Pages

Sunday, October 18, 2009

Same Pinch

'रात पश्मीने की' च्या 'मेरा ख्याल है' मधे गुलजार म्हणतात....
"...उम्मीद भी है, घबराहट भी की अ़ब लोग क्या कहेंगे, और इससे बड़ा डर यह है कहीं ऐसा न हो की लोग कुछ भी ना कहें !! "
जितका प्रभाव गुलजारचा आहे तितकाच मृणालचा पण :D

No Parking !

मग दिवसभर ती प्राजक्ताची चुकार फुलं तुझी आठवण करून द्यायचे...

रात्रि मुद्दामच तुमच्या कुंपणालगत माझी गाड़ी पार्क करायचो मी. रस्त्यावर डोकावणार्या प्राजक्ताच्या बरोबर खाली... सकाळी मग प्राजक्ताच्या नाजुक, ओलसर फुलांचा सडा पडायचा रस्ताभर. माझ्या गाडीवर पण त्यांचा नाजुकसा थर जमायचा.
तुझ्या वाढदिवसाला लावलेला तो प्राजक्त , रोज त्याला पाणी घालताना पुसटशी दिसणारी तू आणी त्या फुलांचा माझ्या गाडीवर होणारा ओलसर स्पर्श !! इतकाच काय तो संबंध आपला !
अणि दिवसा-आड़ न चुकता तुझे बाबा मला शिव्या घालत माझ्या गाड़ीतली हवा सोडून द्यायचे... मग उशीर झालेला असुनही मी गाड़ी पुढच्या चौकात ढकलत न्यायचो. गाड़ी न पुसता, फुलं तशीच ठेउन, प्राजक्ताच्या मंद गंधात गाड़ी रेटत रहायचो.

आणि मग कधी गाडीला किल्ली लावताना एखादे फुल शेजारी हसत असायचे...
कधी वेगात निघालो तर स्पिडोमीटरच्या बाजूला कोपर्यात एखादे घाबरून बसलेले असायचे...
कधी एखादे फुल किक मारताना दुखावालेले असायचे...
निवांत कधीतरी मागच्या सिट वर पडून रहायची काही फुलं...
अणि कधितर मागचं सिट काढलं की त्याखाली पण "Surprise !!" म्हणत हसणारी काही फुलं सापडायची.... जिथवर पोहोचू शकणार नाहीत असं वाटलेलं तेथेही गुपचुप पोहोचलेली असायची.....
फुटरेस्ट, साड़ी-गार्ड मधे कुठेकुठे वेलबुट्टी सारखी सजुन बसायची काही फुलं.....

मग दिवसभर ती चुकार फुलं तुझी आठवण करून द्यायचे ...
तुमच्या 'नो पार्किंग' मधे गाड़ी पार्क केल्याचे हे फायदे...

नाहीतरी मनाला तरी कुठं कळतं स्वताला कुठं 'पार्क' करावं ते !!!

Friday, October 16, 2009

...अतीच! हे म्हणजे काहीही ..

कधी कधी खुप बोलायची उबळ येते. अगदी किती बोलू - किती नको असं होतं अशावेळी. मग लिहितो काहीतरी ...........

असं वाटतं की तुझ्याशी नुस्तं बोलत रहावं. जगातली जितकी मूळाक्षरे आहेत त्या सगळ्यांची Permutations & Combinations होउन जितके शब्दं तयार होतील ते सगळे सांगावेत तुला. Dictionary मधे असणारे - नसणारे, अर्थपूर्ण-अर्थहीन, लहान -मोठे, साधे-जोडाक्षर, veg-nonveg -अगदी सगळे शब्दं तुझ्याशी बोललेलो हवं मी. असा एकही शब्दं नको की जो तू माझ्याकडून ऐकलेला नाही. आणी ते सगळे शब्दं माळुन तयार होणारी सगळी वाक्यं पण.... निरर्थक - प्रश्नार्थक - उद्ग़ारवाचक- अर्वाच्य अगदी सगळी सगळी वाक्यं तुझ्याशी बोलाविशी वाटतात. तोंडदुखेपर्यंत, कान फाटेपर्यंत किंवा bore होउन चक्कर येइपर्यंत.
मला पहायचय तुला माझे शब्दं झेलताना. रंगीबेरंगी बुरखे घालून आलेले शब्दं, latest fashion करून आलेले शब्दं, कधीकधी उगीचच आलेल्या या सगळ्या शब्दं-जंजाळात न अडकता त्यात 'मला' शोधणारी 'तू' मला बघायचिये....

माझ्या सगळ्याच क्षणांना तू साक्षीदार हवीयेस. जेवताना मिठाचा खडा लागला तरी तू समोर जेवत असावीस माझ्या, गाडीची किक तुटेल त्यावेळी कळवळताना तू मागे बसलेली हवियेस. तुझ्या केसांच्या गुन्तावळीत पांढरा केस सापडला तर तूच हवियेस मिश्किल हसताना. समोर. घाईघाईने ऑफिससाठी आवरताना तू समोर आलीस की तुझ्या गंधाने भारलेले, तुझ्याच अवतीभवती घुटमळनारे-रेंगाळलेले क्षण हवेत मला. माझ्या अंगावर राहिलेला तुझा चुकार केस ऑफिसमधे सापडला की सरलेली रात्र आठवताना मला तू हवियेस समोर - लाजलेली . पहिल्या पावसाचा पहिला शहारा अंगभर फुलायच्या आधीच तू शहारून मला चिकटलेली बघायचिये मला. रात्रि दचकून उठलो की शेजारी हलकेसे हसू ओठांवर ठेउन शांत झोपलेली तू हवीये. एकुनाच्या एक क्षण Share करायचेत मला तुझ्याशी. अगदी निमिषाची पण वाटावाटी...


सगळे स्पर्श मला तू असताना अनुभवायचे आहेत. पोटातल्या बाळाचे मंद ठोके, त्याच्या नाजुक हालचाली ऐकताना तू हवियेस. त्याच्या जावळाचा स्पर्श, त्याच्या लहानग्या बोटांन्ना हात लावताना तू हवियेस सुजलेल्या डोळ्यांनी माझ्याकडे कृतार्थपणे पहाताना. दात येतानाच्या लाळेचा स्पर्श, त्याचा दुधाळ वास मला अनुभवायचाय तुझ्या बरोबर. कपाळावरच्या पहिल्या काही आठ्या, पहिल्या काही सुरकुत्या उगवताना तू हवियेस बरोबर माझ्या.खोकल्याची मोठी उबळ आली की पाठीवर तुझाच हात हवाय मला.सगळे गंध, सगळे स्पर्श अनुभवत असताना तू हवियेस मला बरोबर.

घडून गेलेले पण क्षण तू माझे बोट धरून जगुन आलेली असावीस किंवा घडुशी वाटणारी सगळी स्वप्नं बरोबरच बघितलेली आपण. तू येण्या आधीच्या सगळ्या आठवणी पण तुला ओळखत असाव्यात. भीमाशंकरच्या जंगलातल्या शेवाळलेल्या कातळांपासुन तर अंग बधिर करणार्या प्रवासाच्या आठवणी, दहावी 'अ'च्या मागुन तिसर्या -खिड़कीजवळच्या, गुळगुळीत बेंच पासून तर ४ पांघरुणं घेउन काढलेल्या आजारपणाच्या आठवणी. माझ्या सगळ्याच आठवणी तुझ्या ओळखिच्या व्हाव्यात.
'माझं' सगळच आयुष्य 'आपण' म्हणुन जगायचय मला ..........

--------------
...अतीच.... जास्तीच.... उगीचच... फ़ुकटच...लैच बिल झालं ......हे म्हणजे काहीही झालं आता ...
एक वेळ एखादं 'अनाहत' बेट मागायचं किंवा मस्त Audi/BMW कार मागायची, निळ्याशार बीचला लागुन बंगला मागायचा एकवेळ. अगदीच हे नाही तर गेला बाजार MacBook/iphone, भारी Bike, Plasma टीवी तरी...
हे काय शब्दं, गंध, स्पर्शं यांचे डोहाळे ?