmm...." तिने दीर्घ श्वास घेतला आणि एकदा परत मातीचा तो गंध भात्यात भरून घेतला...
ती..."पण मला काय वाटतं सांगू ? deodorant आहे तो मातीचा. उन्हाने त्रासलेली असते ती तीनेक महिने. घामेघूम, तापलेली. ना काही सावली ना गार झुळूक एखादी. सुस्त पडून असते. आणि हा पाऊस असा अचानक येतो. जोरात, काही नं सांगता, बेधडक...तिची प्रचंड तारांबळ उडते..काहीच आवरलेलं नसतं तिने. surprise visit याची. ऐनवेळी कपाटातला जो perfume हाताला येईल तो वापरते ती. deodorant च आहे हा तिचा. अशी विस्कटलेली ती माती कसाबसा deodorant मारून भेटायला पळते पावसाला. मातीचा हा गंध म्हंजे तिचा deodorant च "
कंसामध्ये ती --( तिला अचानक cigarette, घामाचा आणि घामाला लपवायला जरा जास्तीच मारलेल्या deodorant चा mixing होऊन जो पुरुषी वास येतो तो आला. यतीन आठवला तिला अचानक. आपल्या कोवळ्या भावनांना त्याच्या करड्या मिठीत कुस्कारणारा. पण तिला तेच आवडायचं..त्याचा पुरुषी अहंभाव, तो बेरकीपणा, तो मस्तवालपणा. मातीच्या वासाची deodorant शी केलेली तुलना त्याचीच. त्याचीच वाक्यं तिने टाकली. त्याच्या जाड्याभरड्या खरबरीत हातांचा स्पर्श आणि असल्या निबर भावना यांचंच तिला भारी वेड. भर पावसात हे वाक्यं बोलून त्याने तिला घट्ट मिठीत घेतलेले. हि आपली त्याच्या अंगाच्या तीव्र दर्पात मातीचा वास आणि स्वतःला विसरलेली. कोंडलेल्या श्वासामुळे तिला तिच्या मनातलं सांगता हि येईना. त्याची "luv u" म्हणायची हि पद्धत अशीच रानटी, पुरुषी ... )
तो ..."हे...हे.. good भारीये हि deo ची उपमा :D :D . तुम्ही मुली नाहीतरी जास्तीच practical असतात..." ooops आपण काहीतरी चुकीचं बोललो हे त्याला समजलं. सावरून घेण्यासाठी ...
"but we really complement each other !!! "
पाऊस चालूच होता. परत केवळ पावसाचाच आवाज येत होता...बराच वेळ...
तो ...."या क्षणी 'complement' च्या ऐवेजी मी तुला "love u" म्हणायला हवं होतं ना ?"
ती ..." जवळ येऊ जरा मी तुझ्या ??"
तरीही पाउस चालूच होता..फक्त आता दोघे एकाच पावसात भिजत होते इतकंच ........ दोघांचा पाउस आता एकच झाला होता.
----
कंसातलं कंसातच राहायला हवं का ? त्यानंतरचा प्रत्येक पाउस त्यांचा कंसामधला भूतकाळ पुसत गेला. नाहीतरी पाउस असतो कशासाठी ??
And they still lived happily ever after...............