Pages

Tuesday, December 28, 2010

तहानलाडू - भूकलाडू


लहानपणी कितीदातरी ऐकलेले हे शब्द... अजूनही लहान मुलांच्या गोष्टी वाचतो तेव्हा अडखळतो या शब्दांना....
काय असतात खरच हे तहानलाडू-भूकलाडू?
कसे दिसतात? कसे लागतात? चव कशी असते? आवडतील का आपल्याला? नाही आवडले तर कशाबरोबर  तोंडीला लावावेत? किती दिवस टिकतात? भागते का तहान? भागते का भूक? मावतात त्या पुरचुंडीत? किती लाडु बरोबर घेतात लोकं generally? घरीच बनतात कि विकत मिळतात? कशाचे असतात actually? काय भाव असतो? एका वेळी किती खावेत? जास्ती खाल्ले तर बाधतात का? तोंडाला वास तर नाही ना येत खाल्ल्यावर?
काहीच माहिती नव्हतं त्यांच्याबद्दल..

गोष्टीमधले लोकं/प्रवासी नेहमी खूप दिवस चालतात. कोणाला जवळ नसतंच जायचं-सगळेच लांबच्या ठिकाणाचे प्रवासी. किंवा जवळच्या प्रवासाची कसली आलीये गोष्ट?
मग खूप थकून-माकून ते बसतात एखाद्या जीर्ण झाडाच्या पारापाशी. उन्हाने तापलेले, धुळीने माखलेले, भुकेले, चालून पायाचे तुकडे पडलेले ते बिचारे प्रवासी.
गाठीला बांधलेली आपली पुरचुंडी उघडतात ते आणि त्यात हे तहानलाडू-भूकलाडू असतात त्यांच्या साथीला...
मग प्रवासी ते लाडु खातात. प्रवासाचा शीणवटा जातो सगळा त्यांच्यामुळे. आणि परत नव्यासारखे होतात ते.
नव्या उत्साहाने परत प्रवास चालू राहतो होतो त्यांचा....
.... अशी, इतकीच काय ती त्यांची ओळख होती मला..  

आपलेच जुने शब्द जेव्हा आपलेच "तहानलाडू-भूकलाडू" होतात तेव्हा असंच काहीसं वाटतं..

(लिहणं गरजेचं आहे. कदाचित हा लाडु पुढे जाऊन कोणत्या तरी प्रवासात कामाला येईल...)

Sunday, December 12, 2010

दोघं

भिजल्यामुळे अंगाला शुभ्र सुती कापड जागोजागी चिकटलेल्या स्त्रीचं अर्धनग्न painting जितकं आवडलं तितकंच लांबसडक बोटांनी काही हस्तमुद्रा करत असलेल्या आणि अर्धोन्मीलित डोळ्यांनी शांतपणे  हसणाऱ्या बुद्धाचं painting हि आवडलं.

मी त्या दोन paintings मधून बाजूला झाल्यामुळे त्या दोन paintings ने एकमेकांकडे बघितलं असतं तर ?
तर..
त्या स्त्रीने दुसऱ्या कपड्याने झाकपाक करायची धडपड केली असती कि बुद्धाच्या शांत चेहऱ्याकडे बघून ती तेही विसरून गेली असती?
निथळत्या शरीराकडे पाहून बुद्धाच्या पापण्या जराश्या का होईना किलकिलल्या असत्या का?

Tuesday, November 30, 2010

...काखा वर !

"Safety First!",  "Follow Traffic Rules", "Wear Helmet"  चे पोस्टर्स घेऊन उभे होते शाळेतली पोरं त्या सिग्नलला... 
कपड्यावरून तरी ती मुकबधीर शाळेतली मुलं वाटत होती.
उन्हात उभी होती, भरपूर pollution असलेल्या चौकात, टोपी-मास्क काहीही न घालता...
कितीवेळ उभी राहणार आहेत अशी? माहिती नाही...
काही खाल्लं असेल सकाळपासून? माहिती नाही...
लोकांना traffic rules समजावून सांगावेत असं त्यांना खरच वाटत असेल? वाटत नाही...  
ते असे पोस्टर्स घेऊन उभे राहिल्यामुळे खरच काही फरक पडेल? हेही वाटत नाही...
 
मुकबधीर मुलं म्हणजे केवळ (भावनाशून्य) खांब आहेत असं वाटत असतं  का लोकांना? काहीही अडकवा त्यांच्या गळ्यात - ते काही बोलणार नाहीत, काही विरोध करणार नाहीत...
....शिवाय अशा मुलांकडून हि कामं करून घेतली कि लोकांना जास्ती Appeal होतात...
जसे अगदीच सुमार greetings, मेणबत्त्या, उदबत्त्या त्यांच्या नावावर खपवल्या कि जास्ती खपतात तसं...
किंवा वर्षभरात असे १२-१४ campagnes केले/दाखवले कि donations पण जास्ती मिळतात असा सुप्त हेतू असतो या लोकांचा?                 
 
किती दिवस "Special Children" या गोंडस नावाखाली त्यांच्या disabilities cash करणार आहोत आपण?
"Slumdog Millionair" मधली लहान मुलांना अपंग करून त्यांच्याकडून भिक मागवून घेणारी टोळी आठवली. शिसारी आली... त्यांच्याशी compare करू नये हे मान्य आहे, पण जर तशी आठवण झाली म्हणजे काहीतरी साम्य असेलच ना?
 
जाऊ देत..इथेच थांबवतो. तसंही मला खूप logical, सामाजिक, वैचारिक  इत्यादी  नाहीच लिहिता येत किंवा विचार पण नाही करता येत त्याबद्दल..
(may be हा माझा escape असेल, पण तसंही कोण जाब विचारणारं आहे मला इथे? त्यामुळे चालायचंच)
 

Monday, November 8, 2010

Old Monk

३०...
जहाजाला त्याचा anchor सावरणार, सांभाळणार, एकाच जागी ठेवणार ...
Anchor समुद्राच्या एखाद्या कपारीत, कोनाड्यात अडकणार... anchor ला ती कपार धरून ठेवणार...
२-३ मोठे दगड, कातळ मिळून ती कपार किंवा कोनाडा तयार झालेला असणार...
त्या दगडांना मग जमिनीने घट्ट धरून ठेवलेले असणार...
जमीनपण काय तर पृथ्वीचाच भाग... पृथ्वीनेच तिच्या गुरुत्वाकर्षनाने जमिनीला धरून ठेवलेले असणार....
पृथ्वीला सूर्याने त्याच्या गुरुत्वाकर्षनाने जखडून ठेवलेले असणार...
सूर्यहि अंधारात "कशाला" तरी टेकून उभा असणार...
"कशाला" हि गोष्ट पण कोणाच्या तरी आधाराने तरलेली, तगलेली, बाकीच्यांना आधार देत उभी असलेली..

जहाजाने आपण भरकटलो म्हणून "कशाला" हि जबाबदार धरू नये....उठसूट कशाला "त्याला" दोष द्यायचा ?

६०...
साला....नियती इतकी बेक्कार असते ना..

आपल्याला वाटत असतं आपण नेहमीचा रस्ता सोडून वेगळ्या रस्त्याने जातोय ते आपल्या मर्जीनेच ...
..पण असं नसतं, आपल्याला दोन रस्ते मिळणार आणि त्यातला वेगळा रस्ता आपण निवडणार हेच ठरलेलं असतं... Choice नसतोच तो, उलट उगाच आपल्याला खेळवणं असतं ते....
........तो निर्णय आपल्या मनाने घेतला म्हणून आपण  खुश असतो आणि वर कोणीतरी हसत असते.. 

घसरगुंडी वरून लोक मजा करत खाली येत असताना आपण तिच्यावरून उलटीकडून चढत असतो.. आपल्याला वाटत असतं आपण प्रवाहाविरुद्ध चाललोय...
..पण असं नसतं, आपलं destination त्या रोडच्या डाव्या बाजूलाच असतं (in India and Britain :D) म्हणून आपण तसे जात असतो. विरुद्ध दिशेने जाताना केस विस्कटणे याची नशा वाटते आपल्याला पण ते तसे होणे हेच ठरलेलं असतं..
........आपण प्रवाहाविरुद्ध पोहण्याच्या कैफ मध्ये असतो आणि वर कोणीतरी हसत असते.. 

सगळं चांगलं-सरळ चाललेलं असताना आपण मधेच थांबतो, उलटीकडे चालतो परत किंवा त्याच ठिकाणी घुटमळतो, हरवून घेतो स्वतःला.. जीवनाच्या प्रवाहाच्या वेगात किंवा नाकासमोर चालणं मान्य नसतं आपल्याला. आपलं जीवन असं boring, monotonous असणं किंवा कोणीतरी आपल्याला drive करतोय हा विचार न पटून मग आपण तो प्रवाह सोडून बाहेर पडायला जातो..
..पण असं नसतं. आपण बाहेर पडणार, भरकटणार, थोडा वेळ त्या ठिकाणी time-pass करणार हेच ठरलेलं असतं.. प्रवाहाच्या बाहेरच किंवा आडवाटेलाच काहीतरी वाढून ठेवलेलं असतं अशावेळी..
.......आपण flow बरोबर न जाता आपला वेग आणि रस्ता आपणच ठरवतोय या समाधानात असतो आणि वर परत कोणीतरी हसत असतं.. 

आपल्याला वाटत असतं आपणच ठरवलंय काय आणि कोणाला वाचायचंय ते. कधीतरी अजाणत्या वयात मग आपण GA वाचतो.... मग कधीतरी चांगल्या मूड मध्ये असतानासुद्धा अचानक हे असं आठवतं.. कुठेतरी लपून बसलेले GA, त्यांच्या भीत्या, विचार घेऊन असे पिंगा घालतात, छळतात... कधीकाळी आपणहि असा विचार करायचो हे कळून कसंतरीच वाटत असतं.... तरी पण आपण लिहितो, पटून न पटल्यासारखं कळूनही आपण आपल्याच मनाचं जगायला जातो....
..पण असं नसतं, मी GA वाचणार, कधीतरी ते भिडणार आणि कधीतरी ते छळणार हे असंच होणार असतं....GA च्या आड लपून मी माझेच विचार मांडत असतो आणि मग मी त्याच खवट आनंदात असतो आणि तेव्हाही वर परत कोणीतरी हसत असतं....

मग आता मी हे सगळं लिहिणार आणि तरीही नियतीचे अस्तित्व नाकारणार, स्वतःला पटेल तेच करणार...स्वतःच्या निर्णयांची जबाबदारी स्वतःच घेणार. आणि ते घेतले म्हणून मी माझ्याच नजरेत उतरणार किंवा उंचावणार..
पण असंच "असतं"... नियती तिच्या नियतीमध्ये लिहिल्या प्रमाणे वागणार आणि आपल्याकडे बघून हसणार....आणि आपण हि आपल्या नियतीमध्ये लिहिल्याप्रमाणे तिचं अस्तित्व नाकारणार आणि तिला नजर भिडवून उलट smile देणार....
....आता मात्र अजून खूप वर दोघांकडे कौतुकाने बघून तिसरंच कोणीतरी हसत असतं..  

९०..
पूर्वी असेलही मी असा पण आता मी नाहीये Old Monk....  लहानसं पोर होऊन झोपायचं आहे मला कुशीत...

Thursday, November 4, 2010

Design Flaw



खरतर हा खूप  मोठा 'Design Flaw' आहे हा .. 
आंघोळ  उरकून, tub मधून बाहेर पडून, समोरच्या भिंतीभर पसरलेल्या आरशात बघावं... तर बाथरूम मधल्या गरम पाण्याच्या वाफेमुळे आरसा धुरकट झालेला असतो..
काहीच दिसत नाही मग अशा आरशात, दुधी काच दिसत राहते नुसती आणि काही ठिकाणी थेंब ओघळून झालेल्या पाणवाटा ..
लाजेचा पडदा बाजूला सारून ज्यावेळी स्वतःला पूर्ण बघायचं असतं त्यावेळी असा हा  बाष्पाचा, वाफेचा  पडदा आड येतो.... 
मग हात फिरवून हा पडदा हवा तेव्हढा बाजूला सारायचा आणि न्याहाळायचं स्वतःलाच.

आदल्या रात्रीचं चेहऱ्यावर आलेलं हसू पुसू न देता शनिवारी सकाळी अंघोळ उरकली, स्वतःचे भरपूर वेळ लाड करून घेत.... 
उठलो tub मधनं, समोर बघतो तर आरशाचा कॅनवास भिंतभर पसरलेला- पांढरा , दुधी किंवा धुक्कट कॅनवास...
बाष्पाचा, वाफेचा , धुक्यासारखा तलम  कॅनवास... 
त्यावेळी मग तो "Design Flaw" न वाटता त्या कॅनवास वर काहीतरी मस्त काढावासं वाटलं..
तो कॅनवास बोलवत होता स्वतःला भरवून घायला..मलापण उतरावं असं वाटलं त्यावर... 
आरशात स्वतःलाच बघतो ना नेहमी आपण ? मग या इतक्या सुंदर कॅनवास वर पण परत स्वतःलाच बघायचं?? 
....तुझं नाव काढलं... एकदम मोठ्या अक्षरात ...भिंत भरून....पूर्ण कॅनवास भरेल इतकं मोठं...  
बोटं ब्रश झालेली होती आणि त्या कॅनवास वर त्यांचा स्पर्श लोण्यासारखा वाटत  होता... सर्र्सर्र बोटं फिरत होती काचेवर, ice-skating सारखी.... खूप छान वाटत होतं...
आणि अगदी खुश होऊन "j" वरच्या  टिंबाऐवजी लहान heart पण काढला.. ते काढताना गम्मत वाटत होती..... उगाचच doodle :)
आदल्या  रात्रीच्या  smiles ची एक कॉपी पण  ठेऊन दिली नावाच्या खाली... ते smile तुझं होतं, माझं होतं कि आपलं होतं ? काय फरक पडतो?
त्याच खुशीत आवरलं मग मी...बाहेर जायचं होतं...बरंच लांब...

हळूहळू वाफ निवत गेली...बाष्पाचा पडदा जसा आला होता तसा नाहीसा पण झाला.. धुकं जसं  अचानक  नाहीसं होऊन जातं, अगदी काहीच खाणाखुणा मागे न ठेवता...तसंच झालं..
२ मिनिटापूर्वी मी या आरश्यावर काही लिहिलं असेल यावर शंका यावी इतका तो आरसा स्वच्छ झालेला होता...एकदम clear, धुक्याचा  पडदा बाजूला सरला कि कसं एकदम स्वच्छ दिसायला लागतं तसं...
ना तिथे कॅनवासच्या काही खाणाखुणा होत्या, ना थेंबांच्या पाऊलवाटा...ना तुझ्या नावाचा उल्लेख, ना ओठभर हसणारा smiley ...
काहीच नव्हतं तिकडे...नुसता भिंतीभर पसरलेला आरसा होता तिकडे.....
काहीवेळा पूर्वी तुझं नाव मिरवणारा तो कॅनवास आता मला माझंच प्रतिबिंब दाखवत होता..

direct आठवड्याने आलो घरी.. ज्या मनस्थितीत बाहेर पडलो होतो त्याच्या अगदी उलट mood मध्ये...खूप काही काही घडलं होतं आठवड्यात.... अगदी होत्याच नव्हतं इतकं झालेलं.. भिंगरीगत फिरलो- कधी आपल्याच लोकांभोवती, कधी काहीच संबंध न आलेल्या परक्या लोकांभोवती तर कधी  स्वतःभोवतीच गरागरा.. थकलो होतो खूप, भांडलो होतो सगळ्यांशी,  स्वतःला prove करून दमलो होतो, अगदी माझ्यावर मीच प्रश्नचिन्ह काढावे इतका down झालो होतो... फायली इकडे तिकडे फिरवून-हजार लोकांकडे जाऊन शेवटी मोकळ्या हातानेच आलेलो घरी... जाताना वाटलंच  नव्हतं इतकं उलटं  होईल एका आठवड्यात...आजूबाजूचं इतकं safe समजलेलं जग असं पलटी खाईल असं वाटलं हि नव्हतं.... चूक माझीच असेल कि मीच ते खूप safe, secured, predictable असेल असं imagine केलं  होतं...
खूप दाटून आलेलं ...shower चालू  करून भरपूर रडून घेतलं.. आठवडाभर दाटलेलं सगळं बाहेर पडत होतं... ओल्यानेच बाहेर आलो...हरलेल्या स्वतःला बघायला आरशासमोर उभा राहिलो..
वाफेमुळे सगळा आरसा दुधी झाला होता...
आणि आरशाच्या त्या कॅनवास वर तुझं नाव, त्याच्यावरच्या लहानश्या heart सहित आणि आपल्या smile सहित स्पष्ट दिसायला लागलं होतं....

मग त्या धूसर आरश्यात मला मीच दिसायला लागलो... मी जसा होतो तसा..परत एकदा... जसा हवा होतो तसा... 
असं अगदी दाटून आलं कि तू तुझी आश्वासक smile घेऊन  समोर हजर असणे याला Design Flaw म्हणणार का आता ?   

Tuesday, October 26, 2010

House-Keeping

'J'ill : म्हणजे तू मला "House-Keeping" करणाऱ्या बाईशी compare करतोयस?
j'A'ck : ummm... हो
-----------------------------------------
पांघरुणाची घडी घालत नाही मी कधी, उशा अशाच कुठेतरी कोपऱ्यात बसलेल्या. पिशव्या-कपडे-टॉवेल 
असेच कुठंकुठं पडलेले.... दोन्ही खुर्च्या कपड्यांनी बरबटलेल्या..
पैसे टेबलवर, डायरी त्याच्याशेजारी मुडपून राहिलेली. वेबकॅम-चार्जर्स-केबल्स च्या जंजाळात चमचे-फोर्क-डिशेश अडकलेल्या...
कंगवे,जेल्स,क्रीम्स,डिओ पण आडवे-उभे-तिरके-उलटे-उघडे पडलेले इतस्ततः....
bag तशीच उघडी कधीची आणि त्यातून ओसंडून वाहणारे खाण्याचे पदार्थ आणि कपडे.           
kitchen-ओट्या वर पण काल-परवा-आठवड्यापूर्वी केलेल्या-आणलेल्या पदार्थांचा पसारा.... breads चे तुकडे, मीठ-मिरची-मसाला सांडलेला, sachet -अंड्याची टरफल पडलेली, भात-वरण कडक होऊन पापुद्रा जमलेला.... आठवडाभर मग ते थर साचतच जातात.
खालच्या (कधीकाळी मऊ असणाऱ्या) कार्पेटवर कशाकशाचे चिकट-खडबडीत स्पर्श लागत असतात... 
एकूणच काय तर Total mess...सगळंच अस्ताव्यस्त, सगळंच विस्कटलेलं....

मग बुधवारी Office वरून घरी आलो - दार उघडलं कि ----कि बेड मस्त आवरून ठेवलेला असायचा, पांघरुणावर एकहि घडी नाही- उश्या बेडला टेकून पहुडलेल्या.
Table छान पैकी आवरून उभा. खुर्च्या कपडे-विरहित, अगदी lap वर बसायला बोलावणाऱ्या..
bag पण कपडे, खाद्यपदार्थ मटकावून बंद-रवंथ करत बसलेली असते.... चमचे, डिशेश आपापल्या जागी शिस्तीत झोपलेले असायचे.
केबल्स चा गुंता सुटलेला आणि अगदी sorted-unplugged होऊन वेबकॅम, चार्जर निवांत कोपऱ्यात बसलेले दिसायचे.
बाथरूम मध्ये towels च्या छान गुंडाळ्या एकमेकींना सावरून बसलेल्या असायच्या, कोणाच्या निऱ्यांना मी आधी हात घालतोय याच्या प्रतीक्षेत.
Toilet-paper च्या रोलचं टोक पण सजवून ठेवलेलं...नटून-थटून flush होण्यासाठी आतुर.
सगळे cosmetics परत एकदा सुंदर दिसायला लागलेले,आवरून-सावरून रांगेत उभे.
ओटा परत सुस्नात बाईसारखा स्वच्छ, चकचकीत, आदल्या रात्रीच्या काहीच खुणा न दाखवणारा... त्यावर आता काहीच शिजवू नये असं वाटणारा पण तरीही स्वयंपाककरत सतत तिच्या जवळ  राहुशी  वाटणारा....
पाकिटाला-पैश्यांना हातही लावलेला नसतो, डायरी फक्त बंद करून ठेवलेली-bookmark हि न हलवता... 
मग मी शूज काढतो, मस्त-मऊ-मलईदार स्पर्श लागतो तळव्यांना..... मी तिसऱ्या मिनिटाला झोकून देतो बेडवर .. Bliss  .... हजार thanks देतो House-Keeping करणाऱ्या  त्या बाईला .....
१०$ टीप worth आहे का ?

बऱ्याच लोकांच्या बायका अशा असतात... नवऱ्याने केलेला सगळा पसारा आवरून ठेवतात त्या...
एकही टोचणारी घडी नसते पांघरुणावर-उशा पण अशा ठेवलेल्या कि नवऱ्याला छान झोप लागेल.
उगाच काही सल-खुसपट काढून रवंथ करत नाही बसत त्या. नवऱ्याची bag बंद करून ठेवलेली आणि स्वतःची पण. गुंता सुटलेला असेल-नसेल पण दोघांच्या केबल्स वेगळ्या-वेगळ्या, एकमेकांमध्ये न मिसळलेल्या.
नवऱ्याच्या कपड्याकडे-खाण्याकडे-स्वच्छतेकडे खूप लक्ष असतं त्यांचं. कणा मोडत आलेला असला नवऱ्याचा तरी शर्टला कडक इस्त्री करून देणार. नवऱ्याला काही गोष्टी पचत-आवडत नसतील  तरी रोज त्याला भरपेट खायला घालणार. नवरा कुठून-कुठून, चिखलातून माखून आला तरी रोजच्या रोज स्वच्छ टॉवेल ने त्याला साफ करतात त्या.
रोज खर्चाला पैसे मिळत असतात त्यामुळे पाकिटाला हात लावायची पण गरज नसते. किंवा घेणंदेणं पण नसतं त्यात पैसे असो वा नसो किंवा येणारे पैसे कसेही येवोत.
नवऱ्याच्या डायरीला तर हात पण नसतो लागलेला. एकतर वाचायचा कंटाळा किंवा वाचून पण काय डोम्बलं फरक पडणारे हे वाटून bookmark पण हलवत नाहीत त्यातला. कदाचित नवऱ्याच्या डायरीची भाषा त्यांना कळतच नाही किंवा वाचता आलीच तरी त्यात लिहिलेलं कळतच नाही त्यांना. 
मस्त रोज नवीन-नवीन किंवा जुन्याच साड्या नवीन प्रकारे घालून सजून राहत असतात त्या...
निऱ्यांना सावरत...
पायाच्या भेगांना मलम लावतील, कदाचित पाय दाबुनही देतील त्या...पण नवऱ्याच्या वाटांशी त्यांची ओळख हि नसते ...

अशा बायकांना Wedding Ring देणे worth आहे खरतर..  


पण मग काहींच्या बायका अशा हि असतात...त्यांचा नवराच कधीकाळी विस्कटलेला असतो. मग त्या त्याला अवरतात, नीट करतात.
घड्या असतात पांघरुणात पण मग त्या टोचू नये याची काळजी पण त्या घेतात..कधीतरी नवऱ्याला मांडीवर घेतात, डोक्यावरून-केसांमधून हात फिरवतात.
थकलेल्या नवऱ्याला नुसती मांडीच नाही तर झोप पण देतात त्या.
सल-खुसपट लागतात ना अधून-मधून, पण मग त्यात रवंथ करत बसण्यापेक्षा थुंकून टाकतात. त्याच्यामुळे तोंडाची चव बिघडू नये जाऊ नये म्हणून त्या काळजीहि घेतात.
नवऱ्याच्या bag मधलं, खूप आतलं, अडगळीमधलं सामान पण नीट आवरून लावतात त्या. कधी लागलीच तर मदत पण करतात त्याचं सामान शोधायला आणि कधी लपवायला हि.
स्वतःच सामान हि तसंच नीट आवरून ठेवलेलं असतं त्यांचं. कधी कोणता कपडा अचानक बाहेर नाही येऊ याची काळजी घेत bags बंद होतात दोघांच्या.
सगळेच गुंते सोडवता नाही आले तरी कमी करून ठेवायची काळजी घेतात त्या. अगदी सगळेच धागे जोडले गेले असल्यामुळे नवऱ्याच्याहि नकळत काही गुंते आपोआप सोडवून पण टाकतात त्या.
आणि अजून जास्ती गुंते वाढू नयेत म्हणून आधीच precuation पण घेतात.
नवरा थकला-वाकला-हरला असेल तर स्वतः त्याचा कणाहि बनतात त्या. मळलेल्या कपड्याच्या आतल्या माणसाला उभारी पण त्याच देतात मग.
नवऱ्याला स्वच्छ तर करतीलच पण पुन्हा कधी तो माखाणार नाही याचीही तरतूद त्या करून ठेवतात...
पाकिटात पैसे कुठून येताहेत यापासून किती येताहेत याचाही हिशेब असतो त्यांच्या कडे. कधी पाकीट हलकं लागलं तर स्वतःच्या पाकिटातले पैसे काढून ते त्यात भर हि टाकतील किंवा जास्तीच जड वाटायला लागलं तर पाकिटातून काढून ते पैसे दोघांच्या PiggyBank मध्ये पण टाकतात त्या.
नवऱ्याच्या डायरी मध्ये त्यांचा स्वतःचा एक bookmark असतो. मग कधी नवऱ्याचे blue pages त्या ग्रीन करून टाकतात, मग कधी भिजलेल्या पानांना उब देऊन परत पहिल्यासारख्या पण करतात.
कधी कधी न समजलेल्या पानांवर प्रश्नचिन्ह टाकून तर कधी आवडलेल्या पानावर मनातला काही लिहून जातात त्या. नवरा वाचायला आवडत असतं त्यांना... एकंच भाषा-लिपी असते दोघांची. अगदी काहीच लिहिलं नाही डायरीच्या पानावर तरी कळत त्यांना...
स्वतः थकून आल्या तरी चेहऱ्यावर एक मोठ्ठ हसू घेऊन आणि एक छानपैकी मिठी मारून ते त्याचं स्वागत करतात..
नवऱ्याच्या वाटा आधीच माहित असतात कारण त्याच्या बरोबरच चालत असतात त्या.. एकच काटा दोघांच्या पायात रुतलेला आणि एकाच झऱ्यात पाय सोडून बसलेले असतात ते..

आपली पूर्ण Life जरी यांना दिली तरी worth नसतं ते...

------------
'J'ill :  खरतर तू मला "House-Keeping" करणाऱ्या बाईशी compare करत नाहीयेस, तर तुझ्या अपेक्षांची यादी सांगतोयस....
j'A'ck : ummm... हो :)

Friday, September 10, 2010

हरितालिका !

"It should not be denied... that being footloose has always exhilarated us. It is associated in our minds with escape from history and oppression and law and irksome obligations, with absolute freedom, and the road has always led West."

Thursday, September 2, 2010

अंगुलीमाल

जंगलातून चालताना अचानक एखाद्या गाणाऱ्या पक्ष्याची सुंदर तान कानावर पडते. अगदी stereo sound - तो आवाज या कानातून जातो ते थेट दुसऱ्या कानापर्यंत...
आपण शोधतो त्या पक्ष्याला पण दिसत नाही तो पक्षी... तो आवाज, ती तान अचानक कानावर येते आणि तशीच अचानक विरूनहि जाते...  अगदी सहजपणे घडतं हे सगळं...

अश्याच सहजतेने कापायचा तो मान वाटसरूंची. कधी, कुठून, कसा उगवेल तो त्या जंगलात ते सांगता नाही यायचं. काही सुचायच्या आत मानेवरून त्याची सुरी फिरलेली असायची - या टोकापासून त्या टोकापर्यंत...
त्या जंगलातून जाणाऱ्या -येणाऱ्याला सतत 'अंगुलीमालची' भीती वाटत असायची. अगणित मानवी बोटांच्या माळा घातलेला अंगुलीमाल !!!
मारायचा , लुटायचा तो वाटसरूंना शिवाय त्यांच्या हाताचं मधलं बोट कापून आपल्या माळेत ओवून टाकायचा. कित्येक पदरी माळ झाली होती त्याची. शेकडो हत्या , शेकडो लोक आणि त्यांची शेकडो मधली बोटं ...त्याला भेटणारा कोणीही अद्याप जिवंत बाहेर पडला नव्हता... अगदी myth किंवा horror फिल्म सारखा प्रकार होता तो. एक बोट आणि (एक) मान कापलेली मानसं सापडायची जंगलाच्या हद्दीवर फक्त ...

पण त्यादिवशी वेगळंच घडलं... हातापायाची बोटं झडलेली, नाकाचा-कानाचा पत्ता नसलेली, अगदी भणंग कुष्टरोगीण त्या जंगलातून चालली होती. गावाबाहेर काढलं होतं लोकांनी तिला. कितेक दिवस उपाशी पोटी राहून, अशा रोगट परिस्थितीत शेवटी तिने निर्णय घेतला - जंगल पार करून दुसऱ्या गावात जायचा. दुसऱ्या गावात या रोगावर इलाज होता. शिवाय तिथल्या लोकांनी कुष्टरोग्यांना accept पण केलं होतं...  जेव्हा जंगल पार करायचा निर्णय घेतला तेव्हा अंगुलीमालचा विचार हि मनात नाही आला तिच्या. फक्त हे गाव सोडून पलीकडच्या गावात जायचा होतं तिला ...तसंही मेल्यासारखं जगत असताना मृत्यूचं भय असतं का ?

त्याने दुरूनच तिला येताना पहिले. अगदी दमून, कष्टाने पावलं टाकत होती ती. इतर लोकांमध्ये जंगल कसबसं पार करण्यासाठी एक धडपड दिसायची, शिवाय एक प्रचंड भीती डोक्यावर घेऊन ते जंगलातून जात असायचे. मात्र हि ? हिला घाई नव्हती, भीती तर अजिबातच नाही. फक्त सोसवत नसूनही, एकेक पाउल टाकणे जड जात असूनही हि चालत होती. तिला केवळ त्या गावात जायचं होतं, कसंही करून- उलट मधेच उरलेला, सुरकुतलेला गळा चिरला गेला असता तर बरंच होतं. झाडाच्या आडोश्याला उभा राहून अंगुलीमाल तिला पाहत होता... किती तरी वेळ... तिचे हाल त्याला बघत नव्हते. त्याचं  लक्ष जेव्हा तिच्या हातांकडे गेलं तेव्हा त्याला लक्षात आलं कि हिच्या हाताला बोटंच नाहीयेत. पहिल्यांदा तो हे असलं काहीतरी बघत होता. त्याचा हात नकळत अंगावरच्या माळेकडे गेला. त्या अगणित बोटांचा स्पर्श जाणवून त्याला कसतरीच झालं. तिला मारून टाकून, लुटण्याचा विचार तर त्याच्या मनातून केव्हाच गेला होता. त्याच्या मनात काहीतरी वेगळंच चाललं होतं....

असं  त्याला कधीच वाटलं  नव्हतं. कितेक माणसांना बघितलं त्याने जाताना या जंगलातून - बेदरकार तरुण, मरणाला घाबरणारे वयस्क, नटलेल्या सुंदर स्त्रिया, गोरेपान पोरं, काळेकुट्ट -धिप्पाड प्रौढ..किती मानसं आणि त्यांच्या देहाचे कितेक आकार, रंग, रग... पण त्याला कधीच ते देह भावले नाहीत... केवळ बोटं असणारी शरीरं इतकंच त्याच्या लेखीत्याचं  महत्व होतं.. फुल खुडताना झाडाकडे किती लक्ष जातं आपलं ? त्याला फक्त बोटं हवी होती.. इतकी बोटं होती त्याच्याकडे आणि आता हे असं शरीर तो बघत होता. बोटं झडलेल, बोटं नसलेलं पण तरीही निर्धाराने चाललेलं....

आणि त्याला प्रेम झालं ...
बदलून गेला मग तो. त्याला काहीच सुचेना... तो कोणालाच मारेनासा झाला... काहीतरी बदल नक्कीच झाला होता त्याच्यात. पण 'काय' ते नव्हतं कळत त्याला. प्रेम म्हणजे काहीतरी असतं आणि ते असंच असेल...अशी त्याची खात्री पटली होती.
"अंगुलीमाल प्रेमात पडला होता".... "अंगुलीमाल एका बोटं नसलेल्या कुष्टरोगी स्त्रीच्या प्रेमात पडला होता"..

पण एक गोची अशी होती कि तिने तर त्याला पाहिलेही नव्हते. तो कसा आहे, कसा दिसतो, कसा राहतो, कसा वागतो ? याच्याबद्दल अफवाच जास्ती. तिला काय माहिती कसा आहे अंगुलीमाल खरंच ?
त्याला मोठा प्रश्न पडला होता "ती करत असेल का आपल्यावर प्रेम ?"

Whether she loves me ? or she loves me not ?
आता हे कसं कळणार ? कसं समजणार ?....पण समजायला तर हवं ना ? काय करायचं ? कसं कळेल ?

Idea !!!!

त्याने त्याच्या आयुष्याची कमाई, त्याची माळ काढली आणि एकेक बोटं घेऊन त्याने सुरु केलं ...
she loves me...
she loves me not...

she loves me...
she loves me not...

एक पदर संपला... दुसरा पण
तिसरा पण...

आता शेवटचा पदर राहिला होता...
जशी जशी माळ संपत चालली होती तसं तसं त्याचा tension वाढत होतं...
she loves me..
she loves me not..

she loves me..
she loves me..... NOT ....
shit ! shit !! shit !!!

त्याने परत मोजली बोटं , परत केलं सगळं count तरी तेच ...she loves me NOT...

इतक्या वर्षात पहिल्यांदा असं काही झालं होतं...आणि हे असं का विस्कटावं ? तो चिडला होता खूप, त्याला ते NOT नको होतं.. तिने प्रेमच करायलाहवं होतं त्याच्यावर. त्याला काहीच सुचेना..
....बास खूप झालं...खूप दिवस नाही मारलं आपण कोणाला.. आता एकाला मारायचं फक्त.. फक्त एक बोट कमीये... ते मिळाला कि - She loves me !!!

आता जे कोणी पहिले दिसेल त्याचं बोट आपलं.... अंगुलीमाल ने एकदा ठरवलं कि बास...
तो उठला आणि निघाला... जंगल भर शोधात राहिला माणसांची निशाणी...
मधला ओढा ओलांडला कि मिळतील मानसं... नाहीच मिळाली तर जंगलाची वेस ओलांडू , वस्तीतून आणू  कोणाला तरी..

गंजत आलेल्या हत्याराला धार करायला त्याने ओढ्यातला दगड शोधला.. आणि पाणी घ्यायला खाली वाकला तो. तितक्यात त्याला आपल्याच हाताचं प्रतिबिंब  दिसलं पाण्यात.
राकट हात आणि निबर बोटं स्वतःचीच... क्षणभर थांबला तो.
आणि दुप्पट वेगात धार करायला लागला सुरीला.. दगड झिजत चालला होता आणि हत्यार चमकायला लागलं होतं... त्याने बोट लावून धार बघितली.. मनासारखी वाटली त्याला.. 

..दुसऱ्याच क्षणी त्याने स्वतःच्या डाव्या हाताचं मधलं बोट सर्रकन कापून टाकलं..  
Now .... She Loves अंगुलीमाल !!! 

Tuesday, August 24, 2010

Raw + Junglee + येड@#$ + काईच्याकाई Mix

.... आषाढातल्या या अश्श्या येड2@#$ पावसात हि सये व्हावे तुझे येणेजाणे (Raw + junglee + येड@#$ + काईच्याकाई Mix)    
----------------------------------------
ये...
तो पिसाट थेंब ढगातून जमिनीवर आदळायच्या आधी .. 
भिजलेल्या, थरथरनाऱ्या विजेला बेभान कोसळायची शुद्ध येण्याआधी ...
एकमेकांवर तुटून पडणारे ढग जखमी होऊन अजूनच भळाभळा वाहण्याआधी..

ये अशी वेगात, आवेगात.... 
आदळून ठिकऱ्या ठिकऱ्या होऊ देत तुझ्या...
किंवा मीही तुझ्या आगीत भस्म ..
....दोघेही वाहून जाऊ घातलेले सगळे बांध फोडत...

मला इतर कोणताच आवाज नकोय त्यावेळी.. 
तडतडू देत हा पाऊस पत्र्यांवर... Heavy metal सारखा  ..
किंवा याच्या सरींबरोबर वाऱ्याने लगट करू देत .... Baas Guitar वाजवेल तो...
आणि ढगाने त्याचे नगारे फोडू देत... नकोय आवाज आता दुसऱ्या Drums चाही...
पाणी शुभ्र होऊन धोधो पडू देत काळ्याकुट्ट कातळकड्यांवरून.... पांढऱ्या पट्ट्यानसारखं... Keyboard सारखं ...
धपापणारे श्वास आपले Vocals करतीलच त्यावेळी.. 
पण आधी ये तू...

कदाचित...
या गच्च पावसात मी कुठे दिसणारही नाही  .... धुकेरी पाऊस हा किंवा पावसाचं अगदी दाट धुकं असेल..
नकोच शोधूस मला तरीही.. अशीच सुसाट धावत राहा... भान हरपून, दिशाहीन ... 
हा वारा जसा सुसाट झालाय ना तसं ...
आदळशीलच तू मला कधीनाकधी... तरीही भानावर नकोच येउस...
पूर्णपणे विस्कटून टाक मला..
..माझं एकुनेक पान तुझ्या वेगात  भरकटू देत... 
..अगदी मुळं खिळखिळी होईपर्यंत झोंब मला...
..नकोय आता ही जमीन मला....उन्मळून टाक आणि दूर कुठतरी फेकून दे.. 

त्यावेळी असू बरोबर... तुझ्याच मिठीत.... भिरभिरत आणि अस्ताव्यस्त...   

Wednesday, July 14, 2010

"जलने में क्या मजा है ?" ज्यांना माहिती आहे त्यांनी हात वर करा! 'परवाने' गप्प बस, तू नको सांगूस!!

"जलने में क्या मजा है, परवाने जानते है !"
किती दिवस आपण त्याच त्या घासून गुळगुळीत झालेल्या, खाऊन खाऊन चोथा झालेल्या, हजारो लोकांनी एक करोड वेळा वापरलेल्या उपमा वापरणार आहो ? 
तीच ज्योत, तीच आग आणि तेच आगीकडे झेपावणारे पतंग ... बाकी कुठेच दिसत नाही का असा पतंगासारखा वेडेपणा ?

पाहीला तर दिसेलही..
  
तसं पाहिलं तर पावसाच्या थेंबांना काय अस्तित्व आहे स्वतःचं ? 
ढगात असताना वाफेचे पाणी असतात ते नुसते आणि जमिनीवर पडले कि एक तर मुरून जातात किंवा ओहोळात मिसळून जातात...
पावसाच्या थेंबांना त्यांचं असं स्वतंत्र अस्तित्व केवळ पडतानाच असतं.....फक्त आभाळातून खाली पडेपर्यंत...बास...     
तेव्हाहि ते एका इर्षेने, एकाच ध्येयाने, केवळ जमिनीवर पडायच्या एकाच वेडाने पिसाट असतात...
बेभान होऊन बरसात असतात ते. कशाची पर्वा न करता, कशालाही न जुमानता....  
केवळ जमिनीत सामावून जाऊन स्वतःचं  अस्तित्व संपवून टाकायचं इतकंच त्यांना माहिती असतं...
जे तसे बेभान होऊन जमिनीवर पडता आणि स्वतःला संपवून टाकतात ते खूप lucky , त्यांना त्यांची मंझील मिळालेली असते ...

पण काही कुठेतरी अडकून पडतात. तारांना, पानांना, दोऱ्यांना अडकून राहतात. पागोळ्या होऊन लटकत राहतात..       
 
त्या पागोळ्यांकडे एकदा नीट पहा... त्या थेंबाच्या जमिनीकडच्या सर्वात खालच्या टोकाकडे पहा.. मातीत मुरायची, रुजायची जीवघेणी इच्छा ठासून भरलेली असते त्यात.
पागोळीचा सगळा आत्मा त्या एका टोकाला साठून राहिलेला असतो. टच्च भरलेलं ते टोक जमिनिकडे अनिवार ओढीने बघत असतं.
"Creation of Adam" मध्ये Adam आणि देवाची बोटं एकमेकांना चिकटलेली नाहीयेत, त्यामुळे ती बोटं touch व्हावीत याची आतुरता किंवा ओढ जी त्या चित्रात जाणवते तीच मला इथे दिसते. पागोळी आणि जमीन यांच्यामध्ये !!  
कधी एकदा फांदीवरून तुटते आणि जमिनीवर पडते असं झालेलं असतं त्या पागोळीला..
...ती जमिनीत मुरून, स्वतःचा अस्तित्व संपवूनच 'पूर्ण' होणार असते.... असं स्वतःचं अस्तित्व संपवून टाकणं हेच तिचं जीवन असतं खरतर... 
त्यातच तिला मजा असते ..

....आपण नुसते बघत बसतो पागोळ्यांकडे पण त्यांच्यातली ओढ कळत नाही आपल्याला आणि आपण मुर्खासारखे गुणगुणत राहतो ..."जलने में क्या मजा है .... "   

Monday, July 12, 2010

Silent Invocation - D

गेली कित्येक वर्षं माझा mobile silent वरच होता.... 
 
माझा पहिला mobile भारीतला होता. भावाने घेऊन दिलेला. आडवा होता mobile तो With memory card, songs , games, etc...
मस्त ringtones हि होत्याच शिवाय गाण्यांच्या ringtones पण देता यायच्या. full आवाजात लावायचो, सतत गाणे वाजत असायचे त्यातून....
32mb memory कार्ड मध्ये बसतील तितके songs सतत वाजत राहायचे.   
पण मग दोन्ही गेले..
 
त्यानंतर एकदम साधे mobile वापरत होतो ३-४ वर्ष. Basic models एकदम.  
ठीकठाक दिसायला, आवाज पण चांगला नसायचा त्यांचा. ringtones पण भारी नाहीत अजिबात. त्यामुळे ते कायम silent वर असायचे..
सतत नुसते vibrator वर, फक्त मला ऐकू यावी त्यांची भुणभुण हे कारण. ते mobiles फक्त माझ्याशीच बोलायचे, बोलायचे पण नाहीत खरतर नुसतेच खुणवायचे .  
इतके शांत होते ते कि मलाच माझ्या जुन्या mobiles चा आवाज माहिती नव्हता कि त्यांचे ringtones माहिती नव्हते... 
त्यांचा आवाज विसरलो होतो हे हि नाही म्हणता येणार उलट मी त्यांचा आवाज कधी ऐकलाच नव्हता.
ते गप्प-बिचारे आवाज नाही करायचे किंवा त्यांचा आवाज मीच दाबून टाकला होता.... 
त्यात inferiority  चा पार्ट होता मान्य आहे पण तो कमी होता... 
उलट त्याने/त्यांने आवाज करू नये, किंवा त्याचा आवाज कोणी ऐकेल कि नाही किंवा त्याच्या आवाजावर लोकं टीका करतील...असं  काहीतरी वाटायचं...
किंवा एकूणच फोन कमी यायचे/येतात त्यामुळे तो कुठेतरी लपून, गप्प असायचा... कधी चुकून माकून आलाच फोन तर हळूच सांगायचा मला तो कोणालाही न कळू देता.
 
....keep your voice to yourself;
Nor should you tinkle and toll your tongue.! सारखं
 
...आणि मी लोकांना सांगायचो कि मला technology नाही आवडत, फोन फक्त call करण्यासाठी असतो, माझ्या कडे बाकी camera, pc आहे त्यामुळे high-fundoo मला गरज नाहीये...अशी काहीही कारणं  देऊन वेळ मारून न्यायचो..आणि इतकं भारी पटवून द्यायचो कि त्यांना खरंच वाटायचं...
 
परवा नवीन mobile घेतला. E - 71 ....
तुला वाटलं असेल कि मी माझ्या mobile चं किती उगाच कौतुक करतोय....
पण कारण असंय कि खूप दिवसांनी माझा mobile आता आवाज करायला लागलाय... त्याचा स्वतःचा आवाज.., मस्त, भारी , सगळ्यांपासून उठून दिसणारा आवाज.... त्याला ओरडून सांगायचं कि - मला पण आता फोन येतात खूप, sms येतात खूप, आणि मला पण आता मस्त गाता येतं (rather गावं असं वाटतंय...) 
परवा जेव्हा नवीन mobile घेतला तेव्हा त्याचा तो आवाज परत आला...  माझ्या साठी ते खूप symbolic आहे...
कारण...
 
कित्येक वर्ष "मी"च silent वर होतो.... 

Thursday, July 1, 2010

Tu

Tuesday, June 22, 2010

Rape me !

काहीपण "बादरायण" संबंध काढायची सवय जात नाही...
बादरायण संबंध --- घटनांचे एकमेकींशी असणारा, लोकांचा एकमेकांशी असणारा आणि स्वतःचा दुसऱ्यांबरोबर असणारा....

एकदा एका Academy winner actor चा हा video मित्राने पाठवला होता (seek to 4:44 min)....त्यात तुकारामांचा एक अभंग आहे.....
बरे झाले देवा निघाले दिवाळे ! बरी या दुष्काळे पीडा केली !!
भारी वाटलेला हा video तेव्हा.. भरपूर comments मारले होते सगळ्यांनी.............


पण .............पण आज काल काही सुचतच नाहीये लिहिण्यासारखं, मांडण्याजोगं.
सगळं diabetic , goody-goody सुचतंय पण तेही मांडण्यासारखं नाहीचे..
...काही सल नाहीयेत सध्या .....किंवा आहेत पण ते जरा झाकले गेलेत...
..चिडचिड पण नाही होत......निराशा आलेली राहत नाही जास्ती वेळ...blue-blue-black-black पण नाही वाटत आजकाल ....
Goodbye Blue Sky झालंय !
आतून काही भरूनही येत नाहीये....पण त्यामुळे सुचत नाहीये काहीच ... खुश आहे मी...


"The Kite Runner" मध्ये खालिद हुसैनी एक गोष्ट सांगतो ...
एकदा एका माणसाला एक जादूचा पेला सापडतो. त्या पेल्यात ढाळलेल्या अश्रुंचे मोती बनत. तो माणूस जरी गरीब असला तरी तो सुखी होता त्यामुळे क्वचितच अश्रू ढाळत असे.
पण मग त्याने स्वतःला दुःखी करण्याचे मार्ग शोधायला सुरुवात केली जेणेकरून अधिकाधिक अश्रू मिळतील आणि तो अधिकाधिक श्रीमंत होईल.
जशी जशी मोत्यांची रास वाढत गेली तशी तशी हाव ही..
गोष्टीच्या अखेरीस मोत्यांच्या ढिगारयावर बसून तो माणूस अगतिकपणे त्या जादूच्या पेल्यात आसवे ढाळत बसलेला असतो.
त्याच्या हातात रक्ताने भरलेला एक सुरा आणि कुशीत त्याच्या बायकोचं गळा चिरलेलं कलेवर असतं .....


..........तेव्हा भरून असायचो, अगदी काठोकाठ - सांडायच्या बेतात.... मग पेला ही शब्दांने भरून वाहायचा, माझ्याबरोबर.
मग
कधी कधी
त्यातले काही शब्दं मोती पण व्हायचे ....
मग ती रास वाढायची आणि हाव ही.
पण आज ?..............आज खूप दाटून आणलं तरी सुचेना. आवंढे गिळले , डोळे बंद केले, काय काय आठवायचा प्रयत्न केला. पण नाहीच ....
स्वतःलाच जखमी करून बघितलं, खपल्या काढल्या, ओरबाडलं स्वतःला. पण तरीही नाहीच सुचलं काही .
'त्याच्या'बद्दलची चीड हीच कितेक दिवस उभं रहायची ताकद होती. 'त्याच्या'कडे नजर भिडवून पाहायचो. बेरकी- न भिता.
कितीही झोडपलं तरी परत उभं राहायचो. स्प्रिंग म्हणायचो स्वतःला ... जितकी जास्ती तो दाबेल त्याहून जास्ती बळाने bounce back होणारी स्प्रिंग.......
... आणि आता ?
आता रमलोय मी इथे. वर बघून नजरेला नजर देण्यापेक्षा आजूबाजूला बघतो मी. 'आव्हान' तर विसरूनच गेलोय कुठे ठेवलंय ते.
रमतोय मी त्यांच्यात. छान बसून गप्पा मारतो त्यांच्याशी. उभं राहायलाच विसरलोय. इथेच मांडी घालून बसलोय 'आव्हानावर'... ....
माहितीये लिमिट आहे ही माझी. ती चिडचिड, तो राग, तो निषेध, नियतीला केलेलं आव्हान, त्यामुळे आलेलं अपयश-दुःख हेच कारण होतं या लिखाणाला.....
आता ते कारण झाकोळल गेलंय....
मग आता किती जखमा करू आणि कसा भरू हा पेला ?....


तुकारामांनी यासाठीच दुःख, कष्ट, पीडा मागितल्या होत्या का देवाकडे ?
आणि Kurt Cobain ही याच कारणासाठीच म्हणाला होता का -----------
Rape me,
Rape me, my friend !!!!

Thursday, May 20, 2010

कंसामधलं ......


इतकं अति झालंय हे आयटी-बीटीचं खूळ कि वळीव सुद्धा आजकाल Smells Like Software Engineer. आठवडाभर राबराब राबून सगळी भडास weekend ला किंवा friday संपत आला कि काढतो आम्ही. तसंच होतंय हल्ली. आठवडाभर खूप उकडतं आणि मग friday eve ला वगैरे हा वळीव/पाउस फॉर्मात येतो. गेले ४ आठवडे असंच चाललंय. अगदी mainstream पावसासारखा आणि आयटीवाल्यासारखा वागतोय हा. तसा कलंदरच होता तो... 
---
३ friday असेच गेले. late 20's मधल्या कामाच्या जबाबदाऱ्या आणि 'वयोमानपरत्वे लग्न' जमल्यामुळे लग्नातले ओसरलेले अप्रूप यामुळे courtship मध्ये असूनही पाऊस (आणि तो पण भन्नाट, वळीवाचा) एकत्र बघावा असे दोघांनाही वाटले नाही कधी. 
पण मग चौथ्या शुक्रवारी वातावरण मस्त झालं होतं. gallery मध्ये आला तो आणि कामानिमित्त तिला फोन केला. तितक्या जोरात वारा सुरु झाला. जास्ती काही ऐकू येईना.
त्याच्या तोंडून वेळ मारायची म्हणून सहज निघून गेलं "तुमच्याकडे आहे पाऊस ?......जर तुला काही urgent काम नसेल तर भेटायचं का आज ?" ...
तिला पण ऐनवेळी काही कारण सुचेना सो ती पण "हो" म्हणून गेली
arrange marriage  मध्ये असे अवघडलेले क्षणच जास्ती !! 
एकाच बेंच वर बसलेले दोघं, पण दोघांचा पाऊस वेगळा होता. आणि वेगळेवेगळे भिजत होते दोघं त्यात.

पाऊस गडगडाट करेल, विजा चमकावेल, घाबरून सोडेल. पण शेवटी दुसऱ्याच्या कुशीत/मिठीत शिरण्याचा निर्णय हा आपलाच असतो. सांडायचंच नाही ठरवलं तर असंच  ओथंबून राहता येतं. 

किती वेळ नुसता पाउस ऐकणार म्हणून त्याने नेहमीचा typical प्रश्न टाकला. "तुला मातीचा वास आवडतो ?" ..तो  
"हो...असाच ...आणि या वळवाचं हेच आवडतं मला..नेहमीच्या पावसाला नाही येत हा वास." .....ती 
"तुला काय वाटतं मातीचा हा वास मातीसाठी काय असेल ? ..scent , perfume or deodorant ?" ....तो..आणि उत्तराची वाट न पाहता सांगायला लागला...

"पाउस मला merchant navy मधला नवरा वाटतो जमिनीचा. पूर्ण वर्षात ४च महिने बरोबर राहून वर्षभर पुरेल इतकं देणारा. किंवा वळीव म्हणजे parole वर सुटून आलेला, भेटायला आसुसलेला, शिक्षा भोगणारा नवरा... आणि मग जेव्हा तो भेटायला येतो तेव्हा हि माती, हि जमीन आपला अगदी ठेवणीतला scent लावते. किंवा 'जब्भी खयालों में तू आये मेरे बदन से खशबू आये' म्हणणारी रेखाच वाटते. मातीचा हा गंध म्हणजे ठेवणीतला, उंची Scent च !!!!"  ..........तो 
कंसामध्ये तो --( त्याला खूप आठवण आली मेघनाची.. मोरापेक्षाही जास्ती पाउसवेडी पोर ती आणि मोरपिसाहून हळवी. तिला सगळा पाऊस आवडायचा -- पहिला पाऊस , दुसरा पाऊस , तिसरा,... सातवा, त्रेपन्नावा...... अगदी शेवटचा पाऊसहि भरभरून जगला  तिने. खूप दिवसांनी एकत्र पाऊस झेलत होतो त्यावेळीची हि तिचीच वाक्यं ! हळव्या पोरीच्या या हळव्या कल्पना आणि उपमा पण. "चुकलो मी, नाही सोडून जाणार परत " असा म्हणत त्याने तिला घट्ट मिठीत घेतलेला. पाण्याने भिजलेल्या तिच्या दाट पापण्या काजळासारख्या भासत होत्या, त्याने हळूच भिजल्या पापणीवरल्या पागोळ्या ओठांनी टिपून घेतल्या..'i luv u like this rain, meghana' ...'...like rain का ?'  ... 'असंच..निघून गेलं तोंडातून'  )

ती... "hmmm...." तिने दीर्घ श्वास घेतला आणि एकदा परत मातीचा तो गंध भात्यात भरून घेतला...

ती..."पण मला काय वाटतं सांगू ? deodorant आहे तो मातीचा. उन्हाने त्रासलेली असते ती तीनेक महिने. घामेघूम, तापलेली. ना काही सावली ना गार झुळूक एखादी. सुस्त पडून असते. आणि हा पाऊस असा अचानक येतो. जोरात, काही नं सांगता, बेधडक...तिची प्रचंड तारांबळ उडते..काहीच आवरलेलं नसतं तिने. surprise visit याची. ऐनवेळी कपाटातला जो   perfume हाताला येईल तो वापरते ती. deodorant च आहे हा तिचा. अशी विस्कटलेली ती माती कसाबसा deodorant मारून भेटायला पळते पावसाला. मातीचा हा गंध म्हंजे तिचा deodorant च "
कंसामध्ये ती --( तिला अचानक cigarette, घामाचा आणि घामाला लपवायला जरा जास्तीच मारलेल्या deodorant चा mixing होऊन जो पुरुषी वास येतो तो आला. यतीन आठवला तिला अचानक. आपल्या कोवळ्या भावनांना त्याच्या करड्या मिठीत कुस्कारणारा. पण तिला तेच आवडायचं..त्याचा पुरुषी अहंभाव, तो बेरकीपणा, तो मस्तवालपणा. मातीच्या वासाची deodorant शी केलेली तुलना त्याचीच. त्याचीच वाक्यं तिने टाकली. त्याच्या जाड्याभरड्या खरबरीत हातांचा स्पर्श आणि असल्या निबर भावना यांचंच तिला भारी वेड. भर पावसात हे वाक्यं बोलून त्याने तिला घट्ट मिठीत घेतलेले. हि आपली त्याच्या अंगाच्या तीव्र दर्पात मातीचा वास आणि स्वतःला विसरलेली. कोंडलेल्या श्वासामुळे तिला तिच्या मनातलं सांगता हि येईना. त्याची "luv u" म्हणायची हि पद्धत अशीच रानटी, पुरुषी ... )

तो ..."हे...हे.. good भारीये हि deo ची उपमा :D :D . तुम्ही मुली नाहीतरी जास्तीच practical असतात..."  ooops आपण काहीतरी चुकीचं बोललो हे त्याला समजलं. सावरून घेण्यासाठी ...
"but we really complement each other !!! "  

पाऊस चालूच होता. परत केवळ पावसाचाच आवाज येत होता...बराच वेळ...
तो ...."या क्षणी 'complement' च्या ऐवेजी मी तुला "love u" म्हणायला हवं होतं ना ?"
ती ..." जवळ येऊ जरा मी तुझ्या ??"  
तरीही पाउस चालूच होता..फक्त आता दोघे एकाच पावसात भिजत होते इतकंच ........ दोघांचा पाउस आता एकच झाला होता.

----
कंसातलं कंसातच राहायला हवं का ? त्यानंतरचा प्रत्येक पाउस त्यांचा कंसामधला भूतकाळ पुसत गेला. नाहीतरी पाउस असतो कशासाठी ??
And they still lived happily ever after...............