किती दिवस आपण त्याच त्या घासून गुळगुळीत झालेल्या, खाऊन खाऊन चोथा झालेल्या, हजारो लोकांनी एक करोड वेळा वापरलेल्या उपमा वापरणार आहोत ?
तीच ज्योत, तीच आग आणि तेच आगीकडे झेपावणारे पतंग ... बाकी कुठेच दिसत नाही का असा पतंगासारखा वेडेपणा ?
ढगात असताना वाफेचे पाणी असतात ते नुसते आणि जमिनीवर पडले कि एक तर मुरून जातात किंवा ओहोळात मिसळून जातात...
पावसाच्या थेंबांना त्यांचं असं स्वतंत्र अस्तित्व केवळ पडतानाच असतं.....फक्त आभाळातून खाली पडेपर्यंत...बास...
जे तसे बेभान होऊन जमिनीवर पडतात आणि स्वतःला संपवून टाकतात ते खूप lucky , त्यांना त्यांची मंझील मिळालेली असते ...
त्या पागोळ्यांकडे एकदा नीट पहा... त्या थेंबाच्या जमिनीकडच्या सर्वात खालच्या टोकाकडे पहा.. मातीत मुरायची, रुजायची जीवघेणी इच्छा ठासून भरलेली असते त्यात.
पागोळीचा सगळा आत्मा त्या एका टोकाला साठून राहिलेला असतो. टच्च भरलेलं ते टोक जमिनिकडे अनिवार ओढीने बघत असतं.
"Creation of Adam" मध्ये Adam आणि देवाची बोटं एकमेकांना चिकटलेली नाहीयेत, त्यामुळे ती बोटं touch व्हावीत याची आतुरता किंवा ओढ जी त्या चित्रात जाणवते तीच मला इथे दिसते. पागोळी आणि जमीन यांच्यामध्ये !!
कधी एकदा फांदीवरून तुटते आणि जमिनीवर पडते असं झालेलं असतं त्या पागोळीला..
...ती जमिनीत मुरून, स्वतःचा अस्तित्व संपवूनच 'पूर्ण' होणार असते.... असं स्वतःचं अस्तित्व संपवून टाकणं हेच तिचं जीवन असतं खरतर...
त्यातच तिला मजा असते ..
....आपण नुसते बघत बसतो पागोळ्यांकडे पण त्यांच्यातली ओढ कळत नाही आपल्याला आणि आपण मुर्खासारखे गुणगुणत राहतो ..."जलने में क्या मजा है .... "