Pages

Tuesday, April 20, 2010

For Those Beautiful Moments of Guilt !


थांब अशीच ...
अजून दोनेक श्वास ...

नको पांघरूस विस्कटलेली ती तलम रेशमी सोज्वळता परत,
नको उतरवूस तुझ्या-माझ्या श्वासांनी विणलेलं हे सोवळं ....

थांब ...
...जोवर तुझ्या हृदयाच्या टपोऱ्या ठोक्यांचा बहर ओसरत नाही तोवर,
...जोवर तुझ्या या उष्ण श्वासांचे शरीरभर पसरलेले शहारे, धुमारे निवत नाहीत तोवर....

तोवर असंच असू दे माझ्या देहानं तुझं संगमरवरी चांदणं पांघरलेलं...
आणि माझा अंधार पसरलेला तुझ्या देहावर.

तुझ्या नखांनी छेडलेल्या तारांचे झंकार घुमत राहूदे माझ्या व्रणांच्या डोहात..
अन राहू देत निसटलेले माझे स्वर रेंगाळत
तुझ्या ओठांवरल्या अस्पष्टश्या तिळाजवळ.

..समेनंतरही अजून काही क्षण तरंगत राहू असेच सोबत ...
गंधाहून हल्के अन
असेच रिते
...
राहूदे देहांना असेच आदिम ..
असेच
तप्त .....असेच तृप्त....

थांब अजून ....
निदान श्वास तुटेपर्यंत तरी ??

Tuesday, April 6, 2010

Once upon a time on 5th April (Part 2)!

"२७ ? नाहीरे २५ किंवा २६ असेल !! २७ खूपच होतात ..म्हंजे almost half a way आलो पण ?? परत मोज... तू zero-based indexing केली असशील ...१ minute... मीच मोजतो... ८४ ते २०११... नाही.. नाही २०१० ...
त्या मानाने काहीच येत नाही कि रे मला जगण्यातलं? "

नाहीतरी आपण जगतो म्हणजे नेमकं काय करतो ? न दमता श्वास घेतो, पथ्थ्य न पाळता जेवतो, वेळच्यावेळी शरीरधर्म करतो, औषधांचे डोस मोजत नाही आपण... किंवा हे अगदी शारीरिक वाटत असेल तर मग ...... आपण कमावतो पाच-पन्नास रुपये, उडवतो शे-दोनशे, २-५ डझन लोकांशी चांगलं वागतो, एखाद्या डझन लोकांशी एकदम वाईट हि वागतो. काही नियम पाळतो काही तोडतो. थोडं लढतो थोडं हरतो...आणि असंच अबर-चबर बरचसं करतो ...
अरेहो भरपूर चिंता करतो, थोडी स्वप्नं पण बघतो... झेपेलशी !!! मग यात कसलं आलंय जगण्याच कौतुक आणि वाढदिवसाचं celebration, etc !


त्यांच्यापैकी कदाचित कोणीही सव्वीशी गाठणार नाही. २० वयापर्यंत जगले तरी खूप झालं असा आजार जन्मापासून ! खरतर त्यांना माझ्या वाढदिवसाचं जेवण किंवा पार्टी देणे हे खूपच क्रूर वाटलं मला. असं वाटलं कि मी त्यांना हिनावतोय "बघा मी तरी २६ वर्षाचा... तुम्ही कधीच माझी बरोबरी करू शकणार नाही". औषधाच्या एकेका डोस बरोबर त्यांना एक-एक आठवडा वाढून मिळतो जगायला... जोवर ते डोस चालुयेत किंवा त्यांचा असर होतोय तोवरच... EMI (Equated Monthly Installments) वर जगणं त्यांचं आणि मला हे श्रीमंत बापाच्या माजलेल्या पोरासारखं जन्मजात मिळालेलं आयुष्य.. त्यामुळे त्यांना एक दिवस birthday साठी lunch/diner देणे पण मला प्रशस्त वाटत नव्हते... तरीही गेलो..आधी एक दोन वेळा गेलेलो तेव्हा सुन्न होऊन आलो होतो. पण तरीही गेलो ...
तिकडे गेल्यावर कळलं कि अजून १ scheme आहे. आपण "medical sponsorship" घेऊ शकतो. खूप चांगला वाटलं option हा.
एका पोराचा ३ महिन्यांचा औषधाचा खर्च !! लगेच पावती फाडली , त्यांना कारणही नाही सांगितले.
आपल्या आयुष्यात काही बदल घडवू शकत नाही तर atleast दुसऱ्या कोणाच्यातरी ... माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने कदाचित कोणा पोराचे आयुष्य एखाद महिन्याने वाढेलही.


एखाद  महिना जास्ती म्हणजे अजून काही सूर्योदय सूर्यास्त ..अजून थोडे चिवचिवाट, अजून थोड्या एकट्या संध्याकाळी... 
पावसाळा असेल तर अजून १५-२० पाऊस जास्ती पाहिलं तो, कदाचित एखाद इंद्र-धनुष्य पण. अजून थोडे दिवस कानटोपीची (एकमेव) उब त्याला मिळत राहील ...
एखाद  महिना जास्ती म्हणजे कदाचित द्वितीयेच्या चंद्राच्या अजून २ नाजूक कोर पाहू शकेल तो किंवा अजून थोडं आभाळ भर चांदणंपण .
एखाद  महिना जास्ती म्हणजे कदाचित वयात हि येईल तो किंवा आला असेल तर मतदान पण करू शकेल तो.... 
एखाद  महिना जास्ती म्हणजे pokemon चे ३० भाग जास्ती. किंवा अजून २-३ पुस्तक वाचून होतील तोवर त्याचे, अजून ४-५ चित्रं पण काढेल कदाचित... 
एखाद  महिना जास्ती म्हणजे तीसेक प्रार्थना जास्ती, १५-२० भांडणं -मारामाऱ्या जास्ती, गळ्यात गळे घालून अजून थोडे दिवस हिंडता येईल त्याला त्याच्या मित्रांबरोबर....
एखाद  महिना जास्ती म्हणजे कॅलेंडरचे अजून एक नवीन कोरं पान तो पाहू शकेल, अजून एकदा 'पाच' तारीख हि पाहू शकेल तो कदाचित ...

"मानव्य" नावाची चांगली संस्था आहे. कधीच मोठे होऊ न शकणार्या लहान-लहान मुलांचं गोकुळ आहे ते !!
http://www.manavya.org/get-involved.html