लायब्ररीमधून आपल्या मनाचं पुस्तक घ्यायचो, अगदी आपल्या आवडीचं. जे ठरलेले लेखक आहेत त्यांचीच किंवा नेहमीच्या genre ची पुस्तक घ्यायचो. किंवा कोणीही न वाचलेली-अगदी करकरीत कोरी पुस्तकं पण कधीकधी. वेगळ्या वाटेवर लिहिणाऱ्या कोणाचीही पुस्तकं घ्यायचो मी .
कधीकधी आपल्या वेगळ्या निवडीचं उगाच कौतुक वाटायचं. 'सहा फूट माणसांच्या गर्दीत सव्वासह फूट असणे' इतकाच काय तो फरक, पण तरीही चांगलं वाटायचं... पण तरीही दरवेळी 'आपण सोडून हि पुस्तकं कोण वाचत असेल?' असा प्रश्न पडायचाच. मग पुस्तकाच्या शेवटी जायचो. शेवटच्या पानावर लायब्ररीवाल्या बाईने शिक्के मारलेले असायचे. वर्षानुवर्षाचे date-stamps सापडायचे. बरीच पुस्तकं महिने-महिने पडून राहिलीत अशा तारखांच्या नोंदी सापडायच्या.
जरावेळ थांबून सगळं पुस्तक कितेकदा तरी चाळलं. अजून कितीतरी खुणा सापडल्या- माझ्या आवडत्या बऱ्याचश्या वाक्यांच्या खाली टिंबाच्या पुसटश्या खुणा होत्या, दुमडलेल्या पानांवरचे उतारे पण बहुतेक माझ्याच आवडीचे, पुस्तकातल्या नेमक्या माझ्याच आवडीच्या कथांची पानं खिळखिळी झालेली वाटली - परतपरत खूप वेळा वाचून त्या कथेच्या आजूबाजूच्या पानांच्या घड्या सैल झाल्यासारख्या वाटत होत्या....
(..आणि हो, हे आपलं उगाचच.. "तिच्या", "तिने खुण केलेली असतेच तिथे".... जणू काही अशा खुणा करणारी व्यक्ती खरच "स्त्री"च आहे. खरतर ती स्त्री आहे कि पुरुष आहे हे माहिती नाही. पण ती व्यक्ती एक पुरुष आहे हे imagine करण्यापेक्षा ती एक स्त्री/मुलगी आहे हे imagine करणं खूप चांगलं वाटतंय मला. तसाही ५०% chance आहेच कि हे खरं होण्याचा. शिवाय ती व्यक्ती कोण आहे हे मी नाहीच शोधणारे. तसं जास्ती अवघड नाहीये शोधणं, खूप मोठी नाहीचे लायब्ररी आमची. पण तरी नकोच... ती अशीच अज्ञात राहिलेली हवीये मला.. खरच स्वप्नवत आहे हे मग ते तसंच स्वप्नच राहिलेलं आवडेल मला.. पण तरीही राहून राहून आश्चर्य वाटतच राहातं, आणि ते नाही रोखू शकत मी.) असो..
तिनेच वाचलेली पुस्तकं मी वाचतोय किंवा तीच तिचं पुस्तक वाचून झालं कि मला देतीये वाचायला, तिला आवडलेल्या गोष्टी सांगतीये मला..असं वाटत राहातं..
असो...नाहीच शोधते मी तिला, पण मग पुस्तक घेतलं हातात कि तिची आठवण होतेच....डोळे शब्द वाचण्याऐवजी तिच्या पाऊलखुणाच शोधात राहतात.
रात्र खूप झालीये आता.. पण हि नवी कोरी आवृत्ती मिळालीये 'पिंगळावेळ'ची.. संपत आलीये वाचून ...'यात्रिक' चाललंय..आरशात बघतोय असा भास होत असतो नेहमी हि गोष्ट वाचताना.. किंवा खूप थकल्याने आपणच डॉन आहोत असं वाटायला लागतं मग..पण मग फरक फक्त इतकाच कि इथे डॉन पण मीच आणि Sancho पण मीच..
झोपतो आता.. नाही जागवते आता.. या गोळ्या घेऊन जाऊ झोपी..
---------------------------------------------------------
किती शांत झोपलाय, सैरभैर असतो नाहीतर नुसता. गोळ्यांचा उपयोग होतोय तर..
माझ्या राजा, तुझा छातीवरचा tattoo तुझ्यापेक्षा जास्तीवेळा मी बघितलाय.
त्या clef च्या शेपटीचा लफ्फेदारपणा तुझ्या स्वाक्षरीत तर आहेच पण तुझ्या वागण्यात पण तसाच आहे हे माझ्या पेक्षा जास्ती कोणाला माहिती असेल?
जितक्या तीव्रतेने/intensity ने तू लिहितोस/बोलतोस ते उठतंच कि मागच्या ४-५ पानांवर सुद्धा. तू केलेल्या वारांचे व्रण आहेतच कि माझ्याकडे,दिसतात त्याच्यापेक्षा जास्ती खोलवर उमटले आहेत ते.
केवळ सात पावलं नाही टाकलीयेत बरोबर आपण, हि वाट तुला तुझ्या एकट्याची वाटत असली तरी माझी मूक सोबत असेलच रे.
तू एकटा नाहीयेस हे तुझ्याच प्रतिमांच्या खेळातून तुला आम्ही पटवून देतोय. इतकंच...
चल, तुझ्या या नवीन कोऱ्या पुस्तकावर खुणा करत बसते आता जरा वेळ. तूच सांगितलेलं असतं सगळं मला, मी फक्त वाक्यांखाली टिंब करते किंवा पानं दुमडून ठेवते...
शेवटी औषधाबरोबर हेही करणं तितकंच महत्वाचं आहे.
So i will help you read those books....
.....and we will put the lonesome back on the shelf!